पर्यटकांच्या दृष्टीने कारगिल अत्यंत सुरक्षित

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

पर्यटनानिमित्त जम्मू-काश्‍मीरमध्ये जाणाऱ्या पुणेकरांची आणि एकूणच मराठी लोकांची संख्या खूप जास्त आहे. वैष्णोदेवी मंदिर, लेह-लडाख, श्रीनगर अशा काही लोकप्रिय पर्यटनाच्या ठिकाणी जाण्याचे नियोजन तुम्ही केला असेल किंवा करणार असाल, तर त्यामध्ये आता कारगिलचाही समावेश करा. कारगिल हे उभरते पर्यटनस्थळ असून, तेथे जाणाऱ्या मराठी व गुजराती पर्यटकांची संख्या वर्षभरात दुप्पट होण्याची शक्‍यता आहे. याबाबत "ऑल कारगिल ट्रॅव्हल अँड ट्रेड असोसिएशन'चे अध्यक्ष अश्रफ अली यांच्याशी सलील उरुणकर यांनी साधलेला संवाद. 

प्रश्‍न - कारगिल हे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी काय प्रयत्न होत आहेत? 
- काश्‍मीर आणि लडाख या दोन प्रदेशांना जोडणारा असा कारगिलचा भाग आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून तो दुर्लक्षित आहे. अनेक पर्यटक कारगिलमध्ये फक्त एक रात्र थांबण्यापुरते येतात; परंतु पर्यटकांच्या दृष्टीने पाहण्यासारखी तेथे अनेक चांगली ठिकाणे आहेत. कारगिलमध्ये 1999 मध्ये युद्ध झाल्याने येथे असुरक्षित वातावरण असेल, असा गैरसमज पर्यटकांमध्ये आहे. खरी परिस्थिती खूप वेगळी आहे. गेल्या अठरा वर्षांत कारगिलमध्ये एकही दहशतवादी कारवाई झालेली नाही. पर्यटकांच्या दृष्टीने अत्यंत सुरक्षित असे हे स्थळ आहे. याबाबत जनजागृती करून अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. 

प्रश्‍न - पुढील पाच वर्षांतील कारगिलच्या पर्यटनाचे चित्र कसे असेल? 
जम्मू-काश्‍मीरमध्ये सध्या अनेक विकासकामे सुरू आहेत. "जोजीला पास' या बोगद्याचे काम येत्या पाच वर्षांत पूर्ण होईल. तसेच किश्‍तवाड ते कारगिल आणि श्रीनगर ते लेह व्हाया कारगिल या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. या कनेक्‍टिव्हिटीचा फायदा पर्यटकांना होणार आहे. पुढील पाच ते सात वर्षांत पर्यटकांची संख्या दुपटीने किंवा तिपटीने वाढण्याची शक्‍यता आहे. काश्‍मीरच्या अन्य भागांत झालेल्या व्यावसायीकरणासारखे कारगिलमध्ये घडू नये, यासाठी पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्टीने शाश्‍वत विकास घडवून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 

प्रश्‍न - "बॉर्डर टुरिझम'ची संकल्पना लोकांना भावते आहे का? 
काश्‍मीर म्हटले की दहशतवाद, फुटीरतावाद अशीच प्रतिमा डोळ्यांसमोर येते. काही लोकांमुळे संपूर्ण काश्‍मीरमधील लोकांविषयी गैरसमज निर्माण झाले आहे. जम्मू-काश्‍मीरमध्ये जेवढ्या प्रमाणात पर्यटकांची संख्या वाढेल, तेवढी चांगली प्रतिमा निर्माण होण्यास मदत होईल. त्या उद्देशाने आम्ही पर्यटनाला चालना देत आहोत. काश्‍मिरी युवकांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी हे महत्त्वाचे माध्यम आहे. कारगिल हे एकमेव असे ठिकाण ओ, जिथून तुम्ही प्रत्यक्ष नियंत्रणरेषेच्या काही मीटर अंतरापर्यंत जाऊ शकता. भारतीय आणि पाकिस्तानी हद्दीवरील लष्करी जवान, ठाणी तुम्हाला दिसतात आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरचा अनुभव घेता येतो. विषम वातावरणात लष्करी जवान कसे काम करतात, याचा अंदाज येतो. अशा अनोख्या अनुभवामुळे "बॉर्डर' किंवा "पॅट्रॉईटिझम' पर्यटन वाढत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news ashraf ali interview