

पिंपरी, ता. २१ : शहरातील कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेले पादचारी भुयारी मार्ग सद्यःस्थितीत पांढरे हत्ती ठरत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. प्रशासनाच्या कमालीच्या अनास्थेमुळे आणि देखभालीअभावी या भुयारी मार्गांची प्रचंड दुरवस्था झाली असून, ते पादचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. पुणे-मुंबई महामार्गावरील चिंचवड स्टेशन, काळेवाडी आणि फुगेवाडी परिसरातील पादचारी भुयारी मार्गांची पाहणी केली असता, तेथे कमालीची अस्वच्छता पसरल्याचे दिसून आली.
या भुयारी मार्गांमध्ये नियमित स्वच्छता होत नसल्याने कचऱ्याचे ढीग साचले आहेत. अनेक ठिकाणी सांडपाणी गळत असल्याने प्रवाशांना नाक दाबून प्रवास करावा लागतो. भिंतींवर थुंकून झालेल्या विद्रुपीकरणामुळे या परिसराला उकिरड्याचे स्वरूप आले आहे. शहरातील मुख्य चौक आणि हायवे ओलांडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भुयारी मार्गांमध्ये सुरक्षेची कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. अनेक मार्गांमधील सीसीटीव्ही कॅमेरे एकतर बंद आहेत किंवा ते चोरीला गेले आहेत. सुरक्षा रक्षक नसल्यामुळे रात्रीच्या वेळी महिला, नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिकांना या मार्गावरून जाताना भीतीचे वातावरण असते. अनेक भुयारी मार्गांतील विद्युत दिवे चोरीला गेले आहेत किंवा बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे दिवसाही या मार्गांमध्ये अंधाराचे साम्राज्य असते, ज्यामुळे महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
मद्यपी आणि टवाळखोरांचे अड्डे
सुरक्षारक्षकांचा अभाव असल्यामुळे या भुयारी मार्गांचा ताबा आता मद्यपी, भिकारी आणि टवाळखोरांनी घेतला आहे. सायंकाळनंतर या ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांची संख्या वाढते, ज्यामुळे सर्वसामान्य पादचारी, विशेषतः महिला, या मार्गांचा वापर करण्याचे पूर्णपणे टाळत आहेत. अनेक ठिकाणी पादचाऱ्यांसाठी असलेल्या या मार्गांमध्ये दुचाकी आणि रिक्षा अनधिकृतपणे पार्क केल्या जात असल्याचेही उघडकीस आले आहे.
जिन्यांवर पत्राशेड नाही
पावसाचे पाणी साचून सध्याच्या पावसाळ्यात या भुयारी मार्गांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. छताला पडलेल्या चिरांमधून होणारी पाण्याची गळती आणि जिन्यांवर पत्राशेड नसल्यामुळे पावसाचे पाणी थेट भुयारी मार्गात साचत आहे. पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने काही ठिकाणी गुडघाभर पाणी साचले असून, डासांची उत्पत्ती वाढल्याने आरोग्याचा धोकाही निर्माण झाला आहे.
जीव मुठीत धरून महामार्ग ओलांडण्याची वेळ
भुयारी मार्ग वापरण्यायोग्य न राहिल्यामुळे नागरिकांना, विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना नाइलाजाने मुख्य रस्त्यावरून किंवा वेगाने धावणाऱ्या वाहनांमधून जीव मुठीत धरून महामार्ग ओलांडत आहे. यामुळे अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
महापालिकेने लाखो रुपयांचा कर वसूल करूनही नागरिकांना साध्या मूलभूत सुविधा पुरवल्या जात नाहीत. देखभाल-दुरुस्तीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे शहरातील बहुतांश भुयारी मार्ग प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. महापालिकेने या भुयारी मार्गांची त्वरित स्वच्छता करावी, बंद दिवे सुरू करावेत, सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षारक्षक तैनात करावेत.
- जगदीश दर्णे, पादचारी मोहननगर चिंचवड
भुयारी पादचारी मार्गांच्या देखभाल व दुरूस्तीसाठीच्या कामांसाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. यात भुयारी पादचारी मार्गांची दुरूस्ती करण्यात येणार आहे.
- प्रेरणा सिनकर, सहशहर अभियंता प्रकल्प विभाग
फोटो - 41345
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.