‘तनिष्का’मुळे महिलांमध्ये आत्मविश्‍वास

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

पुणे - ‘‘महिलांनी विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवला आहे. ‘तनिष्का’सारखे व्यासपीठ स्त्रियांना निश्‍चित आत्मविश्‍वास देते. या माध्यमातून त्यांना स्वतःचे कर्तृत्व दाखविण्याची संधी ‘सकाळ माध्यम समूहा’ने उपलब्ध करून दिली आहे,’’ असे मत महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केले.

पुणे - ‘‘महिलांनी विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवला आहे. ‘तनिष्का’सारखे व्यासपीठ स्त्रियांना निश्‍चित आत्मविश्‍वास देते. या माध्यमातून त्यांना स्वतःचे कर्तृत्व दाखविण्याची संधी ‘सकाळ माध्यम समूहा’ने उपलब्ध करून दिली आहे,’’ असे मत महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केले.

सकाळ माध्यम समूहाच्या ‘तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियाना’अंतर्गत आयोजित केलेल्या ‘तनिष्का जल्लोष’ या दोन दिवसीय उपक्रमाला मुक्ता टिळक यांनी गुरुवारी (ता. २५) भेट दिली. तनिष्का गटप्रमुख गायत्री घुले यांच्या हस्ते या वेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. नगरसेविका दिशा माने, गायत्री खडके, श्‍वेता गलांडे-खेसे यांचाही सत्कार करण्यात आला. नगरसेविका रूपाली धावडे, लक्ष्मी दुधाने आणि भाजपच्या महिला शहराध्यक्षा सुशीला मेंगडे यांनीदेखील या उपक्रमाला भेट दिली. महिलांसाठी आयोजित केलेल्या पाककृती स्पर्धेतील विजेत्यांचा या वेळी महापौरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला.

म्हात्रे पुलाजवळील कृष्णसुंदर गार्डन येथे आयोजित केलेल्या ‘तनिष्का जल्लोष’ या उपक्रमाअंतर्गत स्वयंरोजगाराची माहिती आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम झाले. ‘अमित गायकवाड ग्रुप’ हे या कार्यक्रमाचे स्थळ प्रायोजक, तर मे. श्रीपाद शंकर नगरकर ज्वेलर्स हे मुख्य प्रायोजक होते. कार्यक्रमप्रसंगी ‘गायकवाड ग्रुप’चे सुरेश कृष्णाजी गायकवाड आणि नगरकर ज्वेलर्सच्या स्वाती नगरकर उपस्थित होत्या. सूत्रसंचालन पूनम चोरडिया यांनी केले.

महिलांसाठी ‘सकाळ’ने सुरू केलेले तनिष्का व्यासपीठ निश्‍चितच कौतुकास्पद आहे. या माध्यमातून महिलांनाही भविष्याची दिशा मिळते. घराबाहेर पडून महिलांनाही चांगले कार्य करण्यास या व्यासपीठाचा उपयोग होतो व स्वकर्तृत्वाची वेगळी जाणीवही निर्माण होते. ग्रामपंचायत सदस्य ते पंतप्रधान, राष्ट्रपतिपदापर्यंत महिलांनी अनेक चांगली कामे केली आहेत.
- मुक्ता टिळक, महापौर

Web Title: pune news women confidence by tanishka