
पुणे-पानशेत रस्त्यावर रिक्षा आणि कारची जोरदार धडक
सिंहगड : पुणे-पानशेत रस्त्यावरील गोऱ्हे खुर्द गावच्या हद्दीत व्यंकटेश्वरा शाळेजवळ रिक्षा आणि कारची समोरासमोर जोरदार धडक झाली असून या अपघातात रिक्षाचालक नारायण प्रभाकर दारवटकर (रा. कोंडगाव ता.वेल्हे) हा गंभीर जखमी झाला आहे. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून जखमी व्यक्तीस उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची तीव्रता एवढी होती की यात रिक्षाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक रहिवासी शशिकांत किवळे व इतर तरुण मदतीसाठी धावले. रिक्षाची सीएनजीची टाकी फुटल्याने गॅस गळती सुरू होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शशिकांत किवळे यांनी हवेली पोलीस व पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाला माहिती कळवली. तातडीने हवेली पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी व्यक्तीस खाजगी रुग्णवाहिकेने उपचारांसाठी पाठविण्यात आले.
वेल्हे पोलीसांची तत्परता
वेल्हे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार हे काही पोलीस कर्मचाऱ्यांसह सेक्टर रात्र गस्तीसाठी पानशेतकडे जात होते. रस्त्यात गर्दी दिसल्याने ते तातडीने खाली उतरले व जखमीला तात्काळ रुग्णवाहिका मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केले. तसेच हवेली पोलीस ठाण्याची गाडी अपघात स्थळी किती वेळात पोहोचेल याबाबातही त्यांनी फोन करून विचारणा केली. त्यानंतर काही वेळातच हवेली पोलीस, अग्निशमन दल व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली,तोपर्यंत पवार घटनास्थळी थांबून होते.
खानापूर येथील रुग्णवाहिका आलीच नाही. अपघात स्थळापासून खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर तीन किलोमीटर पेक्षा कमी आहे परंतु सतत फोन करुनही तेथील रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. तसेच 108 क्रमांकावर फोन करुनही रुग्णवाहिका मिळाली नाही. शेवटी किरकटवाडी फाट्यावरील खाजगी रुग्णालयाची रुग्णवाहिका मागविण्यात आली.
अपघातांची मालिका सुरुच मागील वर्षभरापासून गोऱ्हे खुर्द गावच्या हद्दीत पाच मोठे अपघात घडले असून यात दोघांचा जीव गेला आहे. रस्त्याचे काम झाल्यापासून वाहनं अत्यंत वेगात असतात. गतीरोधक, रिफ्लेक्टर नसल्याने वाहनचालकांना अंदाज येत नाही परिणामी अपघात घडत आहेत. त्यामुळे जागोजागी गतीरोधक तयार करावेत व रिफ्लेक्टर बसवावेत अशी मागणी स्थानिक नागरिक शशिकांत किवळे यांनी केली आहे.