पुणे : चेंबर दुरुस्तीशिवाय कामाचे बिल नाही; अतिरिक्त आयुक्तांचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Road Chamber

सांडपाणी व पावसाळी गटारांच्या चेंबरचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने त्यांची माहिती मागवली जात आहे.

पुणे : चेंबर दुरुस्तीशिवाय कामाचे बिल नाही; अतिरिक्त आयुक्तांचा इशारा

पुणे - सांडपाणी व पावसाळी गटारांच्या चेंबरचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने त्यांची माहिती मागवली जात आहे. ज्या ठेकेदारांनी हे काम केले आहे, त्यांच्याकडून पुन्हा एकदा सर्व कामे करून घेताना चेंबरचे झाकण रस्त्याच्या समपातळीत असतील याची खबरदारी घेतली जाईल, असे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी सांगितले.

शहरातील रस्त्यांची दुरवस्था झालेली असताना, त्यात रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या चेंबरमुळे वाहनचालकांची तारांबळ उडत आहे. याबाबत ‘सकाळ’ने बुधवारी वृत्त प्रकाशित करून हा विषय चव्हाट्यावर मांडला. सांडपाणी व पावसाळी वाहिनी टाकल्यानंतर ठराविक अंतरावर त्यांचे चेंबर तयार केले जातात, हे चेंबर रस्त्याला समपातळीत नाहीत. त्यामुळे रस्त्यात एकतर चेंबरचा खड्डा किंवा उंचवटा तयार झाल्याने अपघात होत आहेत. रात्रीच्या वेळी हे खड्डे दिसतही नाहीत, त्यामुळे वाहनचालकांना धक्के खावे लागत आहेत.

‘सकाळ’चे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर मलःनिसारण विभागाकडून सांडपाणी वाहिनी कोणी टाकल्या आणि पथ विभागाच्या प्रमुखांकडून पावसाळी वाहिन्या कोणी टाकल्या याची माहिती मागविण्यात येत आहे. ज्या ठेकेदारांनी काम व्यवस्थित केले नाही, त्यांना त्यांच्या खर्चाने पुन्हा काम करायला लावले जाईल. जर त्यांचे बिल दिले असले, तर इतर कामांचे बिल थांबविले जाईल, असे खेमणार यांनी सांगितले. दरम्यान, यावर पुणेकरांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

धायरी फाटा ते धायरी गावापर्यंत सगळीकडे चेंबर रस्त्याच्या समपातळीच्या खाली गेले आहेत. अनेक झाकणे तुटलेले आहेत. एखादा अपघात झाल्याशिवाय प्रशासन चेंबर दुरुस्त करणार नाही का?

- नूपुर कुलकर्णी, धायरी

वडगाव शेरी येथील गार्डेनिया फेज एक सोसायटी येथे गेले कित्येक दिवस चेंबर तुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा होत आहे.

- कृष्णा शेवाळे, वडगाव शेरी

सध्याचा महापालिकेचा दर्जा खुपच मागास आहे. बाजीराव रस्त्यावर सुमारे ३० वर्षांपूर्वी चेंबर तयार केले, ते एकदम सुस्थितीत आहेत. त्याचा दर्जा महापालिकेने तपासावे व त्याप्रमाणे चेंबर तयार करावेत.

- प्रशांत उमरदंड

महापालिका आयुक्तांनी चेंबरचे काम नीट करा असे आदेश देऊनही काम झाले नाही. ही शोकांतिका आहे. तसेच आता पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा पाऊस सुरू झाल्यावर आढावा घेतला जाईल, असे सांगणे म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार आहे.

- आदित्य गायकवाड, धनकवडी