रुग्णवाहिकांत ऑक्‍सिजन सुविधा; कोरोना रूग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी पुणे महापालिकेचा पुढाकार 

ज्ञानेश सावंत - सकाळ वृत्तसेवा 
Monday, 21 September 2020

सध्या 2.40 टक्के इतका मृत्युदर असून व्हेंटिलेटर व ऑक्‍सिजनच्या पुरेशा उपलब्धतेमुळे मृत्युदर आणखी कमी होऊ शकतो, असे महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले. 

पुणे  - कोरोनाच्या अत्यवस्थ रुग्णांना घरापासून रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी 130 रूग्णवाहिकांमध्ये ऑक्‍सिजनची सुविधा उपलब्ध होणार आहे. रुग्णाला वेळेत ऑक्‍सिजन मिळाल्यास व्हेंटिलेटरची गरज भासणार नसल्याने महापालिकेने हा पर्याय निवडला आहे. त्यामुळे मृत्यूदर कमी होण्याची आशा आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाबाधितांना धाप लागण्यापासून श्‍वास घेण्याचा त्रास वाढल्याने ऑक्‍सिजन आणि व्हेंटिलेटरची मागणी वाढली आहे. मात्र,  खासगी, महापालिकेच्या रुग्णालयांत पुरेसे व्हेंटिलेटर नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. परिणामी, मृत्युदर कमी होत नसल्याचे दिसून आले आहे. अशा स्थितीत साडेतीन हजार रुग्णांना ऑक्‍सिजनची सुविधा पुरविली गेली आहे. तर विविध रुग्णालयांत एक हजार रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. यातील काही रुग्णांना पहिल्यांदा ऑक्‍सिजन आणि त्यानंतर व्हेंटिलेटर वेळेत न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे काही उदाहरणे आहेत. रुग्णाला श्‍वास घेण्यास त्रास जाणवू लागल्यानंतर कमीतकमी वेळेत ऑक्‍सिजन न मिळाल्याने त्यांची प्रकृती बिघडून व्हेंटिलेटरची गरज भासत असल्याचे डॉक्‍टरांचे निरीक्षण आहे. त्यामुळे सर्व पातळ्यांवर रुग्णांना ऑक्‍सिजनची सुविधा पुरविण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रुग्णांचा धोका टळणार 
ज्यांच्या फुफ्फुसावर अधिक परिणाम झाला असून श्‍वास घेणे शक्‍य होत नाही, त्यांना वेळेत ऑक्‍सिजन दिल्यास त्यांच्या जिवाचा धोका टळणार आहे. सध्या 2.40 टक्के इतका मृत्युदर असून व्हेंटिलेटर व ऑक्‍सिजनच्या पुरेशा उपलब्धतेमुळे मृत्युदर आणखी कमी होऊ शकतो, असे महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अत्यवस्थ रुग्णांना रुग्णवाहिकांमध्येही आवश्‍यक ती उपचार व्यवस्था उपलब्ध करीत आहोत. ज्या रुग्णांना तातडीने व्हेंटिलेटरची गरज असेल, त्यांना रुग्णवाहिकांमधील ऑक्‍सिजनचा आधार देऊन, सुरक्षितपणे रुग्णालयापर्यंत पोचविण्याची सोय होणार आहे. 
- रुबल अग्रवाल,  अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका 

अशी आहे स्थिती.... 
702  - महापालिका रुग्णालय व जम्बोतील ऑक्‍सिजन बेड 
-------------------------- 
3 हजार 361  - खासगी रुग्णालयांतील ऑक्‍सिजन बेड 
--------------------------- 
3 हजार 530 - ऑक्‍सिजन पुरविलेले रुग्ण 
------------------------------- 
130  - महापालिकेच्या रुग्णवाहिका 
------------------------------ 
30  -ऑक्‍सिजन असलेल्या रुग्णवाहिका 
------------------------------- 
100  - ऑक्‍सिजन उपलब्ध होणाऱ्या रुग्णवाहिका 

------------------------------ 
जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नव्या रुग्णवाहिकांतील सुविधा 
- ऑक्‍सिजन सिलिंडर (मध्यम आकाराचा) 
- ट्युबिंग 
- मास्क 
- तज्ज्ञ डॉक्‍टर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Municipal Corporation initiative to reduce mortality patients Corona