
पुणे - पाचशे चौरस फुटांच्या शंभर सदनिकांच्या गृहप्रकल्पाला नियमानुसार वीजजोड देण्यासाठी स्वतंत्र २०० ‘केव्हीए’चा ट्रान्स्फॉर्मर आवश्यक असतो. त्यासाठी आठ लाख रुपये खर्च येतो. तो टाळायचा असेल, तर साहेबांच्या मर्जीतील ठेकेदार धरायचा, त्याला पैसे मोजले की ट्रान्स्फॉर्मरचा खर्च वाचतो, तो कसा...
हा खर्च वाचविण्यासाठी महावितरणच्या नियमांचा वापर केला जातो. ‘नवीन वीजभार’साठी असा प्रस्ताव आला, तर प्रथम गृहप्रकल्पाचा वीजभार हा महावितरणच्या नियमातील तरतुदीनुसार क्षेत्रफळाच्या प्रमाणात निश्चित केला जातो. त्यासाठी स्थळपाहणी केली जाते व निश्चित केलेला वीजभार हा जास्त आहे, त्यामुळे तो देण्यासाठी नवीन ट्रान्स्फॉर्मर उभारावा लागेल, असा आग्रह धरला जातो; परंतु सर्व काही ‘ठरले’ की नवीन ट्रान्स्फॉर्मरचा हट्ट सोडून हाच वीजभार नजीकच्या ट्रान्स्फॉर्मरमधून देणे शक्य असल्याचे बांधकाम व्यावसायिकाला सांगितले जाते. तसा तांत्रिक अहवाल तयार केला जातो. त्यामुळे ‘तुम भी खूश, हम भी खूश’ असा कारभार सध्या धायरी येथे सुरू आहे.
महावितरणची वीजभार निश्चित करण्याची पद्धत सदोष असल्यामुळे त्याचा अशाप्रकारे गैरफायदा घेत अधिकारी खिसे भरत असल्याचे समोर आले आहे. बांधकाम व्यावसायिक पैसे वाचविण्यासाठी; तर महावितरणचे अधिकारी आणि ठेकेदार खिसे भरण्यासाठी अशाप्रकारे नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसून येत आहे.
दीडशे किलो वॅटपेक्षा जास्त वीजभार मंजूर करावयाचा असेल, तर त्यासाठी मंडल कार्यालयाकडून परवानगी घ्यावी लागते. ‘हा त्रास नको आणि वाटेकरीही नको’ असा विचार करून दीडशेपेक्षा जास्त वीजभार असलेले प्रस्ताव आले की त्यांची फोड करून ते स्वत:च्या अधिकारात मंजूर करून द्यावयाचे, असे प्रकार चालतात.
धायरी येथे एका ट्रान्स्फॉर्मरवर (डीटीसी कोड -४६७७२८९) एकाच गृहप्रकल्पातील निवासी आणि व्यावसायिक इमारतींचे वेगवेगळे प्रस्ताव बनवून प्रत्येकी १४३ किलो वॅटप्रमाणे एकूण २८६ किलो वॅट वीजभार मंडल कार्यालयाकडे न पाठविता विभागीय स्तरावर मंजूर केला गेला. वास्ताविक हा ट्रान्स्फॉर्मर ज्या सोसायटीचा आहे, त्यांचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेणे आवश्यक होते; परंतु ते न घेता हा अतिरिक्त वीजभार त्या ट्रान्स्फॉर्मरवर देण्याचा ‘प्रताप’ केला असल्याचे दिसून आले आहे.
कागदावर वाढतेय क्षमता
नऱ्हे येथे एका सोसायटीजवळील ट्रान्स्फॉर्मर प्रत्यक्षात ३१५ ‘केव्हीए’चा असताना नवीन ५६ किलो वॅट वीजभार त्यावर मंजूर करण्यासाठी कागदोपत्रीच त्या ट्रान्स्फॉर्मरची क्षमता ६३० ‘केव्हीए’ दर्शविल्याचा अजब प्रकारही उघड झाला. ट्रान्स्फॉर्मरवर क्षमतेपेक्षा जादा वीजभार देण्याबरोबरच, काही ठिकाणी कागदोपत्री ट्रान्स्फॉर्मरची क्षमता वाढून जादा वीजभार दिल्याचे प्रकारही समोर आले आहेत.
असाही चालतो उद्योग
काही वेळेला नवीन वीजभार मंजूर करताना संबंधित इमारतीला आवश्यक असलेली वीज वितरण यंत्रणा उभारण्याव्यतिरिक्त महावितरणची यंत्रणा सक्षम करण्यासाठी ठेकेदाराला अतिरिक्त काम सांगितले जाते. ज्यामध्ये एलटी केबल, फीडर पिलर इत्यांदीचा समावेश असतो; परंतु हे जादाचे काम प्रत्यक्ष जागेवर न करता ती सामग्री महावितरणकडे जमा करून घेतल्याचे दाखविले जाते. ती विभागीय भांडारामध्ये जमा न करता परस्पर जमा करून स्वत: वैयक्तिक कामांसाठी वापरून पैसे कमविले जातात, अशीही काही उदाहरणे पुढे आली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.