
राज्य शासनाने डॉ. भारती यांची ३० सप्टेंबर २०२० रोजी एका वर्षासाठी पुणे महापालिकेच्या आरोग्यप्रमुख पदी प्रतिनियुक्तीने नियुक्ती केली होती.
Dr. Ashish Bharati : पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारतींची बदली
पुणे - पुणे महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांची महापालिकेतील सेवा संपुष्टात आली असून, त्यांना राज्य शासनाच्या म्हणजेच उपसंचालक आरोग्य सेवा विभागात हजर होण्याचे आदेश राज्य शासनाचे अवर सचिव चंद्रकांत वडे यांनी काढले आहेत. नवे आरोग्यप्रमुख नियुक्त होईपर्यंत हा अतिरिक्त कार्यभार महापालिकेच्या आरोग्य विभागात कोणाला मिळणार याकडे लक्ष लागले आहे.
राज्य शासनाने डॉ. भारती यांची ३० सप्टेंबर २०२० रोजी एका वर्षासाठी पुणे महापालिकेच्या आरोग्यप्रमुख पदी प्रतिनियुक्तीने नियुक्ती केली होती. त्यांचा हा कालावधी संपल्यानंतर पुन्हा ५ ऑक्टोबर २०२१ ते ४ ऑक्टोबर २०२२ अशी एका वर्षासाठी त्यास मुदतवाढ दिली होती. त्यानंतर भारती यांना मुदतवाढ दिल्याचे पत्र आलेले नव्हते. त्याबद्दल महापालिका प्रशासनात चर्चाही सुरू होती. मात्र आज शासनाने आज भारती यांची बदली केल्याचे आदेश काढले आहेत.
डॉ. भारती यांची प्रतिनियुक्तीवरील सेवा संपुष्टात आणण्यात आली आहे. त्यामुळे पुढील आदेश होईपर्यंत भारती यांनी त्याचा आरोग्य प्रमुख पदाचा पदभार महापालिकेतील सक्षम प्राधिकारी यांच्याकडे सुपूर्त करून पुण्यातील उपसंचालक आरोग्य सेवा कार्यालयात हजर व्हावे असे आदेशात नमूद केले आहे. भारती यांची बदली झाल्याने त्यांच्या या रिक्त जागेचा कार्यभार अतिरिक्त आयुक्तांकडे दिला जाणार की आरोग्य विभागातील सहाय्यक अधिकाऱ्यांपैकी एकाकडे द्यायचा याचा निर्णय आयुक्त विक्रम कुमार घेतील.