'भारतीय शास्त्रीय नृत्याला उज्ज्वल भवितव्य'

नीला शर्मा
शनिवार, 13 जानेवारी 2018

भरत नाट्यम्‌ या अभिजात नाट्यशैलीला महाराष्ट्रात रुजवत, तिच्यात मराठमोळ्या संस्कृतीची गुंफण करणाऱ्या प्रसिद्ध नृत्यकलावंत डॉ. सुचेता भिडे- चापेकर यांच्या "कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट'च्या तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त त्यांच्याशी नीला शर्मा यांनी केलेली बातचीत. 

प्रश्‍न - कलावर्धिनी स्थापन करण्यामागचा उद्देश काय होता? 
डॉ. भिडे - पुण्यात कथकसाठी वातावरण तयार करण्यात पंडिता रोहिणी भाटे यांनी बहुमोल कार्य केलं होतं, पण इथं भरतनाट्यम्‌ नृत्यशैली नव्हती. मी भरतनाट्यम्‌ शिकून मुंबई-पुण्यात कार्यक्रम करत होते. या संदर्भात सप्रयोग व्याख्यान व कार्यशाळाही घेत होते. त्यातूनच सुचलं, की महाराष्ट्रात या शैलीचा प्रचार-प्रसार करण्यासाठी संघटनात्मक पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे. यासाठीच 1 जानेवारी 1988 रोजी "कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट'ची स्थापना केली. गेल्या तीस वर्षांमध्ये संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवता आले. महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये मिळून आता संस्थेच्या पस्तीस शाखा आहेत. फ्रान्स व अमेरिकेतही संस्थेमार्फत भरतनाट्यम्‌ शिकवलं जातं आहे. 

प्रश्‍न - भरतनाट्यम्‌ व मराठी संस्कृतीचा संगम साधण्यासाठी आपण केलेल्या विशेष प्रयोगांबद्दल सांगा. 
डॉ. भिडे -
मी गुरू पार्वतीकुमारांकडे नृत्य शिकले. त्यांनी यातील तंजावरमधील प्रयोगांचा खास अभ्यास केला. तेथील शहाजीराजे भोसले यांनी या नृत्यशैलीसाठी पूर्वापार वापरल्या जाणाऱ्या कर्नाटक संगीताचा परीघ ओलांडत मराठी व हिंदीत रचना केल्या. त्या स्थानिकांमध्ये लोकप्रिय झाल्या. नंतर सरफोजीराजे यांनीही त्यांचा वारसा पुढं नेला. गुरू पार्वतीकुमारांचं याबाबत संशोधन चाललेलं असताना मीही त्या अभ्यासात सहभागी होते. मग मीही शहाजीराजांच्या रचनांवर आधारित संशोधनात्मक काम केलं. मुंबई व चेन्नईतल्या म्युझिक ऍकॅडमीत मी नृत्यप्रबंध सादर केला. त्यासाठी गुरू किट्टप्पा यांनी मला शहाजीराजांच्या रचना राग-तालात बांधून दिल्या. रसिकांनी विचारलं, की साहित्याची भाषा मराठी आहे, तर मग संगीत मराठी का नको. मी ते आव्हान स्वीकारलं. सुरवातीला नाट्यपदांवर नृत्यसंरचना केल्या. नंतर पूर्णपणे हिंदुस्तानी संगीताचा विचार केला. तेव्हा डॉ. प्रभा अत्रेंनी विविध रागांमधील बंदिशी व पं. सुरेश तळवलकरांनी तालरचनेसाठी खूप सहकार्य केलं. पं. अर्जुन शेजवळांनी पखवाजवरील तालरचनांसाठी मदत केली आणि भरतनाट्यम्‌ मराठी संस्कृतीत एकरूप झालं. 

प्रश्‍न - सांस्कृतिक पातळीवर संस्था कोणत्या प्रकारचं परिवर्तन घडवू शकली? 
डॉ. भिडे -
केवळ विद्यार्थीच नव्हे तर रसिकांना या शैलीचा रसास्वाद घ्यायला तयार करण्यासाठीही आम्ही प्रयत्न केले. त्यांना या शैलीची माहिती करून देण्यासाठी परिक्रमासारखे महोत्सव नऊ वर्षांपासून आयोजित करत आहोत. चार वर्षांपासून दरवर्षी रसास्वादासाठी नृत्य व विवेचनपर चार कार्यक्रम करत आहोत. अभिजात नृत्याच्या कार्यक्रमांसाठी तिकीट विकत घेऊन येणारा रसिकवर्ग तयार करता आला, याचं समाधान आहे. येत्या तीन व चार फेब्रुवारीला प्रभात रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात केवळ नृत्यविषयक माहितीपटांचा महोत्सव करणार आहोत. माझी मुलगी अरुंधती पटवर्धन संस्थेची धुरा सांभाळते आहे. तिला साथ देत कुटुंबातीलच यशोदा पाटणकर व रमा कुकनूर या "कलादरू' व "तुका म्हणे' यांसारख्या गद्य-पद्याची जोड असलेली नृत्यशिल्पं घडवून परंपरेला नवे आयाम देत आहेत. माझी पहिली शिष्या स्मिता साठ्ये-महाजन नवनव्या सांगीतिक रचनांची भर घालते आहे. आज "रिऍलिटी शो'च्या परिणामातून गल्लोगल्ली नृत्याचे वर्ग सुरू झालेले दिसतात. या सगळ्यातून तरून जाऊन भारतीय अभिजात नृत्याला उज्ज्वल भवितव्य आहे, याची ग्वाही देणारे प्रयत्नही तरुणांकडून होत आहेत, याचं मला मोठं समाधान आहे. 

Web Title: pune news Indian dancer Sucheta Bhide Chapekar