‘फेस टू फेस’ गंमत-जंमत

नीलम कराळे
गुरुवार, 22 मार्च 2018

पुणे - सध्या तुमचं पहिलं प्रेम काय करत आहे, हे जाणून घ्यायचं आहे का? आयुष्यात तुमची किती प्रेमप्रकरणं होतील? असे मनाला गुदगुल्या करणारे अनेक प्रश्‍न आणि त्यांची मजेशीर उत्तरं तुमच्या मित्र-मैत्रिणींच्या फेसबुक टाइमलाइनवर तुम्ही वाचत असाल... अशा ‘टाइमपास पोस्ट’ सध्या फेसबुकवर व्हायरल होत असून, त्याच्याशी संबंधित अनेक ॲप्लिकेशन्स निर्माण होत आहेत. 

पुणे - सध्या तुमचं पहिलं प्रेम काय करत आहे, हे जाणून घ्यायचं आहे का? आयुष्यात तुमची किती प्रेमप्रकरणं होतील? असे मनाला गुदगुल्या करणारे अनेक प्रश्‍न आणि त्यांची मजेशीर उत्तरं तुमच्या मित्र-मैत्रिणींच्या फेसबुक टाइमलाइनवर तुम्ही वाचत असाल... अशा ‘टाइमपास पोस्ट’ सध्या फेसबुकवर व्हायरल होत असून, त्याच्याशी संबंधित अनेक ॲप्लिकेशन्स निर्माण होत आहेत. 

फेसबुकवर स्क्रोल करताना काही मजेशीर आणि उत्सुकता वाटणाऱ्या पोस्ट फिरत आहेत. खरंतर प्रश्‍न वैयक्तिक असले, तरीही त्यांची उत्तरं टाइमलाइनवर मजा म्हणून पब्लिश केली जात आहेत. तुम्हाला राजकारणात भविष्यात कोणते पद मिळेल? तुमच्याबद्दल लोक काय विचार करतात? तुमच्यावर कोण ‘सिक्रेट प्रेम’ करतं? अशा जिव्हाळ्याच्या प्रश्‍नांची उत्तरं काय असतील, याच्या उत्सुकतेने त्या ‘लिंक’वर क्‍लिक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अशा लिंकमध्ये मल्लूॲप्स, नेमटेस्ट, गॉड इन वर्ल्ड, वॉन वॉन अशी ॲप्लिकेशन्स लोकप्रिय ठरल्याचे फेसबुकवर पाहायला मिळते.

या ॲप्लिकेशन्समध्ये ‘मराठमोळी’ उत्तरं मिळण्याचीही सोय आहे. ‘तुम्हाला गर्लफ्रेंड कधी मिळेल जाणून घ्या,’ या प्रश्‍नाचे उत्तर ‘‘भावा... तू सिंगलच मरणार आहेस,’’ असेही येते. ‘तुमचं लग्न कधी होईल’, या प्रश्‍नाचे उत्तर ‘कशाला एखाद्या गरीब बिचाऱ्याचे हाल करता राव’ असेही येते. अशा काही लिंकमध्ये तुम्ही स्वतःची देखील ॲप्लिकेशन बनवू शकता. 

याबाबत उमेश काटकर यांनी सांगितले, की ‘‘यातील काही वेबसाइटवर मी काही प्रश्‍न-उत्तरे तयार केली होती, तसे कोणीही ॲप्लिकेशन तयार करू शकतात, त्यासाठी वेबसाइटवर तसा ऑप्शन असतो.’’ 

खासगी बॅंकेत नोकरी करणारा विनय जेऊरे म्हणाला, ‘‘फेसबुकवर टाइमपास करायचा असल्याने अशा लिंक्‍सला मी नेहमी क्‍लिक करतो. तसेच, काही आवडलेल्या लिंक माझ्या टाइमलाइनला शेअर करतो. त्यात काही खूष करणाऱ्या, तर काही हास्यास्पद असतात. पण, टाइमपास म्हणून मी याकडे पाहतो.’’

वैयक्तिक माहितीचा गैरवापर 
प्रत्येक टाइमपासच्या मागे समोरच्याला काहीतरी फायदा नक्की असतो. तुम्ही जेव्हा ‘इंटरेस्टिंग’ म्हणून कोणतीही लिंक ओपन करता, त्यानंतर तुम्हाला पोस्ट पब्लिश करण्यापूर्वी फेसबुक प्रोफाइलची माहिती वापरायची परवानगी मागितली जाते. त्यात तुमचे फेसबुकवर अपलोड केलेले फोटो, ई-मेल आयडी, फ्रेंडलिस्ट, टाइमलाइनचा डाटा ॲप्लिकेशन निर्मात्या कंपनीकडे जमा होतो. या माहितीचा गैरवापर होण्याचाही धोका असतो. त्यामुळे कोणत्याही लिंकवर क्‍लिक करण्यापूर्वी विचार करा.

निव्वळ टाइमपास म्हणून वापर
वैयक्तिक प्रश्‍नांवर अधिक भर
तुमची खासगी माहिती जमा होते 

Web Title: pune news face to face facebook timeline