Pune Municipal Hospital : पालिकेच्या स्त्रीरोग तज्ज्ञांच्या निम्म्या जागा रिक्तच

पुणे पालिकेच्या दोन रुग्णालयांमध्येच आव्हानात्मक आणि गुंतागुंतीच्या प्रसूती
Kamala Nehru Hospital Pune
Kamala Nehru Hospital PuneSakal
Summary

पुणे पालिकेच्या दोन रुग्णालयांमध्येच आव्हानात्मक आणि गुंतागुंतीच्या प्रसूती

पुणे - ‘मुलगी ‘डिलिव्हरी’साठी माहेरी आली होती. आठवा महिना होता. पहाटेपासूनच अचानक पोटात दुखू लागले. जवळच्या महापालिकेच्या दवाखान्यात गेले. तेथील डॉक्टरांनी तपासले आणि तातडीने कमला नेहरू रुग्णालयात पाठविले. येथे आल्यानंतर मुलीची अवस्था बघून तिची प्रसूती करण्यात आली. कमला नेहरू रुग्णालयात येईपर्यंत आम्ही हवालदिल झालो होतो. आमच्यावर वेळ आली होती, पण काळ आला नव्हता..’ कमला नेहरू रुग्णालयात प्रसूती झालेल्या गर्भवतीची आई बोलत होती...

त्या म्हणाल्या, ‘पुण्यात चांगले दवाखाने आहेत, म्हणून पहिल्याच ‘डिलिव्हरी’साठी मुलीला हट्टाने पुण्यात आणले.’ अशा परीस्थितीत महापालिकेची १८ प्रसूती केंद्रे असली तरीही प्रत्यक्षात स्त्रीरोग तज्ज्ञांच्या १५ पैकी सात जागा (सुमारे ४७ टक्के) रिक्त आहेत. त्यामुळे प्रसूती केंद्र नावालाच असून, तेथे प्रसूती होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे तेथून गर्भवतीला या दोन रुग्णालयांमध्ये पाठविले जाते.

पायाभूत आरोग्य सेवा विस्कळित

मुंबई महापालिका कायद्यानुसार, शहराच्या हद्दीमध्ये आरोग्याच्या पायाभूत सुविधा देण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर निश्चित केली आहे. त्यामुळे शहरात प्रसूती आणि प्रसूतिपूर्व सेवा देण्याची संपूर्ण जबाबदारी महापालिकेची असते. मात्र, शहरातील कमला नेहरू आणि सोनवणे या दोनच रुग्णालयांमध्ये आव्हानात्मक आणि गुंतागुंतीच्या प्रसूती केल्या जातात. महापालिकेच्या इतर रुग्णालयांमधून या रुग्णांना या दोन ठिकाणी पाठविले जाते. या गर्भवतीच्याबद्दलही हीच घटना घडली. त्यामुळे महापालिकेच्या पायाभूत आरोग्य सेवा विस्कळित झाल्याचे दिसते.

डॉक्टरांच्या भरतीकडे दुर्लक्ष

महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेत स्त्री रोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ आणि बालरोग तज्ज्ञ या तीन विशेषज्ज्ञ डॉक्टरांचे स्थान पायाभूत आरोग्य सेवेत महत्त्वाचे ठरते. पुणे महापालिकेत भूलतज्ज्ञांच्या पाच जागा मंजूर आहेत. त्यापैकी तीन जागा भरल्या आहेत. तसेच, बालरोग तज्ज्ञांच्या १३ पैकी ८ जागा रिक्त आहेत. जेमतेम पाच बालरोगतज्ज्ञांवर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये येणाऱ्या बालकांना आरोग्य सेवा मिळत आहे.

वर्ग एकच्या ७५ टक्के जागा रिक्त

आरोग्य अधिकारी, उपआरोग्य अधिकारी, सहाय्यक आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिक्षक या चार प्रशासकीय पदांसह वेगवेगळ्या ३० वैद्यकीय शाखेतील विशेष तज्ज्ञांच्या १४२ जागा मंजूर केल्या आहेत. त्यापैकी फक्त ३६ जागा (२५ टक्के) भरलेल्या आहेत. उर्वरित १०६ जागा (७५ टक्के) रिक्त आहेत. त्यावरून महापालिकेच्या आरोग्य विभागाची ‘अत्यवस्थ’ झालेली स्थिती स्पष्ट होते.

  • १८ - महापालिकेची प्रसूती केंद्र

  • १६ - रुग्णांना संदर्भ सेवा

कमला नेहरू व सोनवणे रुग्णालय गुंतागुंतीची प्रसूती

  • १५ - स्त्रीरोग तज्ज्ञांच्या जागा

  • ७ - रिक्त जागा

  • ५ - भूलतज्ज्ञ जागा मंजूर

  • ३ - जागा भरल्या

  • १३ - बालरोग तज्ज्ञ जागा

  • ८ - रिक्त जागा

शहरात गेल्या वर्षी १७ हजार १०६ गर्भवतींची नोंद झाली होती. तर, सात हजार ५३२ प्रसूती झाल्या होत्या. या रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागातील काही पदे ही करार तत्त्वावर भरण्यात आली आहेत.

- डॉ. प्रल्हाद पाटील, आरोग्य प्रशासकीय अधिकारी

महापालिकेच्या प्रसूतीगृहांमध्ये किती स्त्री रोग तज्ज्ञ आहेत, यापेक्षा त्या केंद्रांमध्ये पात्र स्त्री रोग तज्ज्ञ आहे ना?, हे पाहणे जास्त महत्त्वाचे असते. त्यामुळे मंजूर केलेल्या जागांप्रमाणे तेथे तज्ज्ञ डॉक्टर असणे आवश्यक आहे.

- डॉ. पराग बिनीवाले, स्त्रीरोग तज्ज्ञ

महापालिका रुग्णालयांमधील आरोग्यसेवा व विस्कळित पायाभूत सुविधांबाबत तुम्हालाही काही अनुभव आला आहे का?, याबाबत तुमचे मत नावासह क्यूआर कोड स्कॅन करून किंवा editor.pune@esakal.com या मेलवर, तसेच ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com