मॉडेल स्कूलच्या कामांची त्रयस्थ संस्थेकडून तपासणी करा

मॉडेल स्कूलच्या कामांची 
त्रयस्थ संस्थेकडून तपासणी करा
Published on

पुणे, ता. २९ ः जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील तीनशेहून अधिक शाळांचा ‘मॉडेल स्कूल’मध्ये समावेश करून विविध बांधकामे केली जात आहेत. मात्र, या कामांच्या दर्जाबाबत जिल्हा परिषद सदस्यांकडूनच नाराजी व्यक्त करण्यात आल्याने आता कामांच्या गुणवत्तेची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करावी, अशी मागणी कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे. याबाबत असोसिएशनच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले.
जिल्ह्यात सुरू असलेल्या मॉडेल स्कूलच्या बांधकामांच्या दर्जाबाबत काही जिल्हा परिषद सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या कामांबाबत संताप व्यक्त करत सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही हा मुद्दा उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर असोसिएशनने या प्रकरणात भूमिका घेत कामांच्या गुणवत्तेची वस्तुनिष्ठ तपासणी करण्याची मागणी केली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र भोसले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अध्यक्ष जगदाळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांची भेट घेतली. या वेळी शिरूर तालुक्यातील केंदूर, पाबळ, करंदी आणि खैरेनगर येथील मॉडेल स्कूलच्या कामांची जिल्हा परिषदेने नियुक्त केलेल्या राज्य गुणवत्ता निरीक्षकांमार्फत तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली.
कामांवर नियुक्त असलेल्या शाखा अभियंता, उपअभियंता आणि कार्यकारी अभियंता यांनी केलेल्या पाहणी दौऱ्याची आणि त्यांनी दिलेल्या सूचनांचीही खातरजमा करावी, असे असोसिएशनने निवेदनात म्हटले आहे. तसेच बांधकामासाठी वापरण्यात आलेले साहित्य आणि अंदाजपत्रकातील तरतुदी यांची सांगड घालून प्रत्यक्षात वापरलेले साहित्य निर्धारित दर्जाचे आहे की नाही, याची चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. मॉडेल स्कूलच्या कामांच्या गुणवत्तेबाबत निर्माण झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी झाल्यास कामांचा प्रत्यक्ष दर्जा स्पष्ट होईल. त्यामुळे संबंधित शाळांमधील बांधकामांची तांत्रिकदृष्ट्या आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने तपासणी करून अहवाल घेण्यात यावा, अशी भूमिका कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनने मांडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com