मुळशी सत्याग्रहाचा समग्र इतिहास उलगडणार

नीलेश शेंडे
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

पाच खंडांमध्ये लेखन; २०२०- २१ या शताब्दी वर्षापर्यंत येणार वाचकांसमोर
पुणे - मुळशी सत्याग्रह... देशाच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात धरणाच्या विरोधात लढलेला पहिला संघर्ष! हा लढा लौकिक अर्थाने अयशस्वी ठरला असेल, पण धरण पुनर्वसनाच्या न्याय हक्काच्या लढ्यासाठी एक मैलाचा दगड ठरला. परंतु तरीही इतिहासाच्या पानांत त्याला काही ओळींपुरतेच स्थान मिळाले. आता या लढ्याचा समग्र इतिहास पाच खंडांमध्ये लवकरच वाचकांसमोर येणार आहे.

पाच खंडांमध्ये लेखन; २०२०- २१ या शताब्दी वर्षापर्यंत येणार वाचकांसमोर
पुणे - मुळशी सत्याग्रह... देशाच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात धरणाच्या विरोधात लढलेला पहिला संघर्ष! हा लढा लौकिक अर्थाने अयशस्वी ठरला असेल, पण धरण पुनर्वसनाच्या न्याय हक्काच्या लढ्यासाठी एक मैलाचा दगड ठरला. परंतु तरीही इतिहासाच्या पानांत त्याला काही ओळींपुरतेच स्थान मिळाले. आता या लढ्याचा समग्र इतिहास पाच खंडांमध्ये लवकरच वाचकांसमोर येणार आहे.

मुंबापुरीला झगमग-विण्याकरिता लागणारी वीज तयार करण्यासाठी शंभर वर्षांपूर्वी एका खासगी कंपनीने मुळशी परिसरात धरण बांधण्याचा निर्णय घेतला. त्याला तत्कालीन ब्रिटिश सरकारने पाठिंबा दिला. या धरणासाठी तब्बल ५२ गावे आणि हजारो नागरिक विस्थापित होणार होते, तेही त्यांच्या परवानगीशिवाय आणि कोणतेही पुनर्वसन न होता..! आणि मग सुरू झाला एका महासत्तेशी आणि एका बलाढ्य भांडवलदाराशी सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांचा संघर्ष.. या लढ्याची ठिणगी कशी पडली? लोकांना कोणी जागृत केले? कोण कोण सत्याग्रहात सहभागी झाले? कशा प्रकारे सत्याग्रह झाला? लढ्याला अपयश का आले? अशा हजारो प्रश्‍नांची उत्तरे काळाच्या उदरात लुप्त झाली.

मुळशी सत्याग्रहाचा समग्र इतिहास उपलब्ध नाही. सत्याग्रहाचे प्रवर्तक विनायकराव भुस्कुटे, सेनापती बापट या नेत्यांबरोबरच इतर अनेकांनी या सत्याग्रहाविषयी लिहिले आहे. कोणी स्वतंत्रपणे, तर कोणी आत्मचरित्रात सत्याग्रहाचा इतिहास मांडला आहे. मात्र या लढ्याचा समग्र इतिहास प्रकाशित व्हावा, यासाठी मुळशी सत्याग्रह इतिहास लेखन मंडळ आणि संपादक बबन मिंडे यांची धडपड सुरू आहे. गेली वीस वर्षे ते मुळशी सत्याग्रहाचा अभ्यास करत आहेत. पाच खंडांपैकी पहिल्या खंडाचे काम संपत आले आहे. सन २०२०- २१ हे मुळशी सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष आहे.

याच काळात मुळशी सत्याग्रहाचा इतिहास वाचकांसमोर यावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मिंडे यांनी मुळशी सत्याग्रहाचा इतिहास आपल्या तीन कादंबऱ्यांतूनही मांडला आहे. त्यापैकी ‘सत्याग्रह’ ही कादंबरी प्रकाशित झाली असून, ‘गुलामराजा’ आणि ‘वंशसंहार’ या कादंबऱ्या लवकरच प्रकाशित होत आहेत. 

अत्यंत खर्चिक असणारे हे काम गेली अनेक वर्षे कोणतेही अर्थसाह्य नसताना बबन मिंडे स्वतः पदरमोड करून निष्ठेने करत आहेत. या कामात लोकसहभाग वाढावा, काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी इतिहासप्रेमींनी आर्थिक योगदान द्यावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

इतिहास...
मुळशी पेट्यात (आताचा मुळशी तालुका) ९५ वर्षांपूर्वी धरण बांधण्याचा निर्णय झाला. त्‍यात आपल्या जमिनी, घरे, श्रद्धास्थाने, त्याचबरोबर संस्कृतीही बुडणार, या कल्पनेने येथील शेतकरी हादरला. पुण्यातील पत्रकार विनायकराव भुस्कुटे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सत्याग्रहाचा लढा उभारला. पांडुरंग महादेव बापट यांनी त्‍याचे नेतृत्व केले. त्यातून ‘सेनापती’ ही उपाधी त्यांना देण्यात आली. प्रचंड मोठा भांडवलदार आणि इंग्रज सरकारपुढे हा संघर्ष टिकला नाही. अखेर धरण झाले. त्‍यात ५२ गावे आणि हजारो एकर सुपीक गेली.

Web Title: pune news mulshi satyagrah history