
पुणे : गणेशखिंड तीन तर पाषाण रस्त्यावर एक असे चार भुयारी मार्ग (ग्रेड सेपरेटर) उभारण्याचे नियोजन महापालिकेकडून करण्यात आले आहे. त्यापैकी आचार्य आनंदऋषीजी महाराज चौकात (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) उड्डाणपुलाच्या कामाबरोबरच शिवाजीनगर ते औंधकडे जाणारा भुयारी मार्गाचे काम पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात येणार आहे. मात्र, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) गणेशखिंड रस्त्यावर शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो, उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर असताना महापालिकेच्या भुयारी मार्गाचे काम अजून इस्टीमेटमध्ये अडकले आहेत.
गणेशखिंड रस्त्यावरील उड्डाणपूल चुकल्याने लॉकडाऊनच्या काळात हा पूल पाडण्यात आला. त्यानंतर आता या ठिकाणी मेट्रो आणि वाहने यासाठी दुमजली उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सर्वात वर मेट्रो मार्ग, त्याखाली वाहनांसाठी उड्डाणपूल बांधला जाईल. त्याखाली ४५ मीटरचा रस्ता असणार आहे. २५ नोव्हेंबर, २०२१ पासून या मेट्रो मार्गाचे काम सुरू झाले असून, १ एप्रिल २०२५ नंतर या मार्गावरून प्रत्यक्ष मेट्रो धावणार आहे. सध्या मेट्रोचे काम सुरू असताना विद्यापीठ चौक परिसरात आणि औंध, बाणेर, पाषाणच्या रस्त्यावर भयंकर वाहतूक कोंडी होत आहे. अवघ्या काही मिनिटांच्या प्रवासासाठी
एका तासापेक्षा कोंडीत थांबावे लागत असल्याने या भागातील नागरिक हैराण झाले आहेत.
गणेशोत्सवानंतर पीएमआरडीएकडून विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे काम सुरू होईल. हे काम नोव्हेंबर २०२४ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे. औंध, पाषाण, औंधकडे जाणाऱ्या या दुहेरी उड्डाणपूल बांधले जातील. विद्यापीठ चौक, हरेकृष्ण रस्ता, शिमला आॅफिस चौक आणि अभिमान श्री सोसायटी असे चार भुयारी मार्ग करणार आहे. शिवाजीनगर- औंध रस्त्याच्या भुयारी मार्गाचा डीपीआर आॅक्टोबर २०२२ पर्यंत प्राप्त होऊन, डिसेंबरमध्ये कामाचे आदेश दिले जातील. पीएमआरडीचे मेट्रो आणि उड्डाणपुलाचे काम सुरू असताना त्या सोबतच हे काम सुरू असणार आहे. जानेवारी २०२५ पर्यंत हे काम पूर्ण होईल असा दावा आयुक्त विक्रम कुमार यांनी केला आहे.
असा असणार उड्डाणपूल
विद्यापीठ चौकात पीएमआरडीएकडून दुहेरी उड्डाणपूल बांधला जाणार आहे. त्यासाठी २७७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. हा उड्डाणपूल ८८१ मीटर लांबीचा आणि ६ पदरी असणार आहे. या पुलावरून औंधकडे जाण्यासाठी २६० मीटरच्या दोन लेन, बाणेर रस्त्यासाठी १४० मीटर लांबीच्या चार लेन, पाषाण रस्त्यासाठी १३५ मीटरच्या दोन लेन असणार आहेत. सेनापती बापट रस्त्यावरून शिवाजीनगरकडे जाण्यासाठी विद्यापीठ चौकात येऊन यू टर्न घेऊन पुढे जावे लागणार आहे. तर याच रस्त्यावरून औंधकडे जायचे असले तर भुयारी मार्ग वापरावा लागणार आहे. जेथे उड्डाणपूल सुरू होणार आणि संपणार आहे, तेथे दोन्ही बाजूला दोन लेनचे सर्व्हिस रस्ते असणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल यांनी सांगितले.
दोन्ही संस्थांमध्ये समन्वय आवश्यक
उड्डाणपूल पीएमआरडीए बांधणार तर भुयारी मार्ग महापालिका बांधणार आहे.त्यामुळे कामाची गती, वाहतूक नियोजन यासाठी दोन्ही संस्थांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. भर पावसाळ्यात गणेशखिंड रस्त्याला खड्डे पडल्यावर ते बुजवायचे कोणी यावरून दोन्ही संस्थांमध्ये एकवाक्यता नव्हती, त्याचा त्रास पुणेकरांना सहन करावा लागला. मात्र, आता दोन्ही संस्थांकडून एकाच रस्त्यावर स्वतंत्रपणे प्रकल्प केले जाणार आहेत. त्यामुळे समन्वय नसल्यास त्याचा त्रास पुणेकरांना सहन करावा लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.