Ajit Pawar : ...तर त्यांचा मताचा अधिकारच काढला पाहिजे; अजित पवार संतापले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

Ajit Pawar : ...तर त्यांचा मताचा अधिकारच काढला पाहिजे; अजित पवार संतापले

पुणे : "शहरातील टेकड्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचले पाहिजे, मात्र राजकीय लोकांमुळे टेकड्यांवर झोपड्या तयार होतात, त्यांच्यामुळे शहराला बकालपणा येतो. कायदाच्या चौकटीत बसणार नाही, मात्र अतिक्रमण करणाऱ्यांचा मताचा अधिकार काढल्यास सगळे आपोआप सरळ होतील" असे परखड मत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शनिवारी व्यक्त केले.

वंचित विकास व ग्राफियाज सोल्यूशन आयोजित पर्यावरण अभ्यासक डॉ.श्रीकांत गबाले व मंजुश्री पारसनीस लिखित "आंबील ओढा" पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, गबाले, पारसनीस उपस्थित होते.

पवार म्हणाले, " टेकड्या आपले वैभव आहेत. मात्र तेथेही अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. अनेकदा चांगल्या भावनेने निर्णय घ्यावे लागतात. शहरात बाहेरून नोकरी, व्यवसायासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आर्थिक परिस्थितीमुळे एकाने टेकडीवर झोपडी टाकली की, तेथे अन्य झोपड्या येतात.

राजकीय व्यक्ती मतांच्या स्वार्थापोटी बेकायदा झोपडपट्टी वाढण्यास कारणीभूत ठरतात.त्यामध्ये काही संघटना येतात. त्यामुळे शहराला बकालपणा येतो. कायदाच्या चौकटीत बसणार नाही, मात्र अतिक्रमण करणाऱ्यांचा मताचा अधिकार काढल्यास सगळे सरळ होतील."

खेमनार म्हणाले, "सेवेत आल्यानंतर पुरामुळे पाणी कुठे घुसेल याचा ताण येतो. ओढ्याला पूर येऊ नये, यासाठी वर्षभर काम केले जाते. आंबील ओढ्यावर काम करताना, गाबाले यांनी आम्हाला चांगले मार्गदर्शन केले. राम नदी, नदी, तलाव सुधारणा यावर ही काम करणार आहोत. आंबील ओढा हा नाला, ओढा नाही तर उपनदी आहे.

2019 मध्ये आलेल्या पुरा नंतर आंबील ओढ्यामध्ये खूप काम करण्यात आले आहे, भविष्यात ही हे काम केले आहे. तात्पुरत्या उपाय योजना न करता कायमस्वरूपी व शास्त्रशुद्ध पद्धतीने उपाययोजना करण्याचे काम जात आहे. पुस्तकातील सर्व उपाययोजना प्रत्यक्षात उतरवू."

पुस्तका बाबत मनोगत व्यक्त करताना डॉ.गबाले म्हणाले, " पुण्यात आंबील ओढ्याप्रमाणे आणि राम नदी, भैरोबा नाला अशा ओढ्यासह पुण्याच्या टेकड्यावर काम होण्याची गरज आहे. आंबील ओढा पूर्वी सारसबाग येथून सुरू होत होता, त्याचा प्रवाह बदलण्यात आला. ओढ्याच्या हद्दीत बांधकामे, अतिक्रमण वाढली आहेत. या ओढ्याला अनेक विषय संबंधित आहेत. हा ओढा 16 किलोमीटरचा असून या ओढ्याला पुर येण्याची कारणे शोधली पाहिजेत."

आंबील ओढ्याला येणाऱ्या पुरांची कारणे शोधून उपाययोजना करण्याची गरज आहे." पारसनीस यांनी नमूद केले.

जनरेट्या पुढे कोणाचेही काहीही चालत नाही

पुणेकरांचे नुकसान होणार असेल तर आवाज उठविला पाहिजे, जनरेट्या पुढे कोणाचेही काहीही चालत नाहीं लोकांच्या मागणीला दुर्लक्ष करून चालत नाही. स्मार्टसिटीच्या नावाखाली शहराच्या काही भागात चुकीची कामे झालेत. पर्यावरण धोक्यात आलेत. रस्त्यांवर पाणी साठण्याचे प्रकार घडले आहेत. हा निसर्गाने आपल्याला दिलेला हा एक इशारा आहे, हे लक्षात घेऊन कामे व्हायला पाहिजे. कोणतेही विकास कामे करताना पर्यावरणाला पूरक कामे असतील, याकडे लक्ष दिले पाहिजे. आपल्याला सगळे समजते, हे राज्यकर्ते व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी समजू नयेत. सरकार कोणाचेही असो, सरकारने अधिकारी, तज्ञ लोकांचा विचार घेऊनच कामे केली पाहिजेत. शालेय जीवनातच पर्यावरणाची माहिती मुलांपर्यंत पोचविले पाहिजे."

टॅग्स :Pune NewsAjit PawarNCP