परवडणाऱ्या दरामध्ये विद्यार्थ्यांसाठी मेट्रो - डॉ. ब्रिजेश दीक्षित

परवडणाऱ्या दरामध्ये विद्यार्थ्यांसाठी मेट्रो - डॉ. ब्रिजेश दीक्षित

पुणे - पुणे शहर हे शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे असून, येथे विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या दरात मेट्रो सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे सूतोवाच महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी मंगळवारी केले. तसेच "पहिली मेट्रो दीड-दोन वर्षात धावेल, त्यानंतर 2021 पर्यंत टप्प्याटप्प्याने मेट्रोची सुरवात होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

पुणे मेट्रोच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त महामेट्रोतर्फे बालगंधर्व रंगमंदिरात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी महापालिका आयुक्त कुणाल कुमार, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, सिंबायोसिसच्या संचालिका डॉ. स्वाती मुजुमदार, कलादिग्दर्शक नितीन देसाई, "लॅंडस्केप डिझायनर' महेश नागपूरकर, "महामेट्रो'चे वरिष्ठ तांत्रिक सल्लागार शशिकांत लिमये, रामनाथ सुब्रमण्यम उपस्थित होते. 

"पुणे मेट्रो "वर्ल्ड क्‍लास' करण्याबरोबरच इथला ऐतिहासिक वारसा, संस्कृती व पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य असेल, असे सांगून डॉ. दीक्षित म्हणाले, ""नागपूरच्या धर्तीवर पुण्यातही विद्यार्थ्यांना सवलतीत सुविधा मिळेल. युवती, महिलांच्या सुरक्षिततेसाठी "पॅनिक बटन' दिल्याने अनुचित घटनांना आळा बसेल. मेट्रो स्थानकांना त्या-त्या भागातील ऐतिहासिक वारसा व वैशिष्ट्यांची ओळख दिली जाईल.'' 

डॉ. दीक्षित म्हणाले, ""शासकीय गोदामाच्या ठिकाणी होणाऱ्या मेट्रो जंक्‍शनसाठी तब्बल पन्नास मीटर खोल पहिले स्टेशन असेल. मेट्रोसाठी 65 टक्के सौरऊर्जा वापरली जाईल. छत्रपती संभाजीबागेजवळील मेट्रो स्थानक हे संगीतमय स्थानक असेल. विशेषतः महात्मा फुले मंडई, शनिवारवाडा, येरवडा, आगाखान पॅलेसचे सौंदर्य स्थानकातून उलगडेल.'' डॉ. संचेती यांनी "मेट्रो'चे स्वागत केले, तर देसाई, मुजुमदार व नागपूरकर यांनी महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. योगेश देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. 

""महापालिका, मेट्रो, पीएमपीएल, पीएमआरडीए या सर्व संस्था एकत्रित आणून "एकात्मिक वाहतूक व्यवस्था' निर्माण करता येईल. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.'' कुणाल कुमार 

पालकमंत्री, महापौर अनुपस्थित 
महामेट्रोच्या कार्यक्रमासाठी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक यांनाही आमंत्रण होते. मात्र बापट व टिळक यांनी कार्यक्रमास गैरहजेरी लावली, शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेमुळे हे पडसाद उमटल्याची या वेळी चर्चा होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com