‘...च्या समद्या घराचं वाटूळं होऊदे गं आई..!’

संदीप चव्हाण
बुधवार, 27 डिसेंबर 2017

मंदिर परिसरातील झाडांची राखण करणे अशक्‍य आहे. शक्‍यतो रात्रीच्या वेळी या झाडांजवळ जाऊन असे प्रकार केले जातात. मात्र यंदाची यात्रा झाल्यानंतर त्या झाडांजवळ कुणालाही जाता येऊ नये यासाठी संपूर्ण मंदिर परिसरास ‘चेनलिंक’(जाळी) स्वरूपाचे कुंपण पुढील दोन महिन्यांत घालण्याचे काम देवस्थानच्या वतीने हाती घेण्यात येईल.
- अतुल म्हेत्रे, तहसीलदार, सचिव, मांढरदेव देवस्थान

मांढरदेव यात्रेतील दुर्घटनेला बारा वर्षे; काळूबाईच्या नावानं आजही लिहिल्या जातात चिठ्ठ्या
पुणे - ‘...ला नादाला लावणाऱ्या पोरीचं वाटोळं कर,’ ‘स्टोव्हचा भडका होऊन ....ला चांगलीच भाजून काढ’, ‘म्हातारं मरुंदे साप चावून...,’ ‘...च्या समद्या घराचं वाटूळं कर गं आई..!’ एखाद्याचं वाईट घडावं म्हणून काळूबाईच्या नावानं लिहिल्या गेलेल्या चिठ्ठ्यांतील हा मजकूर मानवी मनातील विखारी इच्छा आणि त्याच्याकडील अंधश्रद्धेचं दर्शन घडविणारा आहे.

२५ जानेवारी २००५ रोजी मांढरदेव (जि. सातारा) यात्रेत झालेल्या दुर्घटनेला यंदा बारा वर्षे पूर्ण होत आहेत. एखाद्याचं वाटोळं व्हावं, या आशयाच्या मजकुराच्या चिठ्ठ्या मंदिर परिसरातील काही झाडांवर खिळ्यांच्या साह्याने लटकवण्यात आल्याचे त्या वेळी आढळले होते. या कुप्रथेवर ‘सकाळ’ने तेव्हाही प्रकाश टाकला होता. दरवर्षी पौष पौर्णिमेस भरणारी ही यात्रा यंदा नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सुरू होत आहे. यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर प्रस्तुत प्रतिनिधीने प्रत्यक्ष मांढरदेव येथे जाऊन पाहणी केली असता तेथे आजही अनिष्ट चालीरीती सुरू असल्याचा प्रत्यय आला. 

मंदिराच्या मागील बाजूस बरीचशी झाडं असून, त्यातील काही झाडांवर शेकडो  चिठ्ठ्या लटकलेल्या अवस्थेत पाहायला मिळाल्या. विशेष म्हणजे मंदिर परिसरातील झाडांवर खिळा, बाहुली, बिब्बा ठोकण्यास सक्त मनाई असून, वरील सूचनेचे उल्लंघन केल्यास कायदेशीर दंडात्मक कारवाई केली जाईल, अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत. कुणी इथं करणी केली म्हणून येतोय, तर कुणी करणी करण्यासाठी; कुणी म्हणे देव घातला म्हणून येतोय, तर कुणी देव घालण्यासाठी..! २१ व्या शतकाकडं चाललेल्या माणसाला आजही अंधश्रद्धांचे साखळदंड पुरते तोडता आलेले नाहीत हेच खरं ! माणूसच माणसाच्या वाइटावर कसा उठलाय, त्याच्या मनात, अंतरंगात कुविचारांचं कसं थैमान माजलंय, हे भयानक वास्तव यातून समोर येतं. अनिष्ट, अघोऱ्या प्रथांना मूठमाती देणारा विवेक इथं प्रत्येक भाविकाच्या अंतरी जागृत व्हावा आणि अखिल मानवजातीची अंधश्रद्धा निर्मूलनाच्यादृष्टीने वाटचाल सुरू व्हावी, हेच येणाऱ्या नववर्षानिमित्त काळूबाईला साकडं !

अविवेकी कृत्याचं प्रतीक
एखाद्याच्या नावानं लिहिलेली चिठ्ठी, लिंबू, बिब्बा व काळी बाहुली एका मोठ्या खिळ्यात अडकवलेली आणि तो खिळा झाडाला ठोकून त्यावर चिठ्ठी लटकवलेली..! काही चिठ्ठ्यांतील मजकूर वाचता येण्यासारखा, तर काही मजकुराचा उल्लेख न केलेलाच बरा..!

‘काय बी कर, पन्‌ यंदा...’
‘काय पण कर, कसं पण कर; पण ... लवकर मेला पाहिजे’, ‘....चं लग्न मोडू दे अन्‌ ती हिरीत जाऊन पडू दे’, ‘...चा बैल फेफरं येऊन झडू दे’, ‘त्यांच्याकडं बघून घे गं माई’; ‘काय बी कर, पन्‌ यंदा माज्या नवसाला पाव गं आई..!’

Web Title: pune news Superstition

टॅग्स