esakal | Pune: अधिकाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

Letter

पुणे : अधिकाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार

sakal_logo
By
किशोर गरड

महापालिकेच्या शहर बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार

अतिक्रमण कारवाई दरम्यान कर्तव्यास दिरंगाई ; लाच घेऊन बेहिशोबी मलमत्ता कामाविल्याचा आरोप

किशोर गरड

आंबेगाव बुद्रुक, (ता.८) : पुणे महानगरपालिका बांधकाम विभाग क्रमांक दोन मधील उप अभियंता प्रताप धायगुडे व कनिष्ठ अभियंता हेमंत कोळेकर यांच्या विरोधात पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधीक्षकांकडे कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर व भ्रष्टपणे मालमत्ता मिळविली असल्याची लेखी तक्रार दिली आहे. महापालिका हद्दीमध्ये समाविष्ट पूर्वीची आकरा गावे आणि नुकतीच समाविष्ट झालेल्या तेवीस गावांमध्ये आंबेगाव बुद्रुक व आंबेगाव खुर्द, जांभूळवाडी, कोळेवाडी आदी गावांचा समावेश आहे. या समाविष्ट गावांच्या परिसरात मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकामांचा धडाका विकासकांनी लावलेला आहे.

दरम्यान, पुणे महानगरपालिका बांधकाम विभाग क्रमांक दोन अंतर्गत असणाऱ्या आंबेगाव परिसरातील अधिकाऱ्यांनी अनधिकृत बांधकामांवर योग्यवेळी कारवाई न केल्याने अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या. यामध्ये, कष्टकरी कामगार वर्गातील नागरिकांनी स्वस्तात सदनिका मिळत आहेत म्हणून घेतल्या आहेत. त्यानंतर, इमारती पूर्णपणे उभ्या राहिल्यावर या बांधकामांना बांधकाम विभागाकडून नोटिसा बजाविण्यात आल्या परंतु, त्यातही सरसकट कारवाई न करता दोनच इमारतीवर कारवाई करण्यात आली आहे. उपअभियंता प्रताप धायगुडे व कनिष्ठ अभियंता हेमंत कोळेकर यांनी उर्वरित आठ बांधकाम व्यवसायिकांकडून लाच घेऊन कारवाई केलेली नाही. त्यांनी अशाप्रकारे बरीच बेहिशोबी मालमत्ता मिळविली आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात आमदार जगताप यांचेकडे स्थानिक नागरिकांनी तक्रारी केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधीक्षकांना याची चौकशी व्हावी म्हणून लेखी तक्रार आमदार संजय जगताप यांनी केली आहे.

आंबेगाव खुर्द ग्रामपंचायती कडून साधारण अट्ठेचाळीस अनधिकृत बांधकामांना नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या. परंतु, अपुऱ्या साधन सामुग्रीमुळे ती कारवाई पूर्ण झाली नाही. त्यानंतर, गाव महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर कारवाई होणे अपेक्षित होते. परंतु पालिकेच्या हलगर्जीपणामुळे व अधिकाऱ्यांच्या लाचखोर वृत्तीमुळे परिसरात अनधिकृत बांधकामांचे जाळे वाढल्याच्या तक्रारी नागरिकांनी आमदार जगताप यांचेकडे केल्या आहेत.

-------------------------

चौकट :

एकाच भागात सहा ते सात वेळा कारवाई.!

आंबेगाव खुर्द परिसरातील सर्व्हे नंबर साठ मध्ये महापालिकेकडून साधारण सहा ते सात वेळा कारवाया करण्यात आल्या आहेत. सरसकट कारवाई न होता दिखाव्यासाठीच्या कारवाया याठिकाणी होत आहेत. यामागे नेमके अर्थकारण की राजकारण असा सवाल नागरिक करत आहेत.

---------------------

'अनधिकृत बांधकाम व्हायला नकोत. आम्ही याच्याशी सहमत आहोत. परंतु, अशाप्रकारच्या अनधिकृत बांधकामांच्या पायाभरणीला बांधकाम विभागाकडून कारवाया करण्यात याव्यात. जेणेकरून गोरगरीब कष्टकरी नागरिकांची फसवणूक होणार नाही. अधिकारी लाच घेऊन कारवायात कसूर करत असतील तर ही बाब गंभीर आहे.

-प्रसाद जगताप, सामाजिक कार्यकर्ते.

शहरात सगळ्यात जास्त आमच्या विभागाने कारवाया केल्या आहेत.आणि त्या नियमानुसार झालेल्या आहेत. याचे रिपोर्टींग आम्ही पुढे पाठविले आहे. यापुढेही पालिकेकडून करावाया केल्या जाणार आहेत.

-राहुल साळुंखे, प्रभारी कार्यकारी अभियंता, शहर बांधकाम विभाग २

loading image
go to top