पुणे महापालिकेचा वीज खर्च जाणार ३०० कोटीवर? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Electricity

वीज दरात ३७ टक्क्यांची वाढ होणार असल्याने महापालिकेलाही त्याचा शॉक बसण्याची शक्यता आहे.

Electricity Costs : पुणे महापालिकेचा वीज खर्च जाणार ३०० कोटीवर?

पुणे - वीज दरात ३७ टक्क्यांची वाढ होणार असल्याने महापालिकेलाही त्याचा शॉक बसण्याची शक्यता आहे. प्रस्तावित केलेल्या दरानुसार वाढ केली तर वर्षाला किमान ९० कोटी रुपये वीज बिलाचा खर्च वाढणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या पुणे महापालिका वीजबिल पोटी दरवर्षी २१० कोटी रुपये खर्च होतो.

पुणे महापालिकेचे मैलापाणी शुद्धीकरण केंद्र, जल शुद्धीकरण केंद्र, पथदिवे, सर्व कार्यालये, महापालिकेच्या शाळा, उद्याने, नाट्यगृहे, संग्रहालय, पार्किंग, क्रीडांगण, कचरा प्रकल्प, बायोगॅस प्लांट, हॉट मिक्स प्लांट, स्मशानभूमी यासह अन्य ठिकाणी विजेचा वापर केला जातो. महावितरणतर्फे नाट्यगृह व इतर व्यावसायिक वापराच्या इमारतींना प्रति युनिट १३ रुपये वीज बिल आकारले जाते. तर इतर ठिकाणी ७.५० रुपये वीज आकार आहे. महापालिकेचा एका वर्षाला सुमारे ४० कोटी वीज युनिटचा वापर करत असून, त्यासाठी २०१ कोटी रुपयांचे वीज बिल भरले जात आहे.

वीज उत्पादनाचा खर्च वाढल्याने आणि नुकसान भरून काढण्यासाठी महावितरणकडून ३७ टक्के वीज दरवाढ प्रस्तावित केली आहे. त्याचा अद्याप अंतिम निर्णय झालेला नसून वीज नियामक आयोगाकडे त्यावर सुनावणी सुरू आहे.

‘महावितरणतर्फे नाट्यगृहासाठी १३ रुपये या व्यावसायिक दराने वीज दर आहे. तर पाणी शुद्धीकरण, मैलापाणी शुद्धीकरण, पथ दिवे यासह सर्व वीज वापरासाठी साधारणपणे ७.५० रुपये युनिट दर आहे. वीज बिलात ३७ टक्के वाढ सुचविण्यात आली आहे, त्याची अंमलबजावणी झाली तर महापालिकेचा खर्च सुमारे ९० कोटीने वाढेल. त्यामुळे अर्थसंकल्पात ३०० कोटी रुपयांची तरतूद करावी लागेल.’

- श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग

प्रमुख विभागांचा होणारा वीज वापर आणि त्याचे बिल

विभाग - वीज बिलासाठीचा खर्च

मैलापाणी शुद्धीकरण केंद्र -२०.८३कोटी

जल शुद्धीकरण केंद्र - १२३.१२कोटी

पथदिवे - ५० कोटी

रुग्णालये - १.९६ कोटी

नाट्यगृहे -३०.२५ लाख

स्मशानभूमी -७६.७६ लाख

शाळा ३.३३ कोटी

क्षेत्रीय कार्यालये - १.३० कोटी

कचरा प्रकल्प - ९१.१८ लाख

क्रीडांगणे - ४.९१ लाख

हॉटमिक्स प्लांट - २१.२७ लाख

बायोगॅस प्लांट - ७०.०४लाख

इतर - २४.२८ लाख