पुस्तक हे खेळणं झालं पाहिजे 

बुधवार, 3 जानेवारी 2018

गेली काही वर्षे बंद पडलेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाला पुन्हा एकदा सुरवात झाली आहे. हे संमेलन शेवगाव येथे 27 ते 29 जानेवारी दरम्यान होणार आहे. याच्या अध्यक्षपदी पुण्यातील बालसाहित्यकार ल. म. कडू यांची नुकतीच निवड झाली आहे. त्यांच्याशी सुशांत सांगवे यांनी साधलेला संवाद. 

चित्रकार ही तुमची मूळ ओळख. मग बालसाहित्याकडे कसे वळलात?  
खरंय... मुळात मी चित्रकार आहे; पण शाळेत होतो तेव्हापासून लिहीत आलोय. माझी पहिली कथा 1965 मध्ये एका मासिकात प्रसिद्ध झाली होती. ती प्रसिद्ध झाल्यानंतर "मानधन घेऊन जाण्यासाठी या', असे पत्र मला आले. मी शालेय विद्यार्थी आहे, हे संपादकांना माहिती नव्हते. मी कार्यालयात गेलो. तेव्हा मला पाहून संपादक म्हणाले, "आम्ही लहान मुलांच्या हातात पैसे देत नाही. कथा कोणी लिहिली त्यांना पाठवा.'' ओळखपत्र दाखविल्यानंतर मग मानधन मिळाले. पुढे लेखन सुरूच राहिले. बालसाहित्यात वेगवेगळे प्रयोग व्हावेत म्हणून 1979 मध्ये "गमभन' ही प्रकाशन संस्थाही सुरू केली. इतरांकडून लेखन मागवू लागलो. पुस्तके प्रकाशित करू लागलो. त्यादरम्यान, लेखनाकडे थोडेसे दुर्लक्ष झाले; पण पुन्हा लिहू लागलो. त्याची "साहित्य अकादमी'नेही दखल घेतली. याचे एक वेगळेच समाधान आहे. 

मुले वाचत नाहीत, अशी नाराजी वारंवार व्यक्त होते. तुम्ही याकडे कसे पाहता?  
मुलांच्या हातात कसलेही खेळणे दिले तर ते घेऊन मुले खेळत नाहीत; पण खेळणे आकर्षक असेल तर त्यासोबत मुले नक्की खेळतात. पुस्तकांचेही तसेच आहे. लेखनापासून त्यातील चित्र, सजावट, बांधणी... अशा चहूबाजूने पुस्तक आकर्षक पाहिजे. मग मुले नक्कीच पुस्तकांशी खेळतील. याचा अर्थ मुलांमध्ये वाचनसंस्कृती वाढविण्याची जबाबदारी ही केवळ लेखक-प्रकाशकांचीच आहे, असे नाही. पालकांचीही तितकीच आहे. "मुले वाचत नाहीत' असे म्हटले जाते, त्याप्रमाणे "मुले घरातील मोठ्या माणसांचे अनुकरण करतात', असेही म्हटले जाते. त्यामुळे आधी पालकांमध्ये वाचनाची गोडी वाढायला हवी. तरच मुले या गोष्टीचे अनुकरण करू शकतील. 

बालकुमार साहित्याची स्थिती कशी सुधारता येईल. आजचे विश्‍व बालकुमार साहित्यात उमटतेय असे वाटते का?  
बालकुमार साहित्याची स्थिती चिंताजनक आहे; पण आजचे विश्‍व बालकुमार साहित्यात अजिबात उमटत नाही, असे नाही. ते ज्या पद्धतीने यायला हवे, हे येत नाही. हे खरे आहे. आपण काळाबरोबर असले पाहिजे. दुसरीकडे, कथा-कवितेत सर्रास इंग्रजी शब्द घुसवली जात आहेत. म्हणजे आपण लेखकच मुलांना बालपणापासूनच भाषेची नासाडी करायला शिकवतोय. आजची पिढी इंग्रजीत जास्त बोलते. म्हणून आम्ही अशा पद्धतीने लेखन करतोय, असे म्हणून चालणार नाही. प्रकाशकांनीही ज्याचा खप आहे, तेच प्रसिद्ध करू, ही वृत्ती बाजूला ठेवायला हवी. अशा सामूहिक जबाबदारीतून बालसाहित्याचा दर्जा वाढवता येईल. 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बालसाहित्यकारांना मानाचे स्थान मिळत नाही. 
प्रौढ साहित्य आणि बालकुमार साहित्य यात आपण दरी पाडली आहे. हे दोन प्रवाह जवळ आले पाहिजे. त्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बालसाहित्यकार, बाल वाचकांचा सहभाग असायला हवा. वाढायला हवा. आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचाच मुले हा एक घटक आहे. त्याकडे दुर्लक्ष होऊ नये. संमेलनात बालसाहित्यावर विचारमंथन झाले पाहिजे. 

अनेक वर्षांनी बालकुमार साहित्य संमेलन होत आहे. ते कसे व्हावे असे वाटते. आपल्या अध्यक्षीय भाषणाचे सूत्र काय असेल?  
आपण का आणि कशासाठी जमलो आहोत, हा प्रश्‍न समोर ठेवून साहित्य संमेलन व्हायला पाहिजे. भडक कार्यक्रमांच्या पुढे संमेलनाने गेले पाहिजे. गांभीर्याने विचार झाला पाहिजे. याचा अर्थ चेहरे पाडून बसले पाहिजे, असे नाही; पण संमेलनातून प्रत्येकाच्या हाती काहीतरी लागले पाहिजे. बालसाहित्याचा दर्जा कसा वाढवता येईल, ग्रामीण जीवन बालसाहित्यात कसे उमटेल, बालसाहित्य अधिकाधिक फुलण्यासाठी सरकारने कुठली पावले उचलली पाहिजेत... असे वेगवेगळे विषय माझ्या अध्यक्षीय भाषणात येतील. त्याचे लेखन सध्या सुरू आहे.

Web Title: pune news L M kadu interview book Child Literature