कडधान्य, चटण्यांना पसंती 

रीना महामुनी-पतंगे
मंगळवार, 6 जून 2017

पुणे - शेतकऱ्यांच्या संपामुळे निर्माण झालेल्या भाजीपाल्याच्या तुटवड्यामुळे दुकानदार व फेरीवाल्यांनी व्यवसाय बंद ठेवले आहेत. त्यातच भाजीपाल्याचे दर वधारल्याने सर्वसामान्यांना भाजी विकत घेणे परवडत नाही. परिणामी, महिलांनी भाजीपाल्याला पर्याय म्हणून जेवणात कडधान्य, विविध चटण्या, भाजणी, रेडी टू कुक, अंडी, उन्हाळी पदार्थ बनविण्यास पसंती दिली आहे. 

पुणे - शेतकऱ्यांच्या संपामुळे निर्माण झालेल्या भाजीपाल्याच्या तुटवड्यामुळे दुकानदार व फेरीवाल्यांनी व्यवसाय बंद ठेवले आहेत. त्यातच भाजीपाल्याचे दर वधारल्याने सर्वसामान्यांना भाजी विकत घेणे परवडत नाही. परिणामी, महिलांनी भाजीपाल्याला पर्याय म्हणून जेवणात कडधान्य, विविध चटण्या, भाजणी, रेडी टू कुक, अंडी, उन्हाळी पदार्थ बनविण्यास पसंती दिली आहे. 

शेतकऱ्यांच्या संपामुळे कडधान्य आणि विविध चटण्यांचा वापर पर्याय म्हणून गृहिणी करत आहेत. याबाबत "सकाळ'ने त्यांच्याशी संवाद साधला.  सीमा त्रिपाठी म्हणाल्या, ""भाज्यांचे भाव वाढल्याने आर्थिक ताण पडत आहे. त्यामुळे भाज्यांना पर्याय म्हणून गेली चार दिवस जेवणात कडधान्यांचा वापर वाढला आहे. तसेच, "रेडी टू कुक'चाही पर्याय असून उन्हाळी पदार्थांचा म्हणजेच सांडगे, कुरड्या-पापड यांची भाजी करते. बटाट्याच्या विविध भाज्याही करता येतात.'' 

राधा दळवी म्हणाल्या, ""मी भाजणीचे पीठ तयार करून ठेवले आहे. त्यामुळे विविध पदार्थ झटपट करता येतात. भाज्यांना पर्याय म्हणून विविध प्रकारच्या चटण्या करून ठेवल्या आहेत. "स्पेशल भाजी' म्हणून अंड्याचे विविध प्रकार करते. तसेच, उन्हाळी पदार्थांचा पर्याय उपलब्ध आहेच.'' 

मीना पांडे म्हणाल्या, ""पाच रुपयांच्या भाजीची किंमत 100 ते 150 रुपयांच्या घरात पोचली आहे. मंडईमध्ये भाज्या नाहीत. ज्या उपलब्ध आहेत त्यांची किंमत जास्त आहे. त्यामुळे भाज्यांना पर्याय म्हणून इडली चटणी, शेंगदाणे, खोबऱ्याची चटणी केली जाते. तसेच, दुधाला पर्याय म्हणून दूध पावडर वापरते.'' 

नेहा आकीवटे म्हणाल्या, ""दररोज भाजी काय करायची, हा प्रश्‍न रोज पडतो. त्यात संपामुळे भाज्यांचे भाव वाढले आहेत. त्याला पर्याय म्हणून मोड आलेल्या उसळी, कोशिंबीर, कडधान्यात राजमा, छोले, वाटाणा असे पदार्थ बनविते. अंडी आणि चिकनही करते.'' 

भाज्यांना पर्याय म्हणून कडधान्य, अंडी खाणे हा अतिशय चांगला आहार आहे. कारण, अंड्यांमध्ये जीवनसत्त्व व कडधान्यातून प्रोटिन्स मिळतात. तसेच मासे, ओटस, सोयाबीन हे पदार्थ आरोग्यासाठी चांगले आहेत. संपामुळे भाज्या मिळत नाही; मात्र राजस्थानमध्ये तर भाज्या मिळतच नाही, त्यामुळे तेथील नागरिक जेवणात कडधान्याचा वापर करतात. तसेच, विदर्भात विविध डाळींचा वापर करून वडे व रस्साभाजी बनवितात. 
- मधुरा भाटे, आहारतज्ज्ञ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news farmer strike farmer Pulse