

राजगुरुनगर, ता. २५ : पुणे-नाशिक महामार्गावर खेड तालुक्यातील सांडभोरवाडी फाटा येथे तृतीयपंथी व प्रवाशांमध्ये मारामारी झाल्याची घटना शुक्रवारी (ता. २३) रात्री घडली. दोन्ही बाजूंच्या तक्रारीवरून खेड पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक फिर्याद जीवन उत्तम जावळे (वय ३६, रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड) यांनी दिली आहे. फिर्यादीनुसार, जावळे आणि विशाल भोसले हे रात्री साडेसातच्या सुमारास त्यांच्या मोटारीतून मंचरहून खेडकडे येत असताना सांडभोरवाडी फाट्यावर लघुशंकेसाठी थांबले होते. त्यावेळी तेथे आलेल्या चार तृतीयपंथीयांनी त्यांना येथे का आला आहात, अशी विचारणा केली. त्यांनी त्यांची नावे व पत्ते विचारले असता, गुरूंना बोलावून माहिती सांगतो, असे म्हणत दगडाने मारहाण केली. या घटनेत जावळे यांच्या डोक्याला दुखापत झाली. तसेच भोसले यांच्या गळ्यातील दोन सोन्याच्या साखळ्या हिसकावल्या आणि दगडफेक करून मोटारीचे नुकसान केले. या फिर्यादीवरून अन्नू दाभाडे, मुन्नी दाभाडे, सान्वी दाभाडे आणि तन्वी सिंग (सर्व रा. शिरोली, ता. खेड) यांच्याविरोधात शांतताभंग, मारहाण, मालमत्तेच्या नुकसानीचा गुन्हा खेड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
दुसरी फिर्याद मुन्नी अंजली दाभाडे (वय २०, रा. शिरोली, ता. खेड) यांनी दिली आहे. फिर्यादीनुसार, शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास त्या आणि त्यांच्या सोबती खेड घाटात महामार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांकडे पैसे मागत असताना मोटारीतून आलेल्या चौघांनी आपण पोलिस असल्याचे सांगत त्यांना येथे उभे राहण्याची परवानगी कोणी दिली, तसेच हप्ता कोणाला देता, अशी विचारणा केली. त्यानंतर मोटारीतून उतरलेल्या एकाने सान्वी हिला मारहाण केली. तर दुसऱ्याने फिर्यादीचा हात धरून तिचा विनयभंग केला. दरम्यान, मोटारीच्या चालकाने वाहन वळवून अन्नू दाभाडे हिच्या दिशेने नेले. मोटारीच्या धडकेने ती खाली पडून तिच्या डोक्याला व कमरेला दुखापत झाली. यानंतर चौघांनी त्यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली. याप्रकरणी जीवन उत्तम जावळे, विशाल नारायण भोसले, बापू बबन दवगे आणि संतोष शंकर जाधव (सर्व रा. महाळुंगे, ता. खेड) यांच्याविरोधात खेड पोलिस ठाण्यात विनयभंग, शांतताभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.