Breaking : हॉटेल, लॉज, मॉल्सबाबत महापालिकेने घेतला महत्त्वाचा निर्णय; वाचा सविस्तर बातमी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 August 2020

पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी यासाठी राज्यभरातील रूम असलेले हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस सुरू करण्याचा निर्णय सहा जुलैला राज्य शासनाने घेतला होता.

पुणे : व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मिळाल्यानंतरही तो सुरू करता न आल्याने निराश झालेल्या लॉज, रूम असलेले हॉटेल, मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स आणि गेस्ट हाउस चालकांना आता काहीसा दिलासा मिळाला आहे. शहरातील हॉटेल आणि लॉज आता बुधवारपासून (ता.५) सुरू होणार आहेत. मात्र, त्या ठिकाणी गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

याबाबतचा अध्यादेश सोमवारी (ता.३) महापालिकेकडून जारी करण्यात आला आहे. हा आदेश केवळ रूम असलेले हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊस पुरता मर्यादित आहे. त्यामुळे जेवणाची सुविधा पुरवणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांना आणखी काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. पार्सल मात्र सुरू राहतील. पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी यासाठी राज्यभरातील रूम असलेले हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस सुरू करण्याचा निर्णय सहा जुलैला राज्य शासनाने घेतला होता.

पंधरावा वित्त आयोग पावला; जिल्ह्याच्या तिजोरीत 'इतक्या' कोटींची पडली भर!​

त्यानंतर केवळ जेवण पुरवणारे हॉटेल सुरू होण्याची शक्यता होती. मात्र हॉटेल सुरू झाले तर शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू शकतो. त्यामुळे हॉटेल संघटना, पालकमंत्री आणि संबंधित घटकांशी चर्चा करून त्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार होता. मात्र याबाबत चर्चा होऊन हॉटेल पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होण्याआधीच शहरात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे व्यवसाय सुरू होण्याच्या आशेवर असलेल्या रूम असलेले हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊस चालकांची प्रतीक्षा वाढली होती. 

अध्यादेशात काय म्हटले आहे ? 
- संबंधित हॉटेल-लॉज प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर असावे.
- रूम असलेले हॉटेल-लॉज ३३ टक्के क्षमतेत सुरू होतील.
- सुरक्षाविषयक सर्व खबरदारी हॉटेल-लॉज चालकाने घ्यावी.
- डिजिटल पेमेंटचे पर्याय उपलब्ध करावेत.
- नियम पाळूनच एसी  सुरू करावेत.
- कोरोनाची लक्षणे असलेल्या ग्राहकांची माहिती प्रशासनाला पुरवावी. 
- रूम खाली झाल्यानंतर २४ तास ती कोणालाही देऊ नये.
- लिफ्ट, पाण्याचे ठिकाण आणि स्वच्छतागृहे सतत साफ करावी.
- मास्क, ग्लोज आणि इतर नेहमीच्या वापरातील वस्तूची सुरक्षित विल्हेवाट लावावी.

पुण्यातील 'जम्बो हॉस्पिटल'चा श्रीगणेशा; १७ दिवसांत होणार हॉस्पिटलची उभारणी!​

हॉटेल्स-लॉजसाठी नियम

- एकूण क्षमतेच्या ३३ टक्के जागेचा वापर करावा.
- कोरोनाची लक्षणे असलेल्यांना प्रवेश नाही.
- स्वागतकक्षाभोवती काचेचे आवरण असावे.
- कामगार, ग्राहकांना मास्क, हातमोजे, फेसहेल्ड पुरविणे.
- ग्राहकांसाठी डिजिटल पेमेंट सुविधा पुरवावी.

मॉलसाठीचे नियम 

- बाधित क्षेत्रातील मॉल बंद
- ग्राहक, कामगारांत सहा फुटांचे अंतर असावे
- मास्क, फेस हेल्थ, हात धुण्याची सोय
- थुंकल्यास कारवाई
- कामगारांनी आरोग्य सेतू या अॅपचा वापर करावा
- मॉलच्या दारात थर्मल स्क्रीनिंग
- पार्किंगमधील कामचाऱ्यांनी मास्क,हातमोजेचा वापर करावा
- लिफ्टमधील व्यक्तींची संख्या मर्यादित ठेवावी
- एकत्र येणे, गर्दीवर बंधने
- मॉलमध्ये लक्षणे आढळून आलेल्या व्यक्तीला विलग करणे

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Municipal Corporation has issued ordinances regarding opening of lodges, guest houses and malls