पुणे महापालिकेडून शहरात 21 ठिकाणी उड्डाणपुल, ग्रेड सेपरेटर; विक्रम कुमार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Municipal Commissioner Vikram Kumar

शहरातील वाहतुक कोंडीच्या समस्येचा सर्वसामान्य नागरीकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. विशेषतः पावसाळ्यामधील सततच्या वाहतुक कोंडीमुळे नागरीक त्रस्त होतात.

Pune Flyover : पुणे महापालिकेडून शहरात 21 ठिकाणी उड्डाणपुल, ग्रेड सेपरेटर; विक्रम कुमार

पुणे - शहरातील वाहतुक कोंडीची समस्या सोडविण्याबरोबरच वाहतुकीला गती देण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून शहरात तब्बल 21 ठिकाणी उड्डाणपुल, भुयारी मार्ग, ग्रेड सेप्रेटर, नदी व लोहमार्गावरील पुल बांधण्याची चाचपणी केली जात आहे. त्यासाठी सल्लागारांची लवकरच नियुक्ती केली जाणार असून सल्लागार अहवालानंतर कमी अडचणीच्या ठिकाणी संबंधित कामांसाठीची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सोमवारी दिली.

शहरातील वाहतुक कोंडीच्या समस्येचा सर्वसामान्य नागरीकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. विशेषतः पावसाळ्यामधील सततच्या वाहतुक कोंडीमुळे नागरीक त्रस्त होतात. शहरातील एकूणच वाहतुक समस्येचा फटका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते केंद्रीय मंत्री, आंतराराष्ट्रीय कंपन्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही वारंवार बसला आहे. वाहतुकीची हि समस्या सोडविण्यासाठी व त्यावर उपाययोजना करण्यासाठी शहरातील मोठ्या रस्त्यांवर उड्डाणपुल, भुयारीमार्ग यांसारखे पर्याय शोधण्याच्यादृष्टीने महापालिकेचे प्रयत्न सुरु आहेत.

त्यादृष्टीने रहदारीच्या ठिकाणचे मोठे रस्ते, नदी व लोहमार्ग अशा विविध ठिकाणी उड्डाणपुल, भुयारी मार्ग, ग्रेड सेप्रेटर अशा विविध प्रकारच्या उपाययोजना करुन वाहतुकीला गती देण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुुर केले आहेत. त्यादृष्टीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाजवळील मेट्रो मार्गिकेवर दुहेरी उड्डाणपुल तसेच गणेश खिंड रस्त्यावर भुयारी मार्गाचेही महापालिकेने यापुर्वी नियोजन आहे. तसेच काही ठिकाणी खासगी सहभागातुन (पीपीपी) पुल, भुयारी मार्गांच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, "" शहरातील वाहतुकीवर उपाययोजना करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्यावतीने दोन हजार कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. त्यानुसार, शहरात उड्डाणपुल, नदीवरील पुल व मोठ्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी व अन्य कामे करण्यासाठी महापालिका स्तरावर प्राथमिक अभ्यास करण्यात आला आहे. त्यानुसार सध्या सुरू असलेल्या कामांसोबतच 21 ठिकाणी उड्डाणपुल, नदी व लोहमार्गावरील पुल, भुयारी मार्ग तयार करण्याचे प्रस्तावित आहे. अडथळे कमी असणाऱ्या 15 ठिकाणी कामे करण्याचा विस्तृत आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यांच्या अहवालानंतर पुढील कामे सुरु होतील.''

अशी आहेत संभाव्य उड्डाणपुल/पुल/भुयारी मार्ग

- मुंढवा ताडीगुत्ता चौक ते वडगावशेरी नदीवरील पुल

- कोरेगाव पार्क ते कल्याणीनगर यांना जोडणारा पुल

- पानमळा येथून कर्वे रोड व सिंहगड रोडला जोडणारा पुल

- पुणे स्टेशन व संगमवाडी जोडणारा लुंबिनीनगर येथील पूल.

- संगमवाडी येथील बिंदू माधव ठाकरे चौकात ग्रेडसेपरेटर/ उड्डाणपुल

- येरवडा येथील आंबेडकर चौकात ग्रेड सेपरेटर/ उड्डाणपुल

- विश्रांतवाडी चौकात ग्रेडसेपरेटर/ उड्डाणपुल

- सोलापूर रस्त्यावरील काळूबाई चौकात ग्रेड सेपरेटर/ उड्डाणपुल

- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाजवळील चौकात ग्रेड सेप्रेटर

- हरेकृष्ण मंदिर येथे ग्रेडसेपरेटर

- शिवाजीनगर येथील चौकात ग्रेड सेपरेटर

- मुंढवा चौक येथे उड्डाणपुल/ ग्रेडसेपरेटर

- दांडेकर पुल येथे ग्रेडसेपरेटर/ उड्डाणपुल

लोहमार्गावरील उड्डाणपुल

- घोरपडी - साधु वासवानी पुल

- कोरेगाव पार्क - ससाणेनगर येथे उड्डाणपुल/ ग्रेडसेपरेटर

- फुरसुंगी चौक.