Vandana Chavan : काही झाले तरी पुण्यातील ‘बीआरटी’ बंद करू नका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vandana-Chavan

Vandana Chavan : काही झाले तरी पुण्यातील ‘बीआरटी’ बंद करू नका

पुणे : शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महत्‍वाचे स्थान असलेली बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम (बीआरटीएस) बंद करू नये. ही व्यवस्था सक्षम करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी खासदार वंदना यांनी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडे एका पत्राद्वारे शुक्रवारी केली.

शहराच्या अनेक भागांत गेल्या अनेक दिवसांपासून वाहतुकीची कोंडी होत आहे. ती सोडविण्यासाठी शहर पोलिसांनी बीआरटी बंद करण्याची सूचना केली आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात चव्हाण यांनी म्हटले आहे की, ‘पुण्याचे झपाट्याने शहरीकरण होत आहे. खाजगी वाहनांची संख्या वाढत आहे. पुणे शहरात सध्या कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. पुण्यातील प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणे हा एकमेव उपाय आहे. लोकांना खाजगी वाहनांपासून दूर राहण्यास आणि सार्वजनिक वाहतूक वापरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी, आपल्याला कार्यक्षम आणि शाश्वत, एकात्मिक वाहतूक व्यवस्थेच्या दिशेने काम करणे आवश्यक आहे. शहरातील बीआरटी बसचे जाळे आणि एकूण फेऱ्यांची संख्या समाधानकारक नाही. या प्रणालीत आणखी बसेसचा समावेश करण्याची गरज आहे. बीआरटी मार्गाचे बसस्थानक, संकेत फलक आणि प्रवेश यासारख्या पायाभूत सुविधांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

बीआरटीचे महत्त्व जगात अधोरेखित झाले आहे. त्यामुळे अनेक देशांत, शहरांत ही व्यवस्था वापरली जाते. आपल्याकडेही या योजनेचा अंगीकार झाला आहे. शहरात ११० किलोमीटर बीआरटीचे जाळे अद्याप पूर्ण झालेले नाही. ते पूर्ण करावे आणि बीआरटी सक्षम करावी, असेही चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे.

बीआरटीचे फायदे

- स्वतंत्र लेनमुळे बस वाहतूक वेगात

- प्रवाशांचा प्रवास सुरक्षित

- नियोजीत वेळेत इच्छितस्थळी पोचणे शक्य

- कमी जागेतून जास्त प्रवाशांची वाहतूक शक्य

- प्रदूषण कमी होते