Pune : साहित्य आहे पण उपचारासाठी डॉक्टर नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal Corporation

Pune : साहित्य आहे पण उपचारासाठी डॉक्टर नाही

पुणे : नागरिकांना महापालिकेच्या आरोग्य सेवेची आवश्‍यकता आहे, रुग्णालयाच्या इमारती उभ्या आहेत, वैद्यकीय उपकरणे पडून आहेत. पण डॉक्टर नाहीत, त्यामुळे आरोग्यासारख्या मूलभूत हक्कापासून सर्वसामान्य पुणेकर वंचित आहेत. अशी दुर्दैवी स्थिती पुणे शहरात निर्माण झाली आहे. मात्र, जे साहित्य पडून आहे, त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी वर्षाला १८ लाख रुपये महापालिकेला मोजावे लागत आहेत.

पुणे महापालिकेकडून पाच मोठी रुग्णालय, २० प्रसूतिगृह आणि प्राथमिक उपचार केंद्र असे सुमारे ६१ ठिकाणांवरून नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरविली जाते. यामध्ये प्रामुख्याने कमला नेहरू रुग्णालय, राजीव गांधी रुग्णालय, दळवी रुग्णालय, सोनवणे रुग्णालय यांचा मोठा आधार सर्वसामान्य, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना मिळतो. महापालिकेच्या आरोग्य व्यवस्था शहराच्या तुलनेत अतिशय कमकुवत असल्याचा अनुभव कोरोनाच्या काळात आला. पुणेकरांना सेवा पुरवताना नाकीनऊ आले. अखेर युद्धपातळीवर सीओइपी जम्बो कोवीड रुग्णालय, बाणेर येथील कोवीड सेंटर उभारल्याने त्यातून सुमारे १ हजार बेडची व्यवस्था झाल्याने पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. पण यानिमित्ताने आरोग्य व्यवस्थेचे भयाण वास्तव समोर आले.

कोरोनाच्या काळात महापालिकेने व्हेंटिलेटर, बेड, आॅक्सिजन कॅन्सट्रेटर, बायपॅक मशिन, एचएफएनओ मशिन, मॉनिटर, ट्रॉली असे मोठ्या प्रमाणात साहित्य खरेदी केले. तसेच केंद्र सरकराच्या पंतप्रधान निधीतून व्हेंटिलेटर आले. अनेक कंपन्यांनी ‘सीएसआर’मधून व्हेंटिलेटर, बेड यासह इतर वैद्यकीय उपकरणे महापालिकेला उपलब्ध करून दिली. कोरोनाच्या काळात त्याचा चांगल्या पद्धतीने वापरही झाला. पण कोरोनाचा धोका कमी झाल्यानंतर कोरोनाचे उपचार देणारे केंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे आता हे वैद्यकीय साहित्य विनावापर बाणेर येथील दवाखान्यात पडून आहे.

यामध्ये ४०० बेड, २०४ व्हेंटिलेटर, १०० मॉनिटर, ट्रॉली १००, ईसीजी मशिन, बायपॅक आणि एचएफएनओ मशिन प्रत्येकी ३५ यासह इतर साहित्याचा समावेश आहे. गेल्या काही महिन्यांपासून हे साहित्य पडून असल्याने त्यांची देखभाल दुरुस्ती आवश्‍यक आहे, त्यासाठी महापालिकेने १८ लाख रुपयांची निविदा काढली आहे. पण ही उपकरणे कोणत्या दवाखान्यात वापरायचे, कसे वापरायचे याबाबत महापालिकेचे नियोजन नाही. त्यामुळे नागरिकांना नाइलाजास्तव खासगी दवाखान्यांमध्ये खर्चिक उपचार घ्यावे लागत आहेत.

कमला नेहरू आयसीयूसाठी साहित्य

गेल्या अनेक वर्षापासून कमला नेहरू रुग्णालयातील आयसीयू सुरू करण्याचा विषय चर्चेत आहे. अखेर आक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा आयसीयू सुरू होणार आहे. याठिकाणी १७ बेडची व्यवस्था आहे. महापालिकेने त्यासाठी हे पडून असलेले व सुस्थितीत १७ व्हेंटिलेटर, बेड व इतर साहित्य तेथे दिले आहे. तर वारजे येथील बराटे दवाखान्यात ५ तर धनकवडीतील दुगड दवाखान्यात ५ व्हेंटिलेटर व बेड पुरविण्यात येणार आहेत, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

‘‘कोरोनाच्या काळात महापालिकेकडे मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर, बेडसह इतर साहित्य उपलब्ध झाले. पण कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने या उपकरणांचा वापर होत नाही. ते उपकरणे विनावापर राहून खराब होऊ नयेत यासाठी वार्षिक देखभाल दुरुस्तीसाठी १८ लाखाची निविदा काढली आहे. महापालिकेकडे साहित्य उपलब्ध असले तरी त्याचा वापर करणारे डॉक्टर नसल्याने साहित्य पडून आहे. पण महापालिकेचे नव्याने जेथे खासगी संस्थांच्या मदतीने रुग्णालय सुरू होणार आहेत तेथे साहित्य पुरविले जाणार आहे.’’

- डॉ. संजीव वावरे, सहाय्यक आरोग्य प्रमुख