पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प जुन्या सर्वेनुसारच होणे गरजेचे

पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प जुन्या सर्वेनुसारच होणे गरजेचे
Published on: 

पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प जुन्या सर्वेनुसारच होणे गरजेचे

दळणावळणाच्या विविध सुविधा असल्या की आपला भौगोलिक विकास होतो. आपल्या परिसराचा आणि पर्यायाने आपला देखील विकास होत जातो. रोजगार आणि उद्योगाच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. पण, प्रत्यक्ष आपल्या मागणीप्रमाणे दळणावळणाच्या सुविधांचा खरंच विकास होतो का? असा प्रश्न नक्कीच मनात येतो. मागील ५० वर्षांपासून पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प प्रलंबित आहे. या प्रकल्पावर अनेक तालुके, शेतकरी, बेरोजगार तरुण यांचे उज्ज्वल भविष्य अवलंबून आहेत. हा प्रकल्प म्हणजे संगमनेर, जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यातील प्रत्येकासाठी प्रगतीचा मार्ग ठरणारा
आहे.

- अशोक खरात, खोडद (ता. जुन्नर)

काँग्रेस सरकारच्या काळात सुरेश कलमाडी (१९९५- १९९६) हे रेल्वेमंत्री असल्यापासून पुणे-नाशिक रेल्वे व्हावी, यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा केला जात होता. त्यावेळीही अर्थसंकल्पामध्ये रेल्वेच्या सर्वेक्षणासाठी तरतूद करण्यात आली होती, परंतु नंतर त्यांचे रेल्वेमंत्री पद गेल्यानंतर पुणे-नाशिक रेल्वेचा प्रस्ताव मागे पडला. पुढे शिवाजी आढळराव पाटील हे खासदार झाल्यानंतर पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाला अधिक गती मिळाली. नंतरच्या काळात शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या काळात हा प्रकल्प अधिक गतीने पुढे जाऊन त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद होऊन राज्य शासनाच्या आणि महारेल यांच्या संयुक्त भागीदारीत हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी मोठी प्रगती झाली. परंतु, अचानक खोडद येथील जीएमआरटी प्रकल्पाच्या संशोधनाला बाधा येत आहे, असे कारण पुढे करून हा प्रकल्प थांबविण्यात आला.
हा प्रकल्प फक्त दोन शहरांना जोडणारा प्रकल्प नसून, या भागातील विकासाला चालना देणारा आणि दीर्घकालीन परिणाम करणारा प्रकल्प आहे. त्यामुळे हा रेल्वे प्रकल्प सिन्नर, संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, मंचर, खेड तालुक्यातून जाणे अधिक गरजेचे आहे. या भागामध्ये कृषी आणि कृषिप्रधान अर्थव्यवस्था असल्यामुळे आणि खोडद येथील जीएमआरटीमुळे या भागामध्ये इतर कोणतेही औद्योगिक प्रकल्प किंवा इतर विकासात्मक दीर्घकालीन प्रकल्प होणे शक्य नाही. त्यामुळे हा पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प अत्यंत उपयुक्त आणि विकासाचा अनुशेष भरून काढणारा महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे.
नारायणगाव आणि मंचरमध्ये ॲग्रीकल्चरल टर्मिनल प्रस्तावित होते. या माध्यमातून या भागातील शेतीमाल हा देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये पोहोचविण्यासाठी कमीत कमी खर्चाचे वाहतूक साधन उपलब्ध होणार होते. त्याचबरोबर ही दोन्हीही औद्योगिक शहरे एकमेकांना जोडली गेल्यामुळे या परिसरामध्ये नागरीकरणासाठी मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध झाल्या असत्या. या भागातील रोजगाराचा मोठा अनुशेष भरून काढण्यासाठी मदत झाली असती.
या प्रकल्पाचे नाव पुणे-नाशिक रेल्वे असे जरी ठेवण्यात आले असले, तरीही हा कोणताही नवीन प्रकल्प नाही. हे जुन्याच प्रकल्पांचे दुपदरीकरण आणि त्यांचे मजबुतीकरण हाच प्रकल्प आहे. यामुळे पूर्वीच अस्तित्वात असणारा मार्ग पुन्हा नव्याने पुणे-नाशिक रेल्वे या मार्गाने सरकारतर्फे प्रदर्शित केला जात आहे. शिर्डी, अहिल्यानगर, पुणे ही शहरे यापूर्वीही रेल्वे मार्गाने जोडली गेलेली होतीच आणि या मार्गाचे नाव पूर्वीप्रमाणेच ठेवले असते तर भविष्यात पुन्हा पुणे-नाशिक रेल्वे मार्ग हा नव्याने त्यावेळी उपलब्ध असणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानासह पुढे येणाऱ्या शासनापुढे मांडता आला असता, पण तोही पर्याय जाणीवपूर्वक खोडून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जगभरात संशोधन करणाऱ्या अशा प्रकारच्या प्रकल्पांना कोणतीही बाधा न पोचविता दळणवळणाचे जलद आणि स्वस्त माध्यम म्हणून रेल्वेचा पर्याय स्वीकारल्याची असंख्य उदाहरणे आहेत. त्यांच्याकडून काही शिकण्यापेक्षा तडकाफडकी मार्ग बदलून या नागरिकांवर मोठा अन्याय करण्यात आला आहे.
अहिल्यानगर-शिर्डी मार्गे हा रेल्वे मार्ग गेला तर यामुळे वाढणारा अनावश्यक खर्च हा जीएमआरटीच्या (रेडिओ दुर्बिण) प्रकल्पाच्या परिसरामध्ये अंडरग्राउंड करण्यासाठी वापरता येऊ शकतो. तसेच, इतरही पर्यायी मार्गांचा विचार करता येईल. जसे की डिझेल इंजिन किंवा इतर मार्गांचा विचार यासाठी होऊ शकतो. रेल्वे हा कमी खर्चाचा कमी भूसंपादनात अधिक फायदा देणारा प्रकल्प आहे. पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प हा अधिक पर्यावरणपूरक, तसेच कमीत कमी वेळात अधिकाधिक फायदेशीर आणि इंधन बचत आणि कमी प्रदूषण करणारा ठरू शकतो. वायू प्रदूषण आणि बागायती शेतीपट्ट्याचे नुकसान टाळण्यासाठी पुणे-नाशिक सरळ मार्गे रेल्वे हाच एकमेव पर्याय सरकार समोर आहे.
जुन्नर तालुक्यातील शिवनेरी, लेण्याद्री, ओझर, नाणेघाट, लेण्या पाहण्यासाठी अनेक पर्यटक जुन्नरमध्ये येतात. जुन्नर तालुक्यातून ही रेल्वे गेल्यास या मार्गामुळे पुणे-मुंबई-नाशिक हा सुवर्ण त्रिकोण कार्यक्षम पद्धतीने जोडला गेल्यामुळे जुन्नर तालुक्याच्या पर्यटन विकासालाही यामुळे चालना मिळेल. कमीत कमी जागेत सर्वाधिक लेण्या असणारे ठिकाण म्हणजे जुन्नर हे जगातील एकमेव ठिकाण आहे. या लेण्यांच्या माध्यमातून विदेशी पर्यटनाला देखील चालना मिळण्याची अधिक संधी आहे. या लेण्यांना देशाच्या पर्यटन नकाशावर बुद्धिस्ट सर्किटमध्ये स्थान देऊन त्यालाही मुख्य रेल्वे नेटवर्कशी जोडण्यासाठी हा प्रकल्प अधिक परिणामकारक ठरू शकतो. दक्षिणेकडील आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये कमी अंतराचा एकमेव पर्याय म्हणून या मार्गाचा माल वाहतुकीसाठी उपयोग करता येईल.
अनेक तरुण पुण्यात शिक्षण घेत आहेत, तर काही तरुण पुणे नाशिक सारख्या ठिकाणी नोकरी करत आहेत. रोज पुण्यातून किंवा नाशकातून घरी येणे शक्य नसल्याने विद्यार्थी आणि नोकरी करणाऱ्या तरुणांना पुण्यातच रहावे लागते. पर्यायाने त्यांच्या खर्चात वाढ होते आणि उत्पन्न कमी होते. अशावेळी हीच जर पुणे-नाशिक रेल्वे झाली तर अनेक विद्यार्थी पुण्यात शिक्षण घेऊन रोज आपल्या घरी येऊ शकतील. अनेक तरुण पुणे, नाशिकमध्ये दिवसभर नोकरी करून सायंकाळी आपल्या घरी येतील. याशिवाय शेतकरी रेल्वेने जाऊन पुणे आणि नाशिकसारख्या ठिकाणी आपल्या शेतीमालाची विक्री करू शकतील. एवढी मोठी क्रांती या पुणे नाशिक रेल्वे घडवू शकते, म्हणूनच हा पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प होणे नितांत गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.