सज्जनशक्ती जागृत झाल्यास दलाल दूर होतील - मुख्यमंत्री फडणवीस 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

पुणे - सरकार आणि सरकारी अधिकारी लोकसहभागातून परिवर्तन घडवू शकतात. कारण समाजाचे संघटित स्वरूपच बदल घडवू शकते. मात्र, नकारात्मक विचारांतून दलाल तयार होतात. तेच दलाल शासकीय योजना लुटून नेतात. यंत्रणेतील दलाल दूर व्हायचे असतील, तर समाजातील ऐंशी टक्के सज्जनशक्ती जागृत व्हायला हवी, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

पुणे - सरकार आणि सरकारी अधिकारी लोकसहभागातून परिवर्तन घडवू शकतात. कारण समाजाचे संघटित स्वरूपच बदल घडवू शकते. मात्र, नकारात्मक विचारांतून दलाल तयार होतात. तेच दलाल शासकीय योजना लुटून नेतात. यंत्रणेतील दलाल दूर व्हायचे असतील, तर समाजातील ऐंशी टक्के सज्जनशक्ती जागृत व्हायला हवी, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

अनुगामी लोकराज्य महाभियान (अनुलोम) पुणे विभाग आयोजित "सारथ्य समाजाचे' या विकास मेळाव्यात ते बोलत होते. जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, पिंपरी- चिंचवडचे महापौर नितीन काळजे, सारंगधर निर्मल, प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, "अनुलोम'चे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल वझे, पुणे विभागाचे प्रमुख अनिल मोहिते, कृष्णकुमार गोयल, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्यासह शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अधिकाऱ्यांना "अनुलोम सन्मित्र' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या निमित्ताने सामाजिक संस्थांच्या व शासकीय योजनांविषयीचे एक दिवसीय प्रदर्शनही भरविण्यात आले होते.

फडणवीस म्हणाले, 'डिजिटलायझेशनमुळे दलाल दूर झाले आणि सामाजिक संस्थांना शासकीय योजना सामान्यांपर्यंत पोचविता येऊ लागल्या. त्यामुळे आता गरजू लाभार्थ्यांपर्यंत योजना पोचत आहेत. "अनुलोम'मुळे वीस लाख लोकांच्या घरापर्यंत संपर्क होऊ शकला. सात लाख सदस्य झाले. बारा ते साडेबारा लाख लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला. हे सकारात्मकतेमुळे घडले. मात्र समाजात लपलेली सकारात्मकता जागृत होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीतील "श्रीकृष्ण' जागा व्हावा. लोकसहभागामुळे जलयुक्त शिवार योजना आता लोकांची झाली आहे.''

राज्यात आठ लाख स्वयंसेवी संस्था आहेत. त्यांची एकत्रित संघटनशक्ती विकास घडवू शकते. त्या संस्थांचे कार्यकर्ते समाजासाठी कार्य करत असून, एकप्रकारे ते देशभक्तच आहेत. समाज आणि शासकीय यंत्रणेत समन्वय साधणारे हे दूत आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.

Web Title: pune news devendra fadnavis anulom sarathya samajache