OLX वर गाडी पाहा, पैसे खात्यात भरा आणि ठणाणा...

गुरुवार, 22 जून 2017

घर भाड्याने देण्यापासून ते छोट्या मोठ्या गोष्टींची खरेदी-विक्री करण्यासाठी विविध संकेतस्थळांवरून ऑनलाईन जाहिराती देणे आता नित्याचे झाले आहे. बाजारपेठेतील स्पर्धेमुळे कमीत कमी किमतीत वस्तू मिळविण्याचा लोकांचा प्रयत्न असतो. या मानसिकतेचा आणि ऑनलाईन तंत्राचा गैरफायदा घेऊन अशा लोकांना लुबाडण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. 

पुणे : "सुमारे 13 लाख रुपये किमतीची कार विकायची आहे फक्त साडेचार लाखांत...! उद्यापर्यंत घेणार असाल तर चार लाखांत मिळणार... अगदी आता लगेच घेतली तर 3 लाख 20 हजारांत देतो...!" असे सांगून ऑनलाईन जाहिरातींद्वारे सामान्य नागरिकांना लुबाडले जात आहे. विशेष म्हणजे यामध्ये बाहेरच्या देशांतून आलेल्या तरुणांचे रॅकेट असल्याचे समोर आले आहे.
 
वापरलेल्या (सेकंड हँड) वस्तूंच्या ऑनलाईन खरेदीविक्रीच्या OLX या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका बनावट जाहिरातीसंबंधी नागरिकांकडून तक्रार आल्यावर 'ई सकाळ'च्या प्रतिनिधींनी त्याची शहानिशा केली. एकाने बाजारात 13 लाख किंमत असलेली 2011 ची स्कॉर्पिओ गाडी 4.5 लाखांत विकण्याची जाहिरात दिली होती. संबंधित व्यक्तीशी 'गिऱ्हाईक' म्हणून 'ई सकाळ'ने संपर्क साधला. समोरून परदेशी युवक बोलत होता. त्यावेळी इंग्रजीतून झालेला संवाद...

अ - तुमची गाडी विकायची आहे असं OLX वर पाहिलं... 
ब- होय. उपलब्ध आहे. तुम्ही कुठून बोलत आहात?... पुणे विमानतळावर गाडी आहे. मी आता बंगळूरमध्ये आहे. 
अ- बरं मग गाडी पाहता येईल का?
ब- ती स्कॉर्पिओ विमानतळावरील अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे. खूप खर्च असल्याने मला माझ्या देशात परत नेता येत नाही म्हणून एक आठवडा विमानतळावर पार्किंग केले. पण माझा व्हिसा अजून मिळाला नाही. मला दोन महिन्यांत परत यायलाच जमले नाही. त्यामुळे विमानतळ प्राधिकरणाने गाडी ताब्यात घेऊन 1 लाख 86 हजारांचा दंड आकारला आहे. मला ती विकायची आहे. दंड भरून तुम्ही गाडी आणि कागदपत्रे घ्या. उरलेले पैसे मला दोन आठवड्यांनी नंतर द्या.

अ- पण मालक तुम्ही आहात. ते माझ्याकडे गाडी कसे देतील? 
ब- तुम्हाला खरंच घ्यायची असेल तर पुणे विमानतळाचे अधिकारी मिस्टर बसवराज (बनावट) यांना मी सांगितलेलं आहे. त्यांचा नंबर देतो. त्यांच्याशी बोला. ते पैसे भरण्याची प्रक्रिया सांगतील. पैसे भरूनच तुम्हाला गाडी ताब्यात मिळेल. गाडी आवडली नाही तर परत करा. तुमचे पैसे परत केले जातील. 

अ- गाडी तुम्ही आल्यावरच घ्यायला येतो...

ब- दोन दिवसांत दंड भरून गाडी आणली नाही तर ती भारत सरकारकडे जमा होईल. 
अ- अच्छा. गाडी एकूण कितीपर्यंत देणार? 

ब- तुम्हाला कितीला हवी आहे? आज घेतली तर चार लाखाला देतो. 
अ- नाही. आज एवढे पैसे जमणार नाहीत. दोन दिवसांत तीन लाखांपर्यंत जमतील. 
ब- आता लगेच 1.86 लाख भरा. मी 3 लाख 20 हजारांपर्यंत देतो. बाकी पैसे नंतर द्या मला. 

यावर बरं म्हणून बसवराज नाव सांगणाऱ्या व्यक्तीशी बोलून 'ई सकाळ'च्या वतीने दोघेजण गिऱ्हाईक म्हणून गाडी पाहण्यासाठी आणि बसवराजला भेटण्यासाठी म्हणून दोघेजण पुण्याच्या लोहगाव विमानतळाच्या ठिकाणी जातात. तिथून पुन्हा बसवराजला कॉल करतात. 
बसवराज- एक अकाऊंट नंबर देतो. त्यावर आधी पैसे भरून या. पैसे भरल्याची पावती आणा. मगच गाडी दाखवतो. 

थोड्या वेळाने बसवराज कॉल करून सांगितले की, "आम्ही पैसे रोख स्वरुपात आणले आहेत. अकाऊंटवर भरण्यापेक्षा येथेच थेट घ्या. आम्ही येथे आलो आहोत."
असे म्हटल्यावर तो नकार देऊ लागला. मालकाशी बोला आणि पैसे खात्यावरच भरा असं पुनःपुन्हा सांगू लागला. 

पुन्हा मूळ मालकाला फोन केला असता आपण दिल्लीला आलो असल्याचे तो सांगू लागला. बंगळूरहून हा लगेच दिल्लीला गेला याबाबत आश्चर्य वाटले. तसेच, तुम्ही विमानतळावर कशाला गेलात. तुम्हाला खात्यावर पैसे भरायला सांगितले आहेत. त्याशिवाय गाडी पाहायलाही मिळणार नाही. पुन्हा बसवराज याला फोन लावून विमानतळाच्या येथे किमान भेटून बोलण्यासाठी ये अशी विनंती केली असता त्याने थेट शिवीगाळ करण्यास सुरवात केली. 

यानंतर मात्र, हे भामटे असल्याचा संशय पक्का झाला. त्या परिसरातील काहीजणांना विचारले असता, त्यांनी सांगितलेली माहिती धक्कादायक होती. ते म्हणाले, "साहेब, कसली गाडी आणि काय... असं काहीही नाही. हे भामटे लोक आहेत. एकजण येथे दोन दिवसांपासून येऊन इनोव्हा गाडीची चौकशी करत आहे. त्याने 1 लाख 30 हजार रुपये त्यांच्या खात्यात भरले आहेत... गाडी नाही आणि माणूसही भेटला नाही. फोन बंद करून ठेवला आहे!"

घर भाड्याने देण्यापासून ते छोट्या मोठ्या गोष्टींची खरेदी-विक्री करण्यासाठी विविध संकेतस्थळांवरून ऑनलाईन जाहिराती देणे आता नित्याचे झाले आहे. बाजारपेठेतील स्पर्धेमुळे कमीत कमी किमतीत वस्तू मिळविण्याचा लोकांचा प्रयत्न असतो. या मानसिकतेचा आणि ऑनलाईन तंत्राचा गैरफायदा घेऊन अशा लोकांना लुबाडण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. 

दरम्यान, OLX वरून कारमालकांना हेरून त्यांची फसवणूक करत कार चोरणाऱ्या ठगाला डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. मयूर तांबोळी असं त्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या चार कार जप्त केल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर, 'ई सकाळ'च्या वतीने वाचकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन आम्ही करत आहोत.

Web Title: Pune News online farud on car selling