अग्रगण्य स्टार्टअपच्या पाठीवर "सकाळ'ची थाप 

 अग्रगण्य स्टार्टअपच्या पाठीवर "सकाळ'ची थाप 
Updated on

पुणे - आरोग्यापासून मनोरंजनापर्यंत विविध क्षेत्रांत नावीन्यपूर्ण संकल्पना आणि तंत्रज्ञानाच्या आधारे आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या पाच स्टार्टअपच्या संस्थापकांचा सत्कार व सन्मान "सकाळ'च्या वर्धापनदिनी करण्यात आला. आरोग्यसेवा क्षेत्रातील "जेनेक्‍स हेल्थकेअर', कृषी क्षेत्रातील "ऍग्रोस्टार', वित्त-तंत्रज्ञान क्षेत्रातील "हेक्‍झानिका', सॉफ्टवेअर क्षेत्रातील "हॉटबुक' आणि "फ्लाइटबेस' या स्टार्टअपचा त्यामध्ये समावेश होता. "सकाळ'चे मुख्य संपादक श्रीराम पवार यांच्या हस्ते या स्टार्टअप संस्थापकांना "स्टार्टअप आयकॉन'चे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या वेळी "सकाळ'च्या पुणे आवृत्तीचे कार्यकारी संपादक नंदकुमार सुतार, सहयोगी संपादक सुनील माळी आदी उपस्थित होते. स्टार्टअप व नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी "सकाळ'ने घेतलेल्या पुढाकाराबद्दल स्टार्टअप संस्थापकांनी कौतुक केले. 

"स्टार्टअप आयकॉन'चे मानकरी 
जेनेक्‍सचे "लॅब मॅनेजमेंट सॉफ्टवेअर' ः www.genexehr.com 
(संस्थापक ः मुकुल मुस्तिकर) 

"इलेक्‍ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड'चा वापर अमेरिका व ब्रिटनमध्ये 72 टक्के होतो. भारतात त्याचे प्रमाण फक्त पाच टक्के आहे. केंद्र सरकारने नुकत्याच तयार केलेल्या "भारतीय ईएचआर' मानंकानुसार "ईएचआर' क्षेत्रातील कंपन्यांना प्रमाणित करण्याचाही केंद्र सरकारचा विचार आहे. आरोग्य तपासणी, चाचण्यांच्या कागदी अहवालांच्या नोंदी डिजिटल स्वरूपात आल्यानंतर त्याचे विश्‍लेषण व डॉक्‍टरांनी काढलेल्या निष्कर्षांच्या आधारे काही उपाययोजना करणे क्रमप्राप्त ठरते. या उपाययोजना म्हणजेच "प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअर'. अशा प्रकारे आरोग्य क्षेत्रात बदल घडवून आणण्याचे काम "जेनेक्‍स-ईएचआर' ही स्टार्टअप कंपनी करत आहे. आतापर्यंत पुण्यासह देशातील 28 शहरांमध्ये हे सॉफ्टवेअर पोचले असून, हजारो डॉक्‍टर, क्‍लिनिक व पॅथॉलॉजी लॅब, शाळा "जेनेक्‍स-ईएचआर' याचा लाभ घेत आहेत. 

ड्रोन नियंत्रित करण्यासाठी "फ्लाइट-ओएस' ः https://flytbase.com 
(संस्थापक ः नितीन गुप्ता) 

"ड्रोन' कॅमेऱ्यांच्या मदतीने विविध मोर्चे, सभा, कार्यक्रमांपासून ते अगदी लग्न समारंभापर्यंतची छायाचित्रे आणि व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील; पण हे सर्व घडवून आणण्यासाठी कोणा व्यक्तीमार्फत तो ड्रोन चालवावा लागतो; पण आता अशा चालकाशिवाय इंटरनेटच्या माध्यमातून ड्रोन उडविण्यासाठी एक प्रमाणित ऑपरेटिंग सिस्टिम तयार करण्यात पुण्यातील "फ्लाइटबेस' (पूर्वीची नॅवस्टिक लॅब्स) या स्टार्टअपला यश आले आहे. मोबाईलसाठी असलेल्या "अँड्रॉइड' सिस्टिमसारखी "फ्लाइट-ओएस' (flyt-os) ही ऑपरेटिंग सिस्टिम आहे. "फ्लाइटबेस'चा वापर कोरिया इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी, हिंदुस्तान अँटिबायोटिक्‍स लिमिटेड, आयआयटी कानपूर आणि मद्रास, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आदी संस्थांकडून सुरू आहे. 

व्हिडिओ ब्लॉगिंगसाठी आता "हॉटबुक' ः www.hautebook.com 
(संस्थापक ः बॉबी जाधव) 

ट्‌विटर, इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर आपल्यापैकी प्रत्येक जण असेलच, असे आता खात्रीपूर्वक म्हणता येईल. डेटा स्वस्त झाल्यामुळे व्हिडिओ बघण्याचे प्रमाण वाढले आहे. एका वेळी दोन किंवा अधिक व्हिडिओ बघण्याची आपली बौद्धिक क्षमता आणि कौशल्य आता विकसित झाले आहे. काही सेकंदांचे हे व्हिडिओ असतील, तर आपण एका वेळी अगदी चार किंवा सहा व्हिडिओसुद्धा पाहतो. हा बदलता ट्रेंड लक्षात घेत "हॉटबुक' हा व्हिडिओ ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. ट्‌विटरचा संक्षिप्तपणा, इन्स्टाग्रामची परिणामकारता आणि यूझर्सला खिळवून ठेवण्याचे फेसबुकचे फीचर त्यामध्ये एकत्र आणले आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदाचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष जगभर पोचविण्याचे काम "हॉटबुक'मार्फत केले गेले. 

 ऍग्रोस्टार ः https://www.agrostar.in 
(संस्थापक ः सितांशू शेठ, शार्दूल शेठ) 

अल्पभूधारक शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पन्नासाठी कोणती बियाणे, खते वापरावीत आणि औषधे फवारावीत, असे अनेक प्रश्‍न पडतात; मात्र त्यांना तांत्रिक, तसेच समाधानकारक उत्तरे मिळतील, असे मार्गदर्शन करणारी सक्षम यंत्रणा नाही. अशा शेतकऱ्यांना घरबसल्या त्यांच्या मोबाईल फोनवर सर्व माहिती देणारे "ऍग्रोस्टार' हे ऍग्री स्टार्टअप सध्या महाराष्ट्रासह गुजरात व राजस्थानमध्ये काम करत आहे. "डिजिटल इंडिया'सारख्या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातही इंटरनेट व मोबाईलचा प्रसार होत असल्यामुळे ग्रामीण भागातील "कंझम्शन पॅटर्न' बदलून टाकण्याची क्षमता या स्टार्टअपमध्ये आहे. सध्या ही बाजारपेठ तीन लाख कोटी रुपये एवढी मोठी आहे. 

 हेक्‍झानिका ः http://hexanika.com 
(संस्थापक ः योगेश पंडित) 

नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे बॅंकिंग क्षेत्रात अनेक बदल होत आहेत. जागतिक पातळीवर काम करणाऱ्या बॅंका, वित्तीय संस्थांना वेगवेगळे नियम, कायद्यांचे पालन करावे लागते. अनेकदा तज्ज्ञांची आणि विधिज्ञांची फौज उभी करूनही काही नियमांचे पालन होत नाही आणि दंडात्मक स्वरूपाचे नुकसान या बॅंकांना सहन करावे लागते. बिग डेटा आणि क्‍लाऊड टेक्‍नॉलॉजीचा वापर करून बॅंकांना "रेग्युलेटरी रिपोर्टिंग'साठी मदत करण्यासाठी हेक्‍झानिका ही स्टार्टअप मदत करत आहे. डॉईशे बॅंक, की बॅंक, फिफ्थ थर्ड बॅंक अशा प्रसिद्ध बॅंकांसाठी हेक्‍झानिका काम करत आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.