पुणे : प्रारुप मतदार यादीत मोठा गोंधळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune municipal corporation election new ward structure voter list

पुणे : प्रारुप मतदार यादीत मोठा गोंधळ

कोथरुड : केळेवाडी मधील इंदिरा पार्क हौसिंग सोसायटी मध्ये मी राहतो. त्यामुळे माझे नाव जयभवानीनगर – केळेवाडी प्रभाग क्रं. ३० मधील मतदार यादीत दिसायला हवे होते. परंतु ते प्रभाग क्रं. १६ फर्ग्युसन विद्यालय - एरंडवणा येथील इंदिरा नगर हौसिंग सोसायटी एरंडवणा या यादीत प्रसिध्द झाले असल्याचे दिसले. माझ्या प्रमाणेच आमच्या भागातील असंख्य लोकांची नावे शेजारच्या प्रभागात गेली आहेत. यादी बनवणारांनी एवढा मोठा घोळ कशासाठी घालुन ठेवला आहे असा प्रश्न मंगेश वाघमारे या युवकाने उपस्थित केला आहे.

महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणुक प्रारुप यादी जाहीर करण्यात आली आहे. परंतु या यादीत मोठा गोंधळ झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संपूर्ण दुरुस्ती करुनच मतदार यादी सुचना व हरकतीसाठी प्रसिध्द करावी अशी मागणी करण्यात येत आहे. माजी नगरसेवक दीपक मानकर म्हणाले की, प्रभाग ३० मधील ३३९४ मतदार प्रभाग १६ व ३१ मध्ये टाकण्यात आल्याचे दिसले. कोथरुड विधानसभा मतदारसंघातील मयत मतदारांची संख्या सुमारे पाच हजार आहे. त्यांची नावे यादीतून वगळायला हवीत. तसेच मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे दुस-या प्रभागात टाकण्यात आल्याचे दिसून येत आहे. मतदार यादीतील गलथानपणास जबाबदार असणारांवर कारवाई करावी.

मनसेचे अँड. किशोर शिंदे म्हणाले की, संपूर्ण शहरातील मतदार यादीत मोठा गोंधळ असल्याने प्रथम ती व्यवस्थित करुन नंतर नागरिकांना हरकती व सुचनांसाठी सादर करावी अशी आमची मागणी आहे. तसे न झाल्यास आम्ही मनसे स्टाईल आंदोलन करु. सचिन धनकुडे (चेंज इंडिया फाऊंडेशन) आपले नाव मतदार यादीत आहे की नाही किंवा कोणत्या यादीत आहे हे पाहण्या इतकी जागृकता आपल्या लोकात नाही. यासंदर्भात ते राजकीय पक्षांवरच अवलंबून असतात. त्यांचे नाव जर यादीत दिसले नाही तर ते मतदानापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे निवडणूक अधिका-यांची जबाबदारी आहे की यादी बनवतानाच ती निर्दोष बनेल. पण येथे ती जबाबदारी पार पाडलेली दिसत नाही.

पदनिर्देशित अधिकारी संदीप कदम म्हणाले की, नागरिकांनी आपली नावे मतदार यादीत आहे की नाही याची खातरजमा करुन घ्यावी. त्यात काही दुरुस्ती, हरकत असेल १ जुलैपर्यंत ती नोंदवावी. जवळच्या क्षेत्रिय कार्यालयात सुध्दा हरकत नोंदवता येते. प्रभागातील सीमा रेषेवरील भागात राहणा-या नागरीकांबाबत मतदार यादीत कधी कधी दुस-या प्रभागात गेल्याच्या घटना घडतात. नागरिकांनी ते निदर्शनास आणून दिल्यास खातरजमा करुन योग्य ते बदल केले जातील.

  • मतदार यादी कोठे पाहता येईल– ऑनलाईन पुणे मनपा संकेत स्थळ व मनपाची सर्व क्षेत्रिय कार्यालये हरकत सुचना नोंदविण्याची अंतिम तारीख - १ जुलै २०२२ अंतिम यादी प्रसिध्दी तारीख - ९ जुलै

  • यादी क्रं. १३० – प्रभाग क्रं. ३० जयभवानीनगर – केळेवाडी येथील संपूर्ण इंदिरापार्क -एकूण मतदार ७७४ -यातील मतदार प्रभाग क्रं. १६ फर्ग्युसन कॉलेज – एरंडवणा मध्ये दाखवले आहेत.

  • यादी क्रं. १४५ – राऊतवाडी, रामबाग कॉलनी प्रभाग क्रं. ३०. जयभवानीनगर – केळेवाडी येथील १३२० मतदार प्रभाग क्रं. ३१ कोथरुड गावठाण- शिवतीर्थनगर मध्ये दाखवले आहेत.

  • यादी क्रं. १७७ – स. नं. १२० जयभवानीनगर चाळ क्रं. ११, मनपा शाळा जयभवानीनगर, चाळ क्रं. १० जयभवानीनगर येथील ११९४ मतदार प्रभाग क्रं. ३१ कोथरुड गावठाण- शिवतीर्थनगर मध्ये दाखवले आहेत.

  • यादी क्रं. १९९ हनुमाननगर मधील १०६ मतदार प्रभाग क्रं. ३१ कोथरुड गावठाण- शिवतीर्थनगर मध्ये दाखवले आहेत. ही चार उदाहरणे पाहिली तर प्रभाग क्रं. ३० मधील ३३९४ मतदार प्रभाग क्रं. १६ व ३१ मध्ये टाकण्यात आले आहेत.

Web Title: Pune Municipal Corporation Election New Ward Structure Voter List

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..