

आळेफाटा, ता. १२ : पुणे-नाशिक महामार्गावरील पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथील कुकडी नदीच्या पुलावर तरुणाला मारहाण केल्यानंतर तो पुलावरून खाली पडून मृत्युमुखी पडल्याची घटना शुक्रवारी (ता. ९) मध्यरात्रीनंतर घडली. या प्रकरणी आळेफाटा पोलिसांनी एका २१ वर्षीय तरुणासह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दुर्गाकुमार दिनेशप्रसाद गुप्ता (वय २४, मूळ रा. बिहार, सध्या रा. कांदळी, ता. जुन्नर) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मैत्रिणीला भेटून कांदळी येथील खोलीवर पायी जात असताना पिंपळवंडी येथील एचपी पेट्रोल पंपासमोरील कुकडी नदीच्या पुलावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याला अडवून विचारपूस केली. या वेळी झालेल्या वादातून दोघांनी त्याच्या कानशिलात मारल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
मारहाणीमुळे घाबरलेला दुर्गाकुमार रस्त्याच्या पलीकडे पळत असताना पुलावरून खाली पडला. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे संशयितांची ओळख पटवली.
याप्रकरणी सोहम दत्तात्रेय कुऱ्हाडे (वय २१, रा. लवणवाडी, आळे) आणि एका १६ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास आळेफाट्याचे पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ऋषिकेश तिटमे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.