
पुणे : खड्डे-चिखलमय रस्त्यावर पादचारी-वाहनचालकांची कसरत
उंड्री : काळेपडळ रेल्वे गेट ते म्हसोबानगर दरम्यान जलवाहिनी आणि ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण केले नाही. त्यामुळे पहिल्याच पावसात पादचारी आणि दुचाकीचालकांना खड्डेमय निसरड्या रस्त्यातून कसरत करावी लागत आहे. पालिका प्रशासनाने तातडीने या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
काळेपडळ येथील प्रा. शोभा लगड म्हणाल्या की, २०१९ साली याच ठिकाणी खड्ड्यात दुचाकी घसरून पलडल्याने आई एका बाजूला, तर मुलगी दुसऱ्या बाजूला पडली. यावेळी पाण्याच्या टँकरचे चाक मुलीच्या डोक्यावरून गेल्याने चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला होता. या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असून, अरुंद रस्ता असल्याने वाहतूककोंडीचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने या रस्त्याचे डांबरीकरण तातडीने करावे, यासाठी हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील महापालिका सहायक आयुक्तांना निवेदन दिले आहे. मात्र, अद्याप या रस्त्याचे डांबरीकरण न झाल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचे त्यांनी सांगितले.
ड्रेनेज लाईन आणि जलवाहिनी टाकण्यासाठी रस्ता खोदला होता. मात्र, अद्याप डांबरीकरण न झाल्याने पहिल्याच पावसात रस्त्यात मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे चिखलमय रस्त्यात दुचाकी आणि पादचाऱ्यांना घसरून अपघात होत आहेत.
-दत्तात्रय देवकर, काळेपडळ
काळेपडळ रेल्वेगेट-म्हसोबानगर रस्त्यावर शैक्षणिक संकुलातील स्कूल बसेस या रस्त्यावर ये-जा करीत असतात. या रस्त्याचे डांबरीकरण न झाल्यामुळे खड्डेमय रस्त्यामुळे वाहतुककोंडी होऊन अपघातसदृश्य स्थिती निर्माण होते. मागिल पाच वर्षांपासून या रस्त्याचे डांबरीकरण पालिका प्रशासनाने का केले नाही.
- अश्विनी सूर्यवंशी, काळेपडळ
स्कूलबस, पाण्याचे टँकर, पीएमपी बस, रिक्षांची सतत वर्दळ असते. चिखलमय रस्त्यावरून शाळकरी मुलांना अपघात होत आहे. या रस्त्यावरील चेंबर ओव्हरफ्लो होऊन दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहते. पिण्याच्या पाण्यामध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळत असल्याने आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. याविषयी पालिकेच्या आरोग्य आणि पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार केली आहे. मात्र, अद्याप प्रशासनाने गांभीर्याने पाहिले जात नाही.
- वंदना खेडेकर, काळेपडळ
पालखी मार्गाचे कामे सुरू असली तरी, हाही रस्ता नागरिकांच्या हितासाठी महत्त्वाचा आहे. या रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकीचालकांना अपघात होत आहेत. प्रशासनाने तातडीने या रस्त्याचे डांबरीकरण करावे.
- राणी फरांदे, अध्यक्षा- संजिवनी सामाजिक संस्था
जलवाहिनी, पावसाळी आणि ड्रेनेज लाईनचे काम करण्यासाठी रस्त्याची खोदाई केली होती. या रस्त्याच्या कामाचे टेंडर मंजूर झाले असून, या आठवड्यात डांबरीकरणाचे काम पूर्ण केले जाईल.
- अविनाश कामठे, उपअभियंता, महापालिका
Web Title: Pune Municipal Undri Bad Roads Due To Rain Mud Asphalting Local Citizen Demand
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..