Palkhi Route Issue : पुणे-पंढरपूर पालखी महामार्ग विस्तारीकरणाला विरोध

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या भूमिकेविरुद्ध ग्रामस्थ आक्रमक; काम पाडले बंद.
Pune Pandharpur Road Issue
Pune Pandharpur Road Issuesakal
Updated on

वाल्हे - पुणे-पंढरपूर पालखी महामार्ग विस्तारीकरणाचे काम जेव्हा सुरू झाले आहे, तेव्हापासून कायमच वादग्रस्त ठरले आहे. कधी सतत होणाऱ्या अपघातांमुळे तर कधी मनमानी कारभारामुळे आजही गावकऱ्यांना कोणतीही कल्पना न देता वाल्हे गावाच्या प्रवेशालाच दहा फूट उंचीचा भराव टाकून रस्ता करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा प्रयत्न ग्रामस्थांनी हाणून पाडला. परिस्थितीचे गांभीर्य पाहून जेजुरीचे पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन देऊन ग्रामस्थांची समजूत काढली.

पुणे-पंढरपूर पालखी महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे या रस्त्याला होणारा विरोध थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने मोडीत काढण्याचा प्रयत्न ठेकेदार व अधिकारी करताना दिसत आहेत. पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथे महामार्ग प्राधिकरणाने मुद्दामहून काही गोष्टी वारंवार केल्यासारख्या दिसून येत आहेत.

वाल्हे परिसरातील सर्वांत मोठे विद्यालय असलेल्या महर्षी वाल्मीकी विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी भुयारी मार्ग देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हा भुयारी मार्ग तयार झाल्यानंतर समोर आपली जागाच नसल्याचे निदर्शनास आल्याने हा भुयारी मार्ग बिनकामाचा ठरला आहे. या महामार्गावर दिवे घाटापासून ते जेजुरीपर्यंत प्रत्येक ठिकाणी गावांच्या प्रवेशद्वारालाच उड्डाणपूल बसविले आहेत. मात्र, वाल्हे गावामध्ये प्रवेशासाठी पूल अर्धा किलोमीटर दूर बांधला आहे. गावात येणाऱ्या मुख्य रस्त्यालाच तब्बल दहा फुटाची उंची देऊन हा रस्ता बनविण्याचा घाट घातला आहे.

हे निदर्शनास आल्यानंतर याला विरोध करत मंगळवारी (ता. ११) हे काम बंद पाडले. ग्रामस्थांचा आक्रमकपणा पाहिल्यानंतर ठेकेदाराने महामार्ग प्राधिकरणाचे कंपनीचे प्रकल्प अधिकारी राजेंद्र ढगे यांच्याशी संपर्क साधून त्यांना बुधवारी दुपारी बोलावून घेतले.

त्यांच्यासमोर ग्रामस्थांनी या रस्त्याला एवढी उंची न देता हा रस्ता आहे त्याच उंचीने पुढे नेण्याची मागणी केली. मात्र, अधिकाऱ्यांनी केवळ चर्चा केली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधत काही तासांतच पोलिस बंदोबस्तात काम सुरू करण्याचा प्रयत्न केला.

अधिकाऱ्यांच्या व ठेकेदाराच्या चर्चेचा निषेध करत संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी काम सुरू करू न देण्याचा इशारा दिला. दरम्यान या ठिकाणी फौजफाट्यासह पोहचलेल्या जेजुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी ग्रामस्थांचा आक्रमकपणा व परिस्थितीचे गांभीर्य पाहून ग्रामस्थ व अधिकाऱ्यांशी बैठक करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी ओबीसी मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख सचिन लंबाते, सरपंच अतुल गायकवाड, सागर भुजबळ, बाळासाहेब राऊत, हनुमंत पवार, संभाजी पवार, राजेंद्र गायकवाड, प्रा. संतोष नवले, नारायण पवार, सतीश पवार, पराग शहा, सुधाकर पवार, महेंद्र पवार, हवालदार केशव जगताप आदी उपस्थित होते.

अशा आहेत मागण्या

महात्मा फुले पुतळ्याशेजारी अंडरपास भुयारी मार्ग तसेच पाण्याची टाकीपासून ते महात्मा फुले पुतळ्यापर्यंत दहा फुटापर्यंत वाढविलेली उंची पूर्णतः कमी करून पूर्वीप्रमाणे असावी, महामार्गाच्या दुतर्फा प्रवाशांच्या सोईसाठी एसटी थांबा असावा, त्याचप्रमाणे वाल्हे नजीक रामसिंग ढाबा ते कामठवाडीपर्यंत ग्रामस्थांच्या दळणवळणासाठी पालखी महामार्गालगत दुतर्फा साईटपट्टी करण्याबाबतची आग्रही मागणी केल्याचे सचिन लंबाते यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.