तरुणाईला ‘फिजेट स्पिनर’चं वेड

स्वप्नील जोगी 
बुधवार, 28 जून 2017

पुणे - सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात केव्हा काय आणि कसं होईल काही सांगता येत नाही. एखादी नवी फॅशन असो, एखादा व्हायरल होत गेलेला व्हिडिओ असो, एखादी अनपेक्षित घटना असो किंवा मग ‘फिजेट स्पिनर’ नावाच्या कुठल्याशा एका खेळण्याने लाखो तरुणांना आपलं वेड लावणं असो...सोशल मीडियाने घडवलेलं हे फिजेट स्पिनर नावाचं ‘व्हायरल फॅड’ आजकाल तरुणाईच्या हातातलं ताईतच बनत चाललंय. 

काही महिन्यांपूर्वी पोकेमॉनने अनेकांना वेड लावल्याचं आपण पाहिलंच होतं. हा खेळ जरी पोकेमॉनसारखाच सोशल मीडियावरून व्हायरल झाला असला, तरी तो मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर खेळायचा खेळ नसून ते एक प्रत्यक्ष हातात धरून खेळायचं खेळणं आहे.

सध्या फावल्या वेळेत अनेकांसाठी हे खेळणं विरंगुळा (आणि काहींसाठी तर सवयसुद्धा) बनत चाललंय. फिजेट स्पिनरला वाढता प्रतिसाद सुरू झाला तो अमेरिकेत आणि काही पाश्‍चात्य देशांत; पण एखाद्या त्सुनामीसारखी ही क्रेझ पाहता पाहता सगळीकडे पोचली ती सोशल मीडियामुळे. आज फक्त पुण्यातच नव्हे, तर देशभरात ही क्रेझ पाहायला मिळतेय. त्याचा अतिवापर मात्र टाळायला हवा, असाही एक सूर अनेकांकडून व्यक्त केला जातोय. लक्ष विचलित होण्यासारखे प्रकारही त्यामुळे होतात, ही दुसरी बाजूही काही तज्ज्ञांनी मांडली आहे.

...मात्र जरा काळजीही घ्या
या खेळण्याचे दुष्परिणामही असल्याचं अनेक जण सांगत आहेत. लहान मुले या खेळण्याशी खेळत असताना त्याच्या वेगवान गिरकीमुळे त्यांना धोका उत्पन्न होऊ शकतो, असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. शिवाय, अभ्यासावरून दुर्लक्ष होण्याची समस्याही असल्याचं सांगितलं जातंय.

आम्हाला याबद्दल कळलं आणि आम्ही कुतूहलापोटी ते विकत घेतलं. फिजेट खेळताना मजा येते. एका हातात ते घेऊन खेळताना दुसऱ्या हाताने आपण इतर कामंही करू शकतो. टाइमपास म्हणून मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसण्यापेक्षा हा खेळ खेळणं अधिक चांगलं. अर्थात एकदा सवय लागली तर यात बराचसा वेळही जाऊ शकतो, तेवढी काळजी मात्र घ्यायला हवी. 
- प्रांजल प्रधान आणि अमेय पेंडसे, फिजेट स्पिनर खेळणारे

Web Title: pune news fidget spinner