
अमिताभ गुप्ता यांच्यानंतर पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी कोण? या प्रश्नावरुन मागील काही महिन्यांपासून सुरु असलेल्या चर्चेला अखेर पुर्णविराम मिळाला आहे.
Pune Police Commissioner : पुणेकरांना चांगल्या कामाचे प्रचिती देऊ - रितेशकुमार
पुणे - अमिताभ गुप्ता यांच्यानंतर पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी कोण? या प्रश्नावरुन मागील काही महिन्यांपासून सुरु असलेल्या चर्चेला अखेर पुर्णविराम मिळाला आहे. पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी रितेशकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने मंगळवारी रात्री उशीरा याबाबतचे आदेश काढले. "पुणेकरांना चांगल्या कामाची प्रचिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करु' असा विश्वास रितेशकुमार यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला आहे.
शहरातील संघटीत गुन्हेगारीसह उदयोन्मुख गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध कायद्याचा (मोका) वापर करुन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारांवर वचक बसविला होता. "मोका', एमपीडीए' यांसारख्या कायद्यांचा योग्य वापर करीत शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. एकीकडे गुन्हेगारीवर नियंत्रण बसविण्यास यश येत असतानाच, दुसरीकडे वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यामध्ये गुप्ता यांना अपयश आले होते. त्याची सल गुप्ता यांना होती, दरम्यान, त्यांनी दोन महिन्यांपुर्वी वाहतुक शाखेमध्ये मोठे फेरबदल करुन, तसेच नव्याने आलेल्या पोलिस उपायुक्तांना रस्त्यावर उतरुन वाहतुक शाखेला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. त्याला आता यश येऊ लागले होते. दरम्यान, गुप्ता यांचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्यात पुर्ण झाला होता. तेव्हापासून त्यांच्या बदलीबाबत चर्चा सुरु होती. या चर्चेला मंगळवारी रात्री पुर्णविराम मिळाला.
पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी रितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाने याबाबतचे आदेश मंगळवारी रात्री काढले. त्यावेळी 'सकाळ'ने त्यांच्याशी संवाद साधला. रितेशकुमार म्हणाले, 'पुण्याच्या पोलिस आयुक्त पदी नियुक्ती झाल्याची माहिती मिळाली. त्याचा नक्कीच आनंद झाला. पुण्यात काम करणे कधीही चांगले वाटते. आपल्याला जास्त कष्ट करण्याची सवय आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मेहनत करुन पुणेकरांना आपल्या चांगल्या कामाची प्रचिती नक्कीच देऊ. मी सध्या सुट्टीवर आहे. दोन तीन दिवसात पुण्यात येईल.'
रितेशकुमार हे भारतीय पोलिस सेवेच्या (आयपीएस) 1992 च्या तुकडीतील अधिकारी आहेत. ते काही वर्षे औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक होते, त्यानंतर त्यांनी कोल्हापुर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक म्हणूनही काम पाहिले. तेथून रितेश कुमार यांची बदली राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस महानिरीक्षकपदी झाली. तर त्यानंतर ते पदोन्नतीने राज्य वायरलेस विभागाच्या अतिरीक्त पोलिस महासंचालक म्हणून कार्यरत होते. तेथे त्यांनी वायरलेस विभागामध्ये अनेक चांगली कामे केली. दरम्यान, तेथून ते राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाच्या अतिरीक्त पोलिस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली होती. तर "सीआयडी'नंतर त्यांची पुण्याचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.