

पुणे, ता. १४ : महापालिकेच्या निविदांमध्ये मूळ कामाच्या नावाखाली वाढीव अथवा नवीन कामे समाविष्ट करून ठरावीक ठेकेदाराला फायदा करून दिला जातो. हा प्रकार बंद करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिले आहेत. निविदेतील कामे, पुरवठा किंवा सेवा यात वाढ करायची असल्यास शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि तांत्रिक मान्यता घ्यावी लागणार आहे. यासंदर्भात प्रशासनाने परिपत्रक काढले आहे.
महापालिकेच्या आरोग्य, मोटार वाहन, घनकचरा व्यवस्थापन यासह विविध विभागांतील निविदांमध्ये मूळ कामाच्या प्रमाणापेक्षा मोठ्या प्रमाणात वाढीव पुरवठा करून घेण्याची तरतूद केली जात असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले होते. काही निविदांमध्ये तर मूळ कामाच्या ५० टक्क्यांपर्यंत वाढीव काम किंवा पुरवठा करून घेण्याची तरतूद होती. मात्र, अशा पद्धतीमुळे महापालिकेच्या आर्थिक नियोजनावर परिणाम होतो. मंजूर निधी नेमका कोणत्या कामासाठी खर्च होणार, याबाबतही गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे आता निविदेत मंजूर असलेल्या कामाच्या स्वरूपातीलच आवश्यक कामे करावी लागणार आहेत. निविदेच्या कक्षेबाहेरील नवीन वस्तू, नवीन काम किंवा वेगळ्या स्वरूपाचे काम त्यात समाविष्ट करता येणार नाही. वाढीव काम करणे अत्यावश्यक असल्यास संबंधित विभागाने ते काम जुन्या निविदेत बसते की नाही, याची स्पष्ट पडताळणी करावी लागेल. जुन्या निविदेत नवीन काम घालून कार्यादेश दिल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.
जुन्या निविदेवर काम नको...
दीर्घ मुदतीच्या कामांची मुदत किंवा आर्थिक तरतूद संपल्यानंतरही जुन्या निविदेवर काम सुरू ठेवता येणार नाही. तसेच, मंजूर निविदा रकमेत वाढ करण्याची अट निविदेच्या शर्तींमध्येच ठेवण्यास मनाई केली आहे. त्यामुळे निविदा काढताना जे काम मंजूर झाले, त्याच कामासाठी पैसा खर्च होणार, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.
काय करावे
- आवश्यकतेनुसार स्वतंत्र निविदा काढावी
- वाढीव कामाला पूर्वमान्यता घ्यावी
- मंजूर कामाच्या मर्यादेतच खर्च करावा
काय करू नये
- जुन्या निविदेत नवीन कामे घालू नयेत
- मंजूर कामाची व्याप्ती बदलू नये
- निविदा रकमेत मनमानी वाढ करू नये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.