द्रुतगती मार्गाची हिरवाई हरवली

द्रुतगती मार्गाची हिरवाई हरवली
Published on: 

सोमाटणे, ता. ७ : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने अनेक जंगली, देशी वृक्ष नष्ट झाली आहेत. गेल्या दहा वर्षांत वृक्षांची संख्या लक्षणीय घटली आहे. वाहनांमुळे होणारे हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारी नैसर्गिक हरितपट्टीच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाचे १९९८ मध्ये काम पूर्ण झाल्यानंतर मोकाट जनावरे आणि वन्यप्राण्यांचा रस्त्यावर वावर होऊ नये, यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने संपूर्ण ९४ किलोमीटर अंतरावर तारेचे संरक्षक कुंपण उभारण्यात आले होते. त्यामुळे रस्त्यालगत प्राण्यांचा वावर कमी झाला. या परिसरात वृक्षलागवड किंवा विशेष जोपासना न करताही देशी, जंगली तसेच विविध प्रकारच्या काटेरी वृक्षांची नैसर्गिक वाढ झाली होती. परिणामी, संपूर्ण द्रुतगती मार्गाच्या दुतर्फा हिरवीगार झाडे दिसत होती. वाहनांमुळे निर्माण होणारे प्रदूषण कमी करण्यासाठीही या वृक्षांची मदत होत होती.
दरम्यान, गहुंजे ते कुसगावदरम्यान रस्त्यालगतच्या गावांमध्ये गुंठेवारी आणि जमिनींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले. जमिनींच्या किमती गगनाला भिडल्या. द्रुतगती मार्गावरून आपल्या जमिनीचे ठिकाण आणि जाहिरात फलक सहज दिसावेत, या उद्देशाने काही जमीनधारक आणि खरेदीदारांनी रात्रीच्या वेळी वृक्षतोड सुरू केल्याचे सांगण्यात येते. गेल्या दहा वर्षांत झालेल्या या वृक्षतोडीमुळे द्रुतगती मार्गालगतची नैसर्गिक हिरवाई मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे म्हणाले, ‘‘वाहनांमुळे होणारे हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी रस्त्यालगत वृक्षलागवड करणे गरजेचे आहे. संबंधित विभागाने वृक्षतोडीबाबत वनविभागाला माहिती दिल्यास किंवा तक्रार दाखल केल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल.’’

PNE26W64805
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.