पुण्यात ‘चमकोगिरी’साठी ठरावाचा विसर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salisbary park

माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी सॅलिसबरी पार्क येथील नव्या उद्यानाला रात्रीतून ‘यशवंतराव भिमाले उद्यान’ असे नाव दिले आहे.

पुण्यात ‘चमकोगिरी’साठी ठरावाचा विसर

पुणे - महापालिकेचे उद्यान, (Garden) रस्ते, चौकाला नगरसेवकांच्या कुटुंबीयांचे (Corporator Family) नाव देण्याचा प्रघातच जणू सर्वपक्षीय नगरसेवकांनी घेतला आहे. उद्यानांना केवळ राष्ट्रीय नेत्यांची, वनस्पतीशास्त्रज्ञ किंवा संशोधकांची नावे द्यावेत असा ठराव २२ वर्षांपूर्वी महापालिकेत (Municipal) मंजूर झाला आहे. मात्र, त्याचा नगरसेवकांना सोईस्कर विसर पडलाच, तर प्रशासनानेही बघ्याची भूमिका घेतल्याचे उघड झाले आहे.

माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी सॅलिसबरी पार्क येथील नव्या उद्यानाला रात्रीतून ‘यशवंतराव भिमाले उद्यान’ असे नाव दिले आहे. या भागात राहणाऱ्या नागरिकांनी त्यास तीव्र विरोध केला. तसेच महापालिका आयुक्तांकडे तक्रार करून आंदोलनही केले. शहरातील महापालिकेच्या अनेक उद्यानांना, रस्त्यांना, चौकांना, जलतरण तलाव, क्रीडांगण, बहुउद्देशीय हॉलला नगरसेवकांनी त्यांच्या कुटुंबीयांची नावे दिली आहेत. तसेच कमान, स्मारके, पुतळे उभारल्यावर त्यावर ‘संकल्पना’ म्हणून स्वतःचे नाव समाविष्ट केले आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नगरसेवकांचा त्यात समावेश आहे. नगरसेवकांकडून स्वतःच्याच कुटुंबीयांचे नाव लावले जात असताना त्यास प्रतिबंध घालणारा ठराव २७ जुलै २००० मध्ये पुणे महापालिकेच्या मुख्यसभेत मंजूर झालेला आहे. ‘पुणे महापालिकेच्या हद्दीत असलेल्या उद्यानांना राष्ट्रीय नेत्यांची नावे द्यावीत. तसेच वनस्पतिशास्त्र व पर्यावरण या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचे नाव द्यावेत,’ असा ठराव केला आहे. महापालिकेच्या नाव समितीमध्ये नाव देण्याचा प्रस्ताव आल्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवक एकमताने त्यांना हवे ते नाव देण्यास मंजुरी देऊन टाकतात. त्यामुळे जुलै २००० मध्ये झालेल्या ठरावाचा विचार केला जात नसल्याचे समोर आले आहे.

कुटुंबातील तिघांची नावे

काही नगरसेवकांनी तर प्रभागात केलेल्या विकासकामांना आई, वडील, काका आदींची नावे दिली आहेत. एका नगरसेवकाने तर, कुटुंबातील चौघांची नावे विविध विकासकामांना दिली आहेत. तसेच काही नगरसेवकांनी रस्त्यावर उभारलेले शिल्प, महापालिकेने उभारलेले उड्डाणपूल, भुयारी मार्ग आदींना ‘संकल्पना’ म्हणून स्वतःची नावे दिली आहेत.

सोशल मीडियावर मोहीम

शहराच्या मध्य भागातील एका उद्यानासाठी सिमेंटची कमान बांधली. त्या कमानीला संकल्पना म्हणून स्थानिक नगरसेवकाने त्यावर स्वतःचे नाव टाकले. मात्र, परिसरातील रहिवाशांनी सोशल मीडियावर याबाबत जोरदार मोहीम राबविली. त्यामुळे नगरसेवकाला त्या कमानीवरील नाव काढून टाकावे लागले.

अभिप्रायाविना नाव

महापालिकेच्या कोणत्याही वास्तूस नाव देताना त्यासंदर्भात प्रशासनाचा अभिप्राय घेणे आवश्‍यक असते, पण गेल्या काही वर्षांत अभिप्राय न घेताच परस्पर नाव देण्याचा निर्णय घेतला जात आहे.

महापालिकेत १९९७ ते २००२ या काळात मी नाव समितीचा अध्यक्ष होतो, त्या वेळी आम्ही उद्यानांना राष्ट्रीय नेत्यांची नावे द्यावीत, असा ठराव मुख्यसभेत मंजूर करून घेतला होता. हा ठराव आजही कायम आहे, पण प्रशासनाकडून त्याची अंमलबजावणी केली जात नाही, तसेच सर्वपक्षीय नगरसेवक अशा वेळेस एकत्र येऊन त्यांना हवे ते नाव ठेवण्याचा निर्णय घेतात. हे प्रकार बंद झाले पाहिजेत.

- अंकुश काकडे, माजी महापौर

Web Title: Pune Municipal Corporation Yashwantrao Bhimale Garden Name Issue

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..