या भरजरी साडीची किंमत 30 रुपये ! 

सोमवार, 29 जानेवारी 2018

पूनमच्या मदतीला दानशूरांचे हात 
"नियतीचं कोडं सोडविण्यासाठी संघर्ष करणारी पूनम' या विषयावर गेल्या आठवड्यात "मंडे स्पेशल'मध्ये पूनम गायकवाड यांच्या लढाईची कहाणी मांडली होती. या लेखाला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. तसेच, पूनम यांना मदत करण्यासाठी शेकडो दानशूरांचे फोनही आले. मात्र, फोन सातत्याने सुरू असल्याने अनेकांना फोन करता आला नाही. त्याबद्दल दिलगिरी.

पुणे - उत्तमनगर येथे एकदा पावले थबकली. एका भरजरी साडीने लक्ष वेधले होते. तेथे जाऊन चौकशी करणे भागच होते. लांबून वाटले काही शे रुपयांचा मामला असावा. जवळ जाऊन विचारले. "घ्या, साडीची किंमत अवघी 30 रुपये...' उत्सुकतेने साडी उघडली आणि निरखून पाहिली तर खूपच चमकदार, उत्तम... 

एका सजविलेल्या व्हॅनमधून अशा अनेक साड्या विकण्याचे काम सुरू होते. इतरही अनेक कपडे होते. शर्ट-पॅंट, मुला-मुलींचे ड्रेस, गाऊन, टोप्या इत्यादी. कोणताही कपडा घ्या किंमत 30 रुपये फक्त. ध्वनिक्षेपकावरून सांगितले जात होते. एवढ्या स्वस्तात कसे काय कपडे विकणे परवडते, असे विचारचक्र सुरू झाले. ही संकल्पना काय आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी या संकल्पनेचे जनक कालिदास मोरे यांची भेट झाली. "चांगल्या स्थितीतील कपडे आम्ही लोकांकडून घेतो आणि ते धुऊन, दुरुस्त करून पुन्हा वाटतो. त्यामुळे गरिबांची मोठी अडचण दूर होते.' मोरे यांनी संकल्पना स्पष्ट करायला सुरवात केली. 

उत्तमनगरमधील गरिबांसाठी असलेल्या या अनोख्या "शॉपिंग सेंटर'ला भेट दिल्यानंतर त्यामागील कथा जाणून घेण्यासाठी मोरे यांचे सेवा केंद्र गाठले. "गुडविल इंडिया उपक्रम' असा बोर्ड तेथे लटकलेला दिसला. मोरे वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने "गुडविल इंडिया उपक्रम' सहा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला आणि आजघडीला कपड्यांच्या पुनर्वापरातून गोरगरिबांच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांपैकी वस्त्रांची गरज भागविणारे ते मोठे केंद्र बनले आहे. आठ खोल्या कपड्यांनी भरलेल्या. एकीकडे ते धुऊन निर्जंतुक करण्याचे काम सुरू, तर दुसरीकडे गरजेप्रमाणे कपड्यांच्या दुरुस्तीचे (अल्टरेशन) काम सुरू. सगळी जबाबदारी महिलांवर. कपडे फेरवापराच्या या उपक्रमातून पन्नासेक जणांना रोजगार मिळतो. 

दहा लाख कपडे 
"कपडेदानाचा हा उपक्रम ऑगस्ट 2012 मध्ये छोट्या स्वरूपात सुरू करण्यात आला. आमची टीम घराघरांमध्ये फिरून जुने कपडे दान करा, असे आवाहन करत फिरत असे. सुरवातीला या उपक्रमाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. जुने कपडे घेऊन हे लोक काय करणार, असा प्रश्‍न विचारला जाई. मात्र आपले टाकून दिलेले चांगले कपडे इतरांच्या सत्कारणी लागत आहेत हे लक्षात आल्यानंतर लोकांना उपक्रम आवडायला लागला आणि कपडे दान करणाऱ्यांची संख्या वाढली. सहा वर्षांमध्ये तब्बल दहा लाखांवर जुने कपडे आमच्या संस्थेला मिळाले आहेत आणि त्यावर आवश्‍यक प्रक्रिया करून आम्ही आतापर्यंत सहा लाख कपड्यांचे वाटप केले आहे', मोरे सांगतात. कपडे गोळा झाले की त्यातील चांगले, वापरण्याजोगे कपडे वेगळे करायचे आणि ते भट्टीमध्ये स्वच्छ धुऊन घ्यायचे, गरजेप्रमाणे "अल्टरेशन', आवश्‍यक तिथे मशिनवर शिलाई करून झाली की ते नीटपणे प्रेस करून घ्यायचे आणि नव्या बॅगमध्ये घालून त्याचे पॅकिंग करून झाल्यानंतर वितरणासाठी ते व्हॅन किंवा छोट्या टेंपोमधून छोटे बाजार, गोर-गरिबांच्या वस्तीत न्यायचे... ढोबळपणे अशा पद्धतीने "गुडविल इंडिया उपक्रमा'चे काम चालते. त्यामुळे लाखो गरिबांच्या वस्त्रांची गरज पूर्ण झाली आहे. बरं हे कपडे अशा पद्धतीने सादर केले जातात, की ते नवेच वाटावेत. कपडे घेणाऱ्यांना ते जुने असल्याचे आवर्जून सांगितले जाते. 

आता गुडविल थाळी 
"गुडविल इंडिया उपक्रम' अनोखा तर आहेच, तो अत्यंत कौतुकास्पद आहे. लोकांच्या तो पसंतीला उतरल्यानंतर गरिबांची दुसरी गरज पूर्ण करण्यासाठी मोरे यांनी दुसरे पाऊल टाकले ते "गुडविल थाळी' या नावाने. उत्तमनगरलाच त्यांनी पहिले केंद्र (आउटलेट) सुरू केले. तेथेदेखील "गुडविल थाळी' मिळते अवघ्या 30 रुपयांमध्येच. रुचकर, पौष्टिक जेवण अत्यंत कमी दरात मिळत असल्याने तेथे गोरगरिबांबरोबरच अन्य मंडळीही भेट देत आहेत आणि भोजनाचा आस्वाद घेत आहेत. "गुडविल थाळी'ची अशी आणखी "आउटलेट' सुरू करण्याचा संकल्प कालिदास मोरे यांनी सोडला आहे. 

दान कपड्यांसाठी पैसे का? 
जुने कपडे गोळा करणे, त्यावर प्रक्रिया करणे आणि ते पुन्हा वितरित करणे यावर बराच खर्च होतो. शिवाय अगदी मोफत कपडे दिले तर घेणाऱ्यांच्या लेखी त्याची काहीच किंमत राहत नाही. कपडे घेतले जातील, पण ते वापरले जातीलच याची हमी नाही आणि थोडी किंमत ठेवल्याने गरजेपुरतेच कपडे घेतले जातात. त्यामुळे ते अधिकाधिक लोकांना उपलब्ध होऊ शकतात. म्हणून सर्वसामान्यांनाही परवडणाऱ्या किमान किमतीमध्ये कपडे देण्याचा "गुडविल इंडिया उपक्रमा'चा उद्देश आहे. एवढे स्वस्त कपडे घेण्याचीही क्षमता नसलेल्यांना मोफत दिले जातात. 

Web Title: pune news nandkumar sutar article positive story