पुणे : रोजगाराच्या हक्कासाठी पथारी व्यावसायिक रस्त्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

agitation

पुणे शहरातील १० हजार पथारी व्यावसायिकांचा त्याचाच प्रतिनिधी निवडण्याचा मतदानाचा हक्क काढून घेतला, त्यात परत नोंदणी रद्द करून व्यवसायही बंद करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

पुणे : रोजगाराच्या हक्कासाठी पथारी व्यावसायिक रस्त्यावर

पुणे - निवडणूक आयोग, महापालिका मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून पुण्यात बैठका घेत आहेत. पण याच शहरातील १० हजार पथारी व्यावसायिकांचा त्याचाच प्रतिनिधी निवडण्याचा मतदानाचा हक्क काढून घेतला, त्यात परत नोंदणी रद्द करून व्यवसायही बंद करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. याविरोधात आज शहरातील पथारी व्यावसायिकांनी रोजगार वाचविण्यासाठी महापालिकेने आंदोलन केले.

पथारी पंचायतीतर्फे हे आंदोलन करण्यात आले. नितीन पवार यांनी याचे नेतृत्व केले. लक्ष्मी रस्त्यावरील शिवराय पथारी संघटना, विश्व मानव अधिकार परिषद, अन्याय निवारण भ्रष्टाचार निर्मूलन संस्था या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.

पुणे महापालिकेच्या फेरीवाला समितीची निवडणूक डिसेंबर महिन्यात होत आहे. त्यामध्ये ८ सदस्य निवडले जाणार आहेत. पण प्रशासनाने २१ हजार पैकी दहा हजारावर मतदारांची नावे तर वगळली आहेत.पण त्याचबरोबर या पथविक्रेत्यांचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करणार आहोत, असेही नुकतेच जाहीर केले आहे. याविरोधात हे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांना शिष्टमंडळाने निवेदन देऊन दिले.

नितीन पवार म्हणाले, ‘आता हा मुद्दा केवळ मतदानापुरता मर्यादित राहिला नाही तर पथारी व्यवसायिकांच्या रोजगाराचाही झाला आहे. पथविक्रेता कायद्यानुसार रोजगाराचा आणि उपजीविकेच्या संरक्षणाचा अधिकार आहे, तो कायम राहिला पाहिजे. त्यामुळे अन्यायकारक निर्णय मागे घेतलाच पाहिजे.

यावर बिनवडे यांनी आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे आश्‍वासन दिले.

टॅग्स :puneEmploymentBusinessman