ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई आवश्यक

ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई आवश्यक
Published on

पुणे, ता. ११ : उत्सव, समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये कायद्याने निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक आवाज करणाऱ्यांवर पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कारवाई करावी. ध्वनिप्रदूषणाबाबत नागरिकांना सहज तक्रार करता यावी, यासाठी टोल-फ्री क्रमांक, ई-मेल आणि व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी निसर्गसेवक स्वयंसेवी संस्थेने केली. तसेच या उपक्रमाला १४ स्वयंसेवी संस्था आणि संघटनांचा पाठिंबा असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.

पुण्यात ध्वनिप्रदूषणाच्या प्रश्नावर आयोजित पत्रकार परिषदेत पर्यावरण विषयातील कायदेतज्ज्ञ अमोघ परळीकर, संस्थेचे अध्यक्ष विवेक वेलणकर, जुगल राठी, श्रवणतज्ज्ञ डॉ. कल्याणी मांडके आदी उपस्थित होते.
परळीकर म्हणाले, ‘‘पर्यावरण संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत पुण्याचे पोलिस आयुक्त आणि लोकप्रतिनिधींना पत्र देऊन आवाहन केले आहे. उत्सव काळात ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर तत्काळ कारवाई करावी. नागरिकांना सहजपणे तक्रार नोंदवता यावी, यासाठी पोलिस प्रशासनाने स्वतंत्र तक्रार यंत्रणा उपलब्ध करून द्यावी.’’
डॉ. मांडके म्हणाल्या, ध्वनिवर्धकाच्या आवाजावर दिवसभर मर्यादा असणे आवश्यक आहे. तसेच ढोल-ताशा पथकांच्या सरावाच्या वेळाही निश्चित कराव्यात. ढोल-ताशा वाजविणाऱ्यांनी तासभर वादन केल्यानंतर किमान २० मिनिटांची विश्रांती घेणे आवश्यक आहे. ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न केवळ सण-उत्सवांपुरता मर्यादित नसून त्याबाबत वर्षभर जनजागृती करणे गरजेचे आहे.’’
‘‘ध्वनिप्रदूषणाबाबत पोलिस प्रशासनाने स्वतंत्र तक्रार केंद्रे सुरू करावीत. त्यामुळे नागरिकांना तक्रारी नोंदविण्यासाठी सुलभ व्यवस्था उपलब्ध होईल. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे शक्य होईल,’’ असे वेलणकर यांनी सांगितले.

या संस्थांचा पाठिंबा...
ध्वनिप्रदूषण होऊ नये यासाठी सजग नागरिक मंच, परिसर, पुणे रिव्हर रिव्हायव्हल, भवताल, जीविधा, डेक्कन जिमखाना परिसर समिती, बियॉन्ड वाइल्ड, द ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी, ओयकोस, नेचर वॉक, परिवर्तन, अभ्यास मंडळ, अमित गोडसे, ॲडव्हेंचर फाउंडेशन या संस्थांनी पाठिंबा दिल्याचे वेलणकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com