

घरी लक्ष्मी आल्याची भावना
डॉ. नितीन करमळकर (कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) : ‘‘मुलीचे आणि वडिलांचे नातं काही अनोखेच असते. स्वरालीच्या रूपाने आमच्या घरात भरभराट आणि लक्ष्मी आल्याचे मला वाटते. घरी उशिरा आल्यावर बायको झोपली असली, तरीही स्वराली जागी असते. ‘जेवलात का’ असे तीच आवर्जुन विचारते. स्वराली सर्वस्व असल्याने मी तिची विशेष काळजी घेतो. आजही मी तिला कॉलेजला सोडाण्यासाठी ड्रायव्हरला सांगत नाही, तर मीच स्वत: ड्रायव्हर बनून तिला कॉलेजला सोडायला जातो.’’
नकारात्मक भूमिका नाकारते
रूपाली कृष्णराव (अभिनेत्री) : ‘‘आईच्या पोटात असल्यापासूनच मुलीचा संघर्ष सुरू होतो. आजही अनेक ठिकाणी महिलांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. ‘वंशाला दिवा हवा’ असे अनेक वेळा महिलांनाच स्वत:ला वाटत असते. हा समज पुसून टाकायला हवा. खरंतर, अनेक मालिकांमधूनही महिलांची भूमिका नकारात्मक दाखविली जाते. अशा भूमिका मी नाकारते. एक सक्षम महिला, स्वावलंबी आणि सकारात्मकपणे प्रत्येक गोष्टीला सामोरे जाणारी व्यक्तिरेखा समाजात परिवर्तन घडवून आणणारी असते. म्हणून मी अशा प्रकारच्याच भूमिका निवडते. आणि वडिलांना माझा अभिमान वाटावा म्हणून मी त्यांचे नाव माझ्यापुढे लावते.’’
सकारात्मक कृती करूया
डॉ. गणेश राख : ‘‘मुलीचा जन्म नाकारला जातो, तिला गर्भात मारले जाते यापासून ते हुंड्यासाठी तिचा बळी घेण्यापर्यंत अशा अनेक नकारात्मक गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत. परंतु केवळ नकारात्मक गोष्टींवर बोलण्यापेक्षा आपण सकारात्मकतेने कृती करूया, हे मला सगळ्यात महत्त्वाचे वाटते. माझ्या मुलीबद्दल बोलायचे झाल्यास आमचे नाते काही वेगळेच आहे. ती माझी खूप काळजी घेते. बहुतेक वेळा आम्ही दोघे बॉक्सिंग खेळतो. ती तिच्या पायावर उभी राहिल्यानंतर माझा संपूर्ण वेळ हा तिच्यासाठीच असावा, असे मला वाटते.’’
मुलीचे गाण्यासाठी प्रोत्साहन
हर्षित अभिराज (संगीतकार) - ‘‘मुलगा नसल्याची कमतरता मला जाणवत नाही. कारण मुलीने माझ्या कुटुंबाला पूर्णत्व दिले आहे. माझ्या गाण्यांची पहिली रसिक ती माझी मुलगी आहे. माझ्या प्रत्येक गाण्यासाठी ती प्रोत्साहन देते. ती सदैव माझ्या पाठीशी उभे राहते. म्हणूनच मुलीचे माझ्या आयुष्यात मोठे महत्त्व असून, एकुलत्या एका मुलीचा पालक असणे ही अभिमानास्पद गोष्ट आहे.’’
मुलीलाच दत्तक घेतले
संगीता बनगिनवार (पालक) - ‘‘मुलं दत्तक घेणे, ही केवळ एक प्रक्रिया आहे. म्हणून मी माझ्या मुलीला दत्तक घेतले असे म्हणत नाही, ती प्रक्रिया केवळ पूर्ण केल्याचे म्हणते. शेवटी निमिषा ही माझीच मुलगी आहे, हे सत्य आहे. आमच्या दोघींच विश्व काही औरच आहे. आमच ट्युनिंगही खूप जुळत. निमिषामुळेच मला आई होता आले.’’
आई-वडिलांशी ऋणानुबंध अव्यक्त
जुई आडकर (मुलगी) जुई आडकर (प्रमोद आडकर यांची मुलगी) - आई-वडील हे माझे मित्र-मैत्रीण आहेत. त्यांनी मला कोणतीही गोष्ट करून नको यासाठी थांबवले नाही. मुलगी म्हणून जगण्याचा पूर्ण अधिकार दिला. मी त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारते. त्यांच्याशी असलेले ऋणानुबंध अव्यक्त असेच आहेत.’’
करिअरचे शिखर सर
अर्चिता मडके (पालक) : ‘‘वंशाचा दिवा हवा ही मानसिकता अजूनही देशात रुजलेली आहे. त्यामुळेच स्त्रीभ्रूणहत्येसारख्या घटना घडतात. मात्र कालांतराने ही मानसिकता बदलेल असा मला विश्वास वाटतो. एकच मुलगी असल्यामुळे कोणतीही कमतरता भासली नाही. उलट तिने कुटुंब पूर्ण केले. आज ती स्वतःच्या पायावर उभी असून, करिअरचे यशस्वी शिखर तिने गाठले आहे.’’
मुलगा-मुलगी भेदभाव नाही
गार्गी देसाई (मुलगी) : ‘‘मुलीच्या जन्माचे आपण स्वागत केले पाहिजे. मुलगी ही मुलांपेक्षा कमी नाही. म्हणून मुलाला जितके महत्त्व दिले जाते तितके महत्त्व मुलीलाही मिळाले पाहिजे. आई-बाबांनी मुलगा-मुलगी असा भेद कधीच केला नाही. त्यांनी मला नेहमीच पाठिंबा दिला.’’
आई-वडील ‘रोल मॉडेल’
अपूर्वा अनासकर (मुलगी) : ‘‘मी लवकरच आई होणार आहे. आपल्या पोटी जन्म घेणाऱ्या मुलगा किंवा मुलीला आपण कसे घडवावे, याचा वस्तूपाठ म्हणजे माझे आई-वडील आहेत. ते दोघेही माझ्यासाठी ‘रोल मॉडेल’ आहेत. आई होताना माझ्यासमोर असणाऱ्या प्रश्नपत्रिकेची ‘रेडिमेड’ उत्तरे त्या दोघांच्या रूपाने माझ्यासमोर आहे.’’
बंधने लादलेली नाहीत
स्वराली करमळकर (मुलगी) : ‘‘घरात माझ्यावर कोणतीही बंधने आजवर लादलेली नाहीत. मला पुरेशी मोकळीक दिली आहे. आई-वडिलांनी टाकलेल्या विश्वासास पात्र ठरता यावे, त्यांना अभिमान वाटावा, यासाठी मी नेहमीच प्रयत्न करत असते.’’
प्रत्येक मुलीला सलाम
जान्हवी खांडेकर (पालक) : ‘‘अनेक अडचणींना सामोरे जात एक मुलगी स्वत: घडत असते. अशा प्रत्येक मुलीला सलाम. मुलींमध्ये मुळातच सर्व आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाण्याची ताकद असते. त्यामुळे आपली ताकद ओळखून मुलींनीही मार्ग काढत जीवन जगायला हवे.’’
स्त्रीभ्रूणहत्या थांबवावी
गायत्री भोई (मुलगी) : ‘‘स्त्रीभ्रूणहत्या थांबली पाहिजे. अशा घटना थांबल्या तर मुलगी नक्कीच हवीहवीशी वाटेल. हा बदल आपण घडवू शकतो. माझ्या आई-वडिलांना मला कधीच मुलगी असल्याची जाणीव करून दिली नाही. कारण त्यांनी मुलगा-मुलगी असा भेद कधीच केला नाही.’’
मुलीची भूमिका महत्त्वाची
केतकी बोथरे (पालक) : ‘‘मुलगीने आमच्या दोघांची जबाबदारी घेतली असून, ती आम्हाला खूप चांगल्याप्रकारे सांभाळत आहे. आम्ही तिच्याशी अनेक गोष्टी शेअर करतो, चर्चा करतो. कोणताही निर्णय घेताना तिची भूमिका विशेष महत्त्वाची असते.’’
माझी मुलगीच माझी प्रेरणा
‘‘आज समाजात अनेक घटना घडत आहेत. अजूनही लोकांची मुलगी नको, ही मानसिकता बदलेली नाही. लोक असे का वागतात हा प्रश्न पडतो. विसाव्या शतकातही स्त्रीभ्रूणहत्या होतात ही निंदनीय बाब आहे. आज मुलींनी मुलांना मागे टाकले आहे. त्यामुळे माझ्या घरी एक मुलगी जन्माला आली याची मला खंत वाटत नाही. आपण मुलींना समान संधी दिली पाहिजे. स्त्रिया या पुरुषांपेक्षाही सरस असतात, हे त्यांनी नेहमीच सिद्ध केले आहे. शारीरिक-मानसिकरीत्या त्या ताकदवान असतात हेही तितकेच खरे आहे. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्या लीलया पेलतात. माहेर-सासरमधील दुवा म्हणजे मुलगी. मी माझ्या मुलीला पाहूनच अनेक कविता लिहिल्या आहेत. कविता लिहिण्यासाठी माझ्या मुलीनेच मला प्रेरणा दिली आहे. आज मी तिच्याबरोबर प्रत्येक क्षण जगतोय. तिच्यासोबत नवनवीन विश्व अनुभवतो आहे.’’
- संदीप खरे, कवी (व्हिडिओद्वारे साधला संवाद)
मुलीत दिसते ‘माझी आई’
बाळासाहेब अनासकर (पालक) : ‘‘मुलींचा जन्म झाला आणि माझे सिगारेटचे व्यसन कायमचे बंद झाले. माझे आणि तिचे नाते खूप वेगळे आहे. रात्री उशिरा आल्यावर बायको झोपली असली, तरीही ‘बाबा जेवलात का’, असे तीच मला विचारते. माझ्या आईप्रमाणे ती माझी खूप काळजी घेते. त्यामुळे मी तिला ‘आई’च समजतो. अनेक वेळा अशक्य वाटणाऱ्या गोष्टींबाबत तिच्याशी चर्चा केल्यास सहज शक्य होतात.’’
‘‘घरात आम्ही चौघी बहिणी आणि एक भाऊ अशी भावंडं. मी सर्वांत मोठी, तर भाऊ सगळ्यात धाकटा. आम्हा पाच भावंडांना वाढवण्यासाठी वडिलांनी खूप कष्ट केले. मी मोठी असल्यामुळे माझ्यावर मोठ्या मुलाप्रमाणे नकळत अनेक जबाबदाऱ्या पडत गेल्या आणि त्या मी स्वीकारून पेलल्या. या अनुभवातून मुलगी असली तरी घर समर्थपणे सांभाळू शकते, हा आत्मविश्वास आला. एकाच मुलीवर थांबायचे हे मी पती किशोर यांना सांगितले. त्यांनीही त्यास संमती दिली. आमची मुलगी प्रियांका हिचा नुकताच विवाह झाला आहे. चांगल्या कंपनीत ती समर्थपणे नोकरीही करत आहे.’’
- केतकी बोथरे
‘‘एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय आम्ही घेतला. आम्हा दोघांनाही मुलगीच हवी होती. हे स्वप्न पूर्ण झाल्याने आम्ही दोघेही खूप आनंदी आहे. एक मुलीनंतर अजून एक ‘चान्स’ घ्यायला हवा, असा सासरकडील नातेवाइकांचा सुरवातीला आग्रह होता. मात्र, आमच्या दोघांचा निर्णय असून तो घेण्याचे आम्हाला स्वातंत्र्य द्या, असा विचार मांडला आणि तो सर्वांनी मान्य केला. आमची मुलगी स्ताशा ही सहा वर्षांची असून ती पहिलीच्या वर्गात शिकत आहे.
- किरण कामठे
‘‘मुलगी झाली, आम्हाला काही वाईट वाटले नाही. कारण समाजाच्या सर्वच क्षेत्रांत मुली आघाडीवर आहेत. तसेच मुलीही कर्तृत्ववान असतात, असे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. त्यामुळे मुलीच्या जन्माचे आमच्या घरात स्वागतच झाले. त्याला सासरच्या मंडळींनीही पाठबळ दिले. कोणत्याही प्रसंगामध्ये मुली डगमगत नाही, हेही अनेकदा दिसून आले आहे. मुली प्रेमळ आणि सिन्सिअरही असतात. त्यामुळे मुलगी झाल्याचा आनंदच आहे.’’
- ज्योती जाधव
‘‘माझ्या पतीला बहीण नव्हती. त्यामुळे त्यांचीही मुलगीच व्हावी, अशी इच्छा होती. त्यामुळे मुलगी झाल्यावर आम्हा उभयतांना आनंद झाला. आजकालच्या धावपळीच्या जीवनात मुलगाच पालकांना सांभाळतो, हा समज चुकीचा आहे. अनेक मुलीही आई-वडील आणि सासू-सासऱ्यांची प्रेमाने आणि जबाबदारीने देखभाल करताना दिसतात. घरात मुली जेवढ्या सक्षमपणे काम करतात, तसेच कर्तृत्व त्यांचे समाजातही उठून दिसते. त्यामुळे मुलगी झाल्याची खंत नव्हे तर अभिमानच आहे.’’
- ज्योती ताम्हाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.