Pune: विमान प्रवासात प्रवाशाच्या बॅगेवर डल्ला; उपचारांसाठी जमवलेले 76,000 रुपये गायब! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune News_Airport

Pune: विमान प्रवासात प्रवाशाच्या बॅगेवर डल्ला; उपचारांसाठी जमवलेले 76,000 रुपये गायब!

पुणे : पाटण्याहून पुण्यात उपचारांसाठी आलेल्या दाम्पत्याच्या बॅगमधून ७६,००० रुपये गायब झाल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी पुणे विमानतळावर घडली. पाटणा ते पुणे प्रवासादरम्यान कार्गोमध्ये ठेवलेल्या बॅगमधून एवढी मोठी रक्कम गायब झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. (Pune News 76000 rupees of treatment missing from passengers bag on flight)

काय आहे हा संपूर्ण प्रकार?

६८ वर्षीय शंभू सिंग हे मूळचे बिहारची राजधानी पाटणा येथील निवृत्त प्रोफेसर आहेत. किडनीचा आजार असल्यानं सिंग हे आपल्या पत्नीसह डायलिसिससाठी पाटणा येथून विमानाने पुण्यात २६ ऑक्टोबर रोजी दाखल झाले. मात्र, पुण्यात दाखल होताच त्यांच्यावर जणू आभाळच कोसळलं. कारण विमान प्रवासादरम्यान त्यांच्या बॅगेतील ७६,००० रुपयांची रक्कम गायब झाली. विशेष बाब म्हणजे विमान प्रवासात त्यांची बॅग सील करून ठेवली होती. मात्र, पुणे विमानतळावर येताच बॅग सील नसलेली आढळून आली.

पुण्यात उतरल्यानंतर धक्काच बसला

सिंग म्हणाले, "डॉक्टरांनी मला डायलिसिसच्या उपचारांसाठी पुण्यात उपचार घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तातडीनं माझ्या मुलानं आमच्यासाठी विमानाचं तिकीट बुक केलं. मुलावर सगळा खर्चाचा भार येऊ नये यासाठी मी दोन्ही बॅगमध्ये मिळून एकूण 76 हजार रुपये ठेवले होते. आम्ही पाटण्याहून पुण्याला विमानानं निघालो तेव्हा दोन्ही बॅगा सील झालेल्या मी स्वतः पाहिल्या होत्या. मात्र पुणे विमानतळावर जेव्हा आम्ही उतरलो तेव्हा मला धक्काच बसला कारण बॅगवर कुठल्याही प्रकारचे सील नव्हते. पुणे ते पटना हा प्रवास करताना कनेक्टिंग फ्लाईट असल्यानं आम्हाला दिल्लीत दुसऱ्या विमानात बसवलं गेलं होतं"

दिल्ली किंवा पुणे एअरपोर्टवर चोरी झाल्याचा संशय

शंभू सिंग यांचा मुलगा साकेत हा पुण्यात वास्तव्याला आहे. त्यानं सांगितलं, "माझ्या आई-वडिलांसाठी मी पाटण्याहून पुण्यासाठी इंडिगो एरलाइनचं तिकीट बूक केलं होतं. माझे आई-वडील वयस्कर असल्यानं त्यांनी कुठलीही हॅन्ड बॅग त्यांच्यासोबत आणली नव्हती. शिवाय ते कुठल्याही प्रकारचं डेबिट कार्ड वापरत नसल्यानं त्यांनी एवढी मोठी रक्कम बागेत आणायचं ठरवलं. एअरपोर्टवर येताच माझ्या वडिलांनी मला हा सगळा प्रकार सांगितला. यानंतर मी तात्काळ इंडिगो कंपनीला ईमेलद्वारे संपर्क केला. कंपनीकडं तक्रार केल्यानंतर त्यांनी पाटणा एअरपोर्टवरील सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता तिथल्या विमानतळावर बॅग कार्गोमध्ये जाताना सील लावलेली आढळून आली. मात्र, कनेक्टिंग फ्लाईट असल्यानं दिल्ली आणि पुणे एअरपोर्टवरील सीसीटीव्ही फुटेज अद्यापही तपासले गेलेलं नाही"

इंडिगोकडून तपास कधी पूर्ण होणार?

दरम्यान, या प्रकाराच्या शहानिशेसाठी ई-सकाळच्या प्रतिनिधीनं इंडिगो एअरलाइनशी संपर्क साधला. यावेळी आमच्याकडे याबद्दलची तक्रार आली असून आम्ही या सगळ्या घटनेचा तपास करत आहोत, आमची टीम संबंधीत प्रवाशाच्या संपर्कात आहे, अशी माहिती त्यांनी दिली. पण आता हा तपास कधी पूर्ण होणार आणि यातून काय समोर येतंय याकडे लक्ष लागून राहिलं आहे.

टॅग्स :Pune NewsIndigo Airline