नगरसेवकांना ‘वचनपूर्ती’ची आठवण

ज्ञानेश सावंत @SSDnyaneshSakal
रविवार, 11 डिसेंबर 2016

प्रभागांमधील विकासकामांची भूमिपूजने, उद्‌घाटने करण्याचा धडाका

पुणे : महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत म्हणजे पाच वर्षांपूर्वी दिलेल्या वचनांची आठवण नगरसेवकांना आता पुन्हा निवडणुकीच्याच तोंडावर झाली आहे. निवडणुकीतील ‘वचनपूर्ती’ची पूर्तता करण्याचे चित्र उभारण्यासाठी प्रभागांमधील विकासकामांची भूमिपूजने, उद्‌घाटने करण्याचा धडाका या नगरसेवकांनी लावला आहे. सत्ताधाऱ्यांपाठोपाठ विरोधी बाकांवरील नगरसेवकही त्यात मागे राहिलेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.   

प्रभागांमधील विकासकामांची भूमिपूजने, उद्‌घाटने करण्याचा धडाका

पुणे : महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत म्हणजे पाच वर्षांपूर्वी दिलेल्या वचनांची आठवण नगरसेवकांना आता पुन्हा निवडणुकीच्याच तोंडावर झाली आहे. निवडणुकीतील ‘वचनपूर्ती’ची पूर्तता करण्याचे चित्र उभारण्यासाठी प्रभागांमधील विकासकामांची भूमिपूजने, उद्‌घाटने करण्याचा धडाका या नगरसेवकांनी लावला आहे. सत्ताधाऱ्यांपाठोपाठ विरोधी बाकांवरील नगरसेवकही त्यात मागे राहिलेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.   

प्रभागांमधील छोट्या-मोठ्या कामांचे भूमिपूजन आणि उद्‌घाटन आपापल्या पक्षाच्या नेत्यांच्या हस्ते करत, शक्तिप्रदर्शनही करण्याचे आखाडे इच्छुक नगरसेवकांनी आखले आहेत. त्यामुळे पुढील महिनाभर शहरातील बहुतेक प्रभागांमध्ये विकासकामांच्या निमित्ताने कार्यक्रमांचा सपाटा सुरू राहणार आहे.

पालिकेची निवडणूक येत्या फेब्रुवारीत होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी चालविली आहे. निवडणुकीपूर्वी साधारणत: ३५ दिवसआधी आचारसंहिता लागू होण्याची शक्‍यता असल्याने गेल्या निवडणुकीतील आश्‍वासनांची पूर्तता करण्याचा देखावा नगरसेवक करत आहेत. निवडून आल्यानंतर गेली पाच वर्षे ज्या कामांकडे दुर्लक्ष झाले, ती करण्याची घाई त्यांच्याकडून केली जात आहे. त्यानिमित्ताने नव्या प्रभागांमधील मतदारांपर्यंत पोचण्याचा नगरसेवकांचा उद्देश लपून राहिलेला नाही. प्रामुख्याने, रस्ते, चौक, ई-लर्निंग स्कूल, मॉडेल स्कूल, उद्याने, वन उद्याने, स्मारक, पाण्याच्या टाक्‍या, सांस्कृतिक सभागृहांसह विविध कामांच्या भूमिपूजनांचा समावेश आहे, तर जलशुद्धीकरण केंद्र, विविध सभागृहे, महापालिकेच्या रुग्णालयांमधील नव्या सेवा-सुविधा, शाळांच्या इमारती, जलतरण तलाव, बॅडमिंटन हॉल, स्मशानभूमी, जिगिंग पार्कची उद्‌घाटने धडाक्‍यात करण्यात येणार आहेत. अशा प्रस्तावांना महापालिकेतील गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरी दिली आहे.

महापौर प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘शहरात विविध प्रकारची विकासकामे करण्यात येणार आहेत. आचारसंहिता लागू होण्याआधी हे कार्यक्रम घ्यावे लागणार आहेत. विविध विकासकामांची भूमिपूजन, उद्‌घाटने करण्यासाठी गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरी दिली आहे. त्यानुसार ते होतील. या कार्यक्रमांसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केले आहे.’’

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन?
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर सुरू झाले आहे. ज्या नगरसेवकांनी पक्षांतर केले आहे, अशा नगरसेवकांनी आपल्या नव्या पक्षातील नेत्यांच्या हस्ते विकासकामांची उद्‌घाटने ठेवली आहेत. त्यात मनसेचे नगरसेवक राजेश बराटे यांच्या प्रभागातील नव्या पाण्याच्या टाकीचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हावा असा प्रस्ताव आहे. मात्र, ही टाकी आपल्या प्रभागात असल्याचा दावा करीत राष्ट्रवादीने याला विरोध केला आहे.

दिग्गज नेत्यांची उपस्थिती
शहरातील प्रभागांमधील वेगवेगळ्या विकासकामांची भूमिपूजने, उद्‌घाटने आणि लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांसह राज्य आणि केंद्र सरकारमधील मंत्र्यांची हजेरी राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख नेतेही यानिमित्ताने येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री गिरीश बापट, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा समावेश आहे.

Web Title: pune municipal election