स्वयंघोषित नेत्यांकडून खंडणी वसूल

रवींद्र जगधने
शनिवार, 10 जून 2017

शहरातील उच्चभ्रू सोसायटीत भाडेकरूंकडून स्वयंघोषित माथाडी नेत्यांकडून सर्रास खंडणी वसूल केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार एका पोलिस अधिकाऱ्याच्या घरसामान शिफ्टिंगदरम्यान उघडकीस आला.

पिंपरी - शहरातील उच्चभ्रू सोसायटीत भाडेकरूंकडून स्वयंघोषित माथाडी नेत्यांकडून सर्रास खंडणी वसूल केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार एका पोलिस अधिकाऱ्याच्या घरसामान शिफ्टिंगदरम्यान उघडकीस आला. संबंधित स्वयंघोषित माथाडी नेत्यांना राजकीय पाठबळ आहे.

पिंपळे सौदागर, वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे निलख आदी भागातील अनेक उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये धनाड्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. त्या वेळी येथे भाड्याने राहणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अकरा महिन्यांच्या करारावर फ्लॅट भाड्याने दिले जात असल्याने त्यानंतर भाडेकरूंना नवीन फ्लॅट शोधावा लागतो, त्यामुळे एजंटलाही सोन्याचे दिवस आले आहेत. मात्र, घरसामान शिफ्टिंगदरम्यान संबंधितांची मोठी आर्थिक लूट होत आहे.

खंडणीवसुलीची पद्धत
घरसामान शिफ्टिंगच्या वेळी सोसायटीतील सुरक्षारक्षक या माथाडी नेत्यांना खबर देतात. घरसामान शिफ्टिंग होत असताना या नेत्यांचे बगलबच्चे तेथे येतात. ""आम्ही माथाडी कामगार आहोत, आम्हाला न विचारता दुसऱ्या व्यक्तीला कसे काम दिले, आम्हालाही पैसे द्या,'' असे म्हणत तीन ते चार हजारांची मागणी करतात. भाडेकरूला याबाबत काहीच माहिती नसते. तोपर्यंत हे माथाडी नेतेही मोटारीतून तेथे दाखल होतात. ""आम्ही माथाडी नेते आहेत'' असे म्हणत पैसे देण्यासाठी धमकी देत गोंधळ घालतात. भाडेकरू घाबरून त्यांना पैसे देऊन टाकतो. भाडेकरूने पैसे देण्यास टाळल्यास केल्यास कामगारांना किंवा टेंपोचालकालाही मारहाण केली जाते. पैसे मिळाल्यावर खबर देणाऱ्या सुरक्षारक्षकाला त्याचे कमिशन दिले जाते. कधीकधी या प्रकारात टेंपोचालक किंवा घरसामान शिफ्टिंग करणारे कामगार सहभागी असतात. त्यांनाही कमिशन मिळते.

घरसामानासाठी खंडणी
वाकड पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका सहायक निरीक्षकाचे काळेवाडीतील वूड्‌स सोसायटीतून घरसामान शिफ्टिंगदरम्यान या माथाडी नेत्यांनी चार हजारांची मागणी केली. पैसे न दिल्यास टेंपो सामानासह जाळून टाकण्याची धमकी दिली. मात्र, हे सामान पोलिस अधिकाऱ्याचे असल्याचे माहीत होताच त्यांनी तेथून पळ काढला. त्या वेळी अधिकाऱ्याला त्यांच्या मोटारीचा धक्का बसला. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून माथाडी नेत्याला अटक असता तो सराईत गुन्हेगार निघाला. त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला.

अशा पद्धतीने कोठेही असा प्रकार घडत असल्यास नागरिकांनी किंवा संबंधित भाडेकरूंनी पोलिस कंट्रोल रूम किंवा जवळच्या पोलिस स्टेशनला तत्काळ कळवावे. जेणेकरून असे खंडणीखोर पकडले जातील.
- गणेश शिंदे, उपायुक्त, परिमंडळ तीन

माथाडी नेत्यांच्या नावाखाली अशा पद्धतीने पैसे वसूल करणे चुकीचे आहे. काही लोक "काटे' आडनावाचा फायदा घेऊन माथाडी नेता म्हणत मिरवत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही; तसेच पिंपळे सौदागर भागात कोणीही माथाडी नेता नाही.
- शत्रुघ्न काटे, नगरसेवक

Web Title: pune news marathi news maharashtra news pimpri news