पुण्यातही धूळ वाढतेय

पुण्यातही धूळ वाढतेय

आपल्या प्रत्येकाच्या घरातील टीव्हीपासून  ते आरशापर्यंतच्या प्रत्येक वस्तूवर रोजच्या रोज धुळीचा नवीन थर बसलेला दिसतो. आरशावरील धुळीचा हा थर नक्कीच पुसता येईल; मात्र फुफ्फुसात गेलेल्या धूलिकणांमुळे आरोग्याचा प्रश्‍न गंभीर होण्याचा धोका सातत्याने वाढत आहे. ही भीषण स्थिती नेमकी काय आहे आणि त्‍यावर कोणते उपाय योजावे लागतील, याबाबतची ही वृत्तमालिका.

पुणे - ‘पुण्याची दिल्ली झाली आहे का’, या प्रत्येक पुणेकरांच्या मनातील प्रश्‍नाचे उत्तर ‘ तूर्त नाही’ असे तज्ज्ञ निरीक्षक संस्थांनी दिले आहे, मात्र दिल्लीच्या प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या धुळीचे प्रमाण पुण्यात झपाट्याने वाढत असल्याने पुणे झपाट्याने धोकादायक स्थितीकडे चालले आहे. त्यावर उपाय न योजल्यास काही वर्षांतच ‘पुण्याची दिल्ली’ होण्याची भीती आहे.

दिल्लीमध्ये हवेच्या प्रदूषणाने धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. त्यात धुळीचे प्रमाण मोठे आहे. पुण्यात विकासकामांमुळे वाढलेले धुळीचे प्रमाण आणि उघड्यावर कचरा जाळण्याच्या सर्रास होणाऱ्या घटना या प्रदूषण नियंत्रणातील मोठी डोकेदुखी ठरत आहेत. भौगोलिक स्थानामुळे हवेतील प्रदूषणापासून शहराला नैसर्गिक संरक्षण कवच मिळाले असले तरीही प्रदूषणाने आपली पातळी ओलांडल्यास ते कवचही निखळून पडण्याचा धोका आहे. 

असा निघाला निष्कर्ष... : भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्थेतील (आयआयटीएम) ‘सफर इंडिया’ (सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च) आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) या दोन्ही संस्थांतर्फे पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड परिसरातील हवेची गुणवत्ता रोजच्या रोज मोजली जाते. ‘सफर’तर्फे लोहगाव, शिवाजीनगर, पाषाण, मांजरी, हडपसर आणि कात्रज या ठिकाणच्या हवेची गुणवत्ता मोजली जाते. तसेच, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे डेक्कन, नळ स्टॉप आणि स्वारगेट येथील हवेत असलेल्या दूषित घटकांची नोंद नियमितपणे केली जाते. या दोन्ही संस्थांच्या माहितीच्या विश्‍लेषणातून हा निष्कर्ष निघाला आहे. 

पुण्याच्या प्रवेशद्वारावर धुळीचे साम्राज्य : पुण्यातील पूर्वेकडचे प्रवेशद्वार असलेल्या मांजरीचा भाग, कात्रज या दक्षिणेकडील प्रवेशद्वारावर आणि आग्नेयेच्या हडपसर परिसरात धुळीचे साम्राज्य असल्याची माहिती पुढे आली आहे. २०१५ व १६ च्या तुलनेत २०१७ मध्ये जवळपास दुपटीहून अधिक वाढ झाल्‍याचे दिसते. त्यामुळे या तीनही प्रवेशद्वारांवरील हवेच्या प्रदूषणाची पातळी गेल्या काही महिन्यांपासून मध्यम दिसत आहे. त्याच वेळी पाषाण आणि लोहगाव येथील हवेची गुणवत्ता चांगली दिसून येत आहे. हवेत असणाऱ्या धूलिकणांपैकी ‘पीएम १०’ आणि ‘पीएम २.५’ हे मानवी आरोग्यास हानिकारक असतात. त्यांचे हवेतील प्रमाणावर हवा चांगली, मध्यम की धोकादायक आहे, अशी वर्गवारी करण्यात आली आहे. त्या आधारावर मांजरी, कात्रज, हडपसर, शिवाजीनगर येथील हवेतील प्रदूषणाची पातळी मध्यम असल्याचा निष्कर्ष निघाला आहे.

सूक्ष्म धूलिकण म्हणजे काय?:  ‘पीएम १०’ म्हणजे १० मायक्रॉनपर्यंत आकार असलेले धूलिकण. एक मिलिमीटरचा एक हजारावा भाग म्हणजे एक मायक्रॉन.
का वाढतात सूक्ष्म धूलिकण?:  विकास प्रकल्पांची कामे ः शहरात विशेषतः शिवाजीनगर आणि स्वारगेट परिसरात गेल्या काही महिन्यांपासून विकास प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यात उड्डाण पुलाच्या बांधकामांचे मोठे काम आहे. त्या कामामुळे हवेत सूक्ष्म धूलिकण वाढत असल्याचे निरीक्षण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोंदविले आहे. 

उघड्यावर कचरा जाळणे : हडपसर येथील रस्त्यांची गुणवत्ता आणि कचरा जाळण्याचे प्रमाण याचा विपरित परिणाम हवेच्या गुणवत्तेवर होत असताना दिसतो. त्यामुळे हडपसर, कात्रज परिसरात ‘पीएम २.५’चे प्रमाण वाढ असल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने हे प्रमाण वाढत आहे.  

रस्त्यावरून उडणारी धूळ
रस्त्याची गुणवत्ता चांगली नसल्यानेही प्रदूषण वाढते. आंतरराष्ट्रीय प्रमाणानुसारचे रस्ते पुण्यात नाहीत. त्यातून उडणारी धूळ वातावरणात मिसळल्याने सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म धूलिकण पसरतात. शहरातील प्रदूषणामागचे हे एक महत्त्वाचे कारण ठरले आहे. शहरातील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रिटचे केल्याने शहराच्या मध्य वस्तीत हे प्रमाण कमी झाले असले तरीही हडपसर, कात्रज, मांजरी या भागात रस्त्यावरील धुळीचे प्रमाण प्रचंड असल्याचे दिसून येते. 

हवेतील कार्बन, सल्फर व नायट्रोजन संयुगे, सूक्ष्म धूलिकण, कार्बन मोनॉक्‍साईड अशा प्रदूषकांचे प्रमाण वाढल्यास हवा प्रदूषित होते. त्यात पीएम १० आणि पीएम २.५ यांचाही समावेश होतो. दिल्लीमध्ये या धूलकणांच्या प्रदूषणाची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे तेथील हवा आरोग्यास धोकादायक झाली आहे. 

यातून धूलिकण उडतात
वादळ, वणवा, बांधकामे, कारखाने, इंधनाचे ज्वलन.

जनता दरबार

'प्रश्‍न नागरिकांचे उत्तर अधिकाऱ्यांचे' या उपक्रमात पुणे 'महावितरण' कार्यालयासंदर्भातील आपले प्रश्‍न, अडचणी, शंका यांना 'महावितरण' चे वरिष्ठ अधिकारी 'सकाळ'च्या माध्यमातून उत्तर देणार आहेत. त्यासाठी वीजपुरवठा, वीज बिल किंवा या संदर्भातील आपले प्रश्‍न थोडक्‍यात आमच्याकडे 18 नोव्हेंबरपर्यंत पाठवावेत. प्रश्‍न थोडक्‍यात आणि नेमकेपणाने नमूद करावेत.
आपले प्रश्‍न 9921097482 या व्हॉट्‌स ऍप क्रमांकावर किंवा sakaljanatadarbar@esakal.com या ई-मेलवर पाठवा.

निवडक प्रश्‍न उत्तरासह 'सकाळ'मध्ये पुणे आवृत्तीत प्रसिद्ध होतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com