पुणे महापालिकेची वेबसाइट क्रॅश; मिळकतकराची ऑनलाइन यंत्रणा ठप्प

प्रामाणिकपणे कर भरण्यासाठी महापालिकेच्या ढिसाळ आणि बेफिकीर कारभाराचा फटका पुणेकरांना बसला.
pune municipal corporation website
pune municipal corporation websiteSakal
Summary

प्रामाणिकपणे कर भरण्यासाठी महापालिकेच्या ढिसाळ आणि बेफिकीर कारभाराचा फटका पुणेकरांना बसला.

पुणे - प्रामाणिकपणे कर भरण्यासाठी महापालिकेच्या ढिसाळ आणि बेफिकीर कारभाराचा फटका पुणेकरांना बसला. मिळकतकराची सवलत घेण्यासाठी अखेरचा दिवस असल्याने सकाळपासून पुणेकरांनी ऑनलाइन कर भरण्यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळाला भेट दिली. मात्र, पैसेच भरता येत नसल्याने प्रयत्न करून नागरिक हैराण झाले. सकाळी १० वाजता क्रॅश झालेले संकेतस्थळ रात्री १० वाजून गेले तरी सुरू झाले नाही. मात्र, याचे कारण काय याचे उत्तर देण्यासाठी अधिकारी तयार नव्हते. मिळकतकर विभागाच्या प्रमुखांनी ही सर्व जबाबदारी संगणक विभागावर (आयटी) ढकलून दिली. यानिमित्ताने स्मार्ट महापालिकेचा बेजबाबदार कारभार समोर आला आहे.

पुणे महापालिकेतर्फे १ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांनी ५ ते १० टक्के सवलत दिली जाते. या दोन महिन्यात मोठ्याप्रमाणात कर भरला जात असल्याने आर्थिक वर्षाच्या सुरवातीला महापालिकेच्या गंगाजळीत मोठी रक्कम जमा होते. यंदाच्या वर्षी महापालिकेने २१०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे, त्यामुळे या दोन महिन्यात उत्पन्न महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच अनेक नागरिकांना मिळकतकराची वाढीव बिले आलेली आहेत, त्याचे समाधानकारक उत्तरे प्रशासन देऊ शकलेले नाही. तरीही नागरिकांनी कर न थकवता एप्रिल व मे महिन्यात मिळकतकर भरला. सोमवारपर्यंत (ता. ३०) ८२८ कोटी रुपयांचा कर जमा झाला होता. शेवटचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा असतो. या एका दिवसात यापूर्वी ५० कोटी पेक्षा जास्त कर जमा झालेला आहे.

मिळकतकराच्या सवलतीसाठी आजचा दिवस शेवटचा असल्याने नागरिकांनी सकाळपासूनच ऑनलाइन कर भरण्यासाठी मोबाईल, संगणक, लॅपटॉपवर प्रयत्न केले. संकेतस्थळ उघडले तरी शेवटच्या टप्प्यावर पैसे भरता येत नव्हते. अनेकदा प्रयत्न करूनही पैसे भरत नसल्याने नागरिकांनी महापालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना फोन करून चौकशी केली. त्यावर सिस्टीम क्रॅश केल्याचे उत्तर मिळाले.

ऑनलाइन पैसे भरता आले नाही तर सवलत मिळणार नाही या धास्तीने अनेक नागरिकांनी मुख्य महापालिका भवनासह क्षेत्रीय कार्यालयांवर धाव घेतली, तेथेही पैसे भरण्यासाठी लांबच्या लांब रांगा लागल्या पण सिस्टीम चालत नसल्याने तेथेही भरण्यात अडचणी येत होते. संध्याकाळ उलटून गेली तरी या रांगा कमी झाल्या नव्हत्या.

महापालिकेची ढिम्म यंत्रणा

शेवटच्या दिवशी मोठ्याप्रमाणात कर भरला जातो. विशेष म्हणजे एकूण कर भरणाऱ्यांमध्ये ७० टक्के नागरिक ऑनलाइन कर भरण्यास प्राधान्य देतात. असे असताना मिळकतकर विभाग आणि संगणक विभागाने संकेतस्थळावर ताण आल्याने ते बंद पडू नये यासाठी सतर्क असणे आवश्‍यक असते. समस्या निर्माण झाली तरी पुढील काही काळात ती सुरू होणे अपेक्षीत असते. मात्र, आज १२ तास उलटून गेले तरी संकेतस्थळावर पैसे भरता आले नसल्याने महापालिकेचा ढिम्म कारभार समोर आला. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, संगणक विभागाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद दिला नाही.

तर मग धनादेश द्या

ऑनलाइन कर भरता येत नसल्याबद्दल मिळकतकर विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता ‘आत्तापर्यंत ९०० कोटी रुपये जमा झाले आहेत, ऑनलाइन कर भरता येत नाही तर धनादेश द्या’ असे त्यांनी सांगितले. पण त्यावर अधिक खोलात जाऊन विचारण्याचा प्रयत्न केला असता ‘याबाबत मला माहिती नाही, संगणक विभागाला विचारा’ असे सांगून देशमुख यांनी दुसऱ्या विभागाकडे बोट दाखविले.

‘शेवटच्या दिवशी अनेक पुणेकर कर भरतात, हे माहिती असून देखील महापालिका प्रशासनाने त्याची पूर्वतयारी न केल्याने ऑनलाइन सेवा बंद पडली. स्वतःला स्मार्ट म्हणवून घेणाऱ्या महापालिकेला असा कारभार शोभत नाही.’

- जान्हवी प्रभुणे

‘मिळकतकराचे संकेतस्थळ गेल्याकाही दिवसांपासून वारंवार बंद पडत आहे, पण प्रशासन त्याकडे लक्ष देण्यास तयार नाही.या बेजबाबदार कारभाराचा फटका पुणेकरांना बसला आहे, त्यामुळे कर भरण्यास मुदतवाढ द्या.’

- नितीन कदम, अध्यक्ष, अर्बन सेल, राष्ट्रवादी काँग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com