पुणे- नाशिक महामार्गाला कचऱ्याचा विळखा

पुणे- नाशिक महामार्गाला कचऱ्याचा विळखा

Published on

चाकण, ता. ५ : पुणे- नाशिक महामार्गावर वाढत चाललेल्या कचऱ्याच्या समस्येमुळे परिसरातील नागरिक, कामगार, प्रवाशी, विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. चाकण (ता. खेड) शहराच्या वाढत्या विस्तारामुळे, तसेच गावांचे योग्य कचरा व्यवस्थापन नसल्यामुळे पुणे- नाशिक महामार्ग, तळेगाव, चाकण, शिक्रापूर महामार्गाच्या कडेला अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साठलेले दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पुणे- नाशिक महामार्गावर चाकण, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, वाकी, भाम, संतोषनगर गावच्या हद्दीत आळंदी फाटा, तसेच महामार्गावरील विविध गावांच्या हद्दीत कचरा गोळा करून तो थेट महामार्गाच्या कडेला टाकला जात आहे. तसेच हॉटेल, ढाब्यामधील, घरगुती कचरा, हॉस्पिटलचा कचरा, कंपन्यांतील कॅन्टीनचा कचरा रस्त्याच्या बाजूला टाकला जातो.
तसेच, विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालक, कचरा वाहतूक करणारे ट्रक, छोटी वाहने टेम्पो येथे कचरा टाकून निघून जातात. त्यामुळे येथे कचऱ्याचे मोठे ढीग तयार झाले आहेत. या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, परिसरात डास, माश्या, तसेच भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. काही ठिकाणी कचऱ्याला आग लागल्याच्या घटनाही घडत आहे. त्या धुरामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो.
स्थानिक ग्रामपंचायतीना या समस्येबाबत अनेक वेळा तक्रारी देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी कचरा उचलण्याची मोहीम राबवली जात असली तरी ती पुरेशी ठरत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
महामार्ग परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे, योग्य कचरा व्यवस्थापन प्रणाली उभारणे यांसारख्या उपाययोजना ग्रामपंचायत, तसेच चाकण नगरपरिषदेने करण्याची मागणी नागरिक, कामगार करीत आहेत.

पुणे- नाशिक महामार्गावर ज्या ठिकाणी कचरा टाकला जातो तो कचरा आम्ही वारंवार उचलतो. पण रात्रीच्या वेळेस चाकण, तसेच विविध गावातील लोक भाडेकरू घरगुती कचरा टाकतात. हॉटेलचा, मच्छी मार्केटचा कचरा येथे टाकतात. हॉस्पिटलचाही कचरा येथे टाकला जातो. काही लोकांना त्याबाबत समज द्यायला गेलो तर ते कर्मचाऱ्यांशी भांडण करतात, असे प्रकार घडत आहेत. नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता स्वच्छता राखण्याचे आवाहन वेळोवेळी ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे.
- अमोल साळवे, सरपंच, मेदनकरवाडी

10276

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com