टीमवर्कमुळे सहजीवन बहरले...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

समालोचनामुळे मला कुटुंबालाही वेळ देता येत नव्हता. अशावेळी मला अनिताने खूप साथ दिली. माझी पत्नी म्हणजे माझ्या आयुष्याला लागलेली खूप मोठी लॉटरी आहे. कोणत्याही नात्याशी अपेक्षा ठेवू नका, त्याला त्याच्याप्रमाणे फुलू द्या, त्यामुळेच नाते टिकते.
- हर्षा भोगले, क्रीडा समालोचक

पुणे - आमची बाँडिंग एका टीमसारखी आहे... कधी-कधी या प्रवासात विकेटही पडल्या... पण सहजीवनाच्या पीचवर अनिताने बाजी मारली आणि आमची ३२ वर्षांची इनिंग यशस्वी ठरली... विश्वास, आदर आणि प्रामाणिकता हा आमच्या नात्यातील अतूट बंध असून टीमवर्कने केलेल्या संसाराने आमचे सहजीवन बहरले... असं सांगत होते क्रीडा समालोचक हर्षा भोगले.

अनुरूप विवाह संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘अनुरूप ४३ नॉट आउट’ या कार्यक्रमात हर्षा भोगले व त्यांच्या पत्नी अनिता यांच्याशी क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी संवाद साधला. संस्थेच्या संचालिका गौरी कानिटकर यांनी लिहिलेल्या ‘रंग लग्नाचे, लग्नापूर्वीच जाणायचे’ या पुस्तकाचे प्रकाशन या वेळी झाले. महेंद्र कानिटकर उपस्थित होते.

हर्षा म्हणाले, ‘‘अहमदाबादच्या ‘आयआयएम’मध्ये आल्यानंतर माझी अनिताशी ओळख झाली. लोकांना मी कला शाखेत पदवी घेईन असे वाटले होते; पण मी इंजिनिअर झालो. अनिता ही माझी जोडीदार होऊ शकते, ही जाणीव मित्रांनी करून दिल्यानंतर मी तिला नकळत होकार दिला.’’ 

अनिता म्हणाल्या, ‘‘हर्षा हे हसतमुख स्वभावाचे असून, मी खूप गंभीर स्वभावाची आहे. आमचे स्वभाव परस्परविरोधी असूनही आमच्यात कधी भांडण आणि वादविवाद झाले नाहीत.’’ सूत्रसंचालन तन्मय कानिटकर यांनी केले. 

हर्षा यांना लग्नापूर्वीपासूनच क्रिकेटचे वेड होते. मला लोक म्हणायचे, की तू त्यांचं दुसरं प्रेम आहे; पण मला याचा कधी राग आला नाही. आज ते जे काही आहेत ते क्रिकेटमुळेच. विवाह हा परफेक्‍ट नसतो, तर तो बनवावा लागतो. 
- अनिता भोगले

Web Title: pune news Harsha Bhogle Sports anurup 43 Not Out